Next
निरोपाची गाणी...
BOI
Sunday, May 26, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘सुनहरे गीत’ या सदरात आज प्रसिद्ध होत असलेल्या लेखाचा क्रमांक आहे १०१. चार जून २०१७ रोजीच्या रविवारपासून सुरू झालेले आणि दोन वर्षे अखंडितपणे सुरू असलेले पद्माकर पाठकजी यांचे हे साप्ताहिक सदर आज समाप्त होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील १०० उत्तमोत्तम कलावंत आणि १०० सुरेल गाण्यांची सफर या सदराने घडवली. निरोपाच्या अर्थपूर्ण गाण्यांसह निरोप घेणारा हा लेख...
..........
‘जाता हूँ मैं, मुझे अब ना बुलाना, मेरी याद भी अपने दिल में न लाना...’ ‘दादी माँ’ चित्रपटातील हे गीत निघून जाणाऱ्याचे मनोगत सांगणारे होते. आणि याच प्रकारे निरोपाची अनेक गाणि आपल्याला हिंदी चित्रपटगीतांच्या खजिन्यात मिळतील. 

चित्रपटाच्या कथानकात प्रियकर-प्रेयसीने भेटणे आणि भेटीनंतर एकमेकांचा निरोप घेणे असे प्रसंग असतात. एका दिवसाचा निरोप घेणे किंवा कायमचे जीवनातून निघून जाणे, असे प्रकार यामध्ये असतात. त्यामुळेच ‘अच्छा तो हम चलते हैं...’सारखे गीत हे एक किंवा दोन दिवसांसाठीच्या निरोपासाठी असते आणि तसे ते सुखद प्रेमगीतच असल्यामुळे आपण सहजपणे गुणगुणतो; पण प्रियकर-प्रेयसीचा कायमचा निरोप घेण्याच्या प्रसंगावरील ‘शिरीं-फरहाद’ चित्रपटातील ‘गुजरा हुआ जमाना आता नही दुबारा, हाफिज खुदा तुम्हारा’सारखे दु:खद गीत निरोपाचेच असूनही मनाला खिन्न बनवते. 

तोच प्रकार ‘पवित्र पापी’ चित्रपटातील ‘तेरी दुनिया से होके मजबूर चला, मैं बहोत दूर, बहोत दूर चला’ या गीताचा आहे. निरोपाचे हे गीत मनाला सुखद वाटत नाही. तिच्या जगापासून तो वेगळ्या जगात जातो, तेव्हा ‘तेरी दुनियासे दूर चले होके मजबूर हमें याद रखना’ असे सांगूनही निरोप घेतला जातो, हे आपल्याला ‘जबक ‘चित्रपटातून बघायला मिळाले होते. ऋषी कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सरगम’ चित्रपटातून मोहम्मद रफींनी गायलेले ‘हम तो चले परदेस हम परदेसी हो गये’ हे गीत १९८०मध्येच लोकप्रिय झाले व त्याच वर्षात मोहम्मद रफी यांचे निधन झाल्यामुळे चित्रपटप्रेमींसाठी त्या गीताचे एक वेगळेच महत्त्व ठरले. 

‘चल उड जा रे पंछी...’ हे मोहम्मद रफी यांनीच गायलेले गीत ‘भाभी’ चित्रपटातून आपणापुढे आले होते. तसे थेट निरोपाचे शब्द या गीतात नसले, तरी आशयामधून हे गीत तसेच भाव व्यक्त करणारे होते. तशातच ते गीत या चित्रपटात एकदा नायिका सासरी जातानाही येते आणि मुख्य नायक बलराज सहानी यांना घरदार सोडून जाण्याची वेळ येते, तेव्हाही येते. त्यामुळे राजेंद्रकृष्ण यांनी लिहिलेले या गीतातील एकेक शब्द व मोहम्मद रफी यांच्या स्वरातील दर्द मनाला भिडतो व या निरोप गीताचे एक वेगळे महत्त्व लक्षात येते. 

निरोप घेताना मुस्लिम बांधव ‘खुदा हाफिज’ असा शब्दप्रयोग करतात. त्याचाच उपयोग करून शिरीं-फरहाद चित्रपटात वर उल्लेखित गीतात शब्दरचना करण्यात आली होती. तसाच प्रकार ‘लव्ह इन टोकियो’ चित्रपटातील गीतात होता. जपानी भाषेत निरोप घेताना ‘सायोनारा’ म्हणतात. त्याचाच वापर करून हसरत जयपुरींनी ‘सायोनारा, सायोनारा, वादा निभाऊँगी सायोनारा’ अशी रचना करून गीत लिहिले; पण या गीतातील निरोप तात्पुरत्या स्वरूपातील आहे. पुढे लगेच ‘कल फिर आऊँगी’चा वादा आहे. 

१९८०मध्ये ‘हम तो चले परदेस’ गाऊन मोहम्मद रफींनी खरोखरच आपणा सर्वांचा निरोप घेतला. तसाच प्रकार १९६६मध्ये शैलेंद्र या गीतकाराबाबत झाला होता. राज कपूर- सायरा बानो यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दीवाना’ हा चित्रपट १९६४-६५मध्ये सेटवर होता. त्यातील गीते लिहिण्याचे काम शैलेंद्र यांच्याकडे होते. नायक-नायिकेवर चित्रित झालेले, पण नायकाने निरोप घेताना म्हटलेले गीत शैलेंद्र यांनी लिहिले. अनेक समस्यांनी ग्रासलेले शैलेंद्र तेव्हा दु:खाच्या खाईत होते. त्यांचा अंत:काळ जवळ आल्याचे जणू त्यांच्या लक्षात आले होते व त्यामुळेच त्यांनी त्या प्रसंगातील नायकासाठी ‘हम तो जाते अपने गाव, अपनी राम राम राम’ असे गीत लिहिले. १९६६मध्ये शैलेंद्र यांचे निधन झाले आणि चित्रपटप्रेमींना त्या गीताचे वेगळेच महत्त्व जाणवले. 

हे इतके सगळे वाचल्यावर वाचकहो तुम्हाला प्रश्न पडला असेल, की नेहमीप्रमाणे एखाद्या कलावंताची माहिती व नंतर गीत अशी नेहमीची पद्धत सोडून हे निरोपाच्या गाण्यांचे काय काढले? 

...तर रसिकहो ,आता माझ्यावरही तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. ‘बाइटस ऑफ इंडिया’च्या संपादकांनी दोन वर्षे मला संधी दिली, मी लिहीत गेलो, तुम्हीही आवडीने वाचत गेलात. गेली पन्नास वर्षे ज्या चित्रपट कलावंतांनी मला रिझवले, सावरले, शिकवले त्यांच्या ऋणातून अल्पांशाने उतराई होण्याची संधी मला मिळाली. जून २०१७च्या पहिल्या रविवारी (चार जून) राज कपूरवर लिहून ‘सुनहरे गीत’ या लेखमालेचा शुभारंभ केला. (तो पहिला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) १९ मे २०१९च्या रविवारसाठी पृथ्वीराज कपूर यांच्यावर लेख लिहिताना माझ्या लक्षात आले, की हा लेख शंभरावा आहे. (तो लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) या दोन वर्षांत मी शंभर कलावंत आणि अर्थातच शंभर गीतांबद्दल लिहिले. त्याव्यतिरिक्त अजूनही कलावंत व मधुर गीते आहेत, त्यांच्याबद्दलही लिहिता येईल; पण... ‘बहुत दिया देनेवाले ने तुझको, आँचल ही न समाये तो क्या की जे?...’ अशी माझी मन:स्थिती आहे. शतकपूर्तीचा आनंद वेगळा असतो आणि शतकानंतर थांबण्याचा संयमही महत्त्वाचा असतो. 

चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पृथ्वीराज कपूर ते राज कपूर अशा नोंदी आहेत; माझ्या या लेखमालेत मात्र प्रवास उलटा झाला. पुत्रापासून सुरुवात करून मी  पित्यापर्यंत येऊन पोहोचलो. खरे तर असे काही ठरवले नव्हते; पण ते घडले. एकूणच शंभर लेख तरी मी कोठे लिहिले? सरस्वतीमातेने ते लिहून घेतले. 

... आणि या लेखनाला प्रोत्साहन मिळाले, सहकार्य मिळाले ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या टीमकडून आणि विशेषत: संपादक अनिकेत कोनकर यांच्याकडून! लिहिणारा लिहीत असतो; पण ते वाचणाराही महत्त्वाचा असतो, त्याचा प्रतिसाद लेखकाच्या मनाला उभारी देणारा असतो. त्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ चित्रपटतज्ज्ञ विजय नाफडे, उदय द्रविड इब्राहिम सय्यद, एस. जी. चांदोरकर यांच्या प्रतिक्रिया मोलाच्या ठरल्या! त्यांच्याखेरीज स्मिता जानवडकर (मिरज), नंदकिशोर आढाव, विदुला करंजेकर (अहमदनगर), जनार्दन अनपट (सातारा रोड), शशिकांत बोरगावकर, ज्ञानेश्वर इथापे, उद्धव कुलकर्णी, अश्विनी पुणतांबेकर, दीपक फलटणकर, दीपा देशमुख, रोहिणी आग्रे, सुभाष पुरोहित, शेखर हसबनीस, गजानन इनामदार, राजीव लावंघरे, अरुण कुलकर्णी, नीळकंठ भालेराव, बाळासो. मदने, धनश्री जोशी, जयवंत देसाई असे अनेक चित्रपटप्रेमी पहिल्यापासून वाचत गेले, प्रतिसाद देत गेले. 

पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दलचा म्हणजेच या सदरातील शंभरावा लेख लिहिताना ‘सुनहरे गीत’ कोणते, येथे माझी गाडी अडली. तेव्हा उत्साही, तरुण चित्रपटप्रेमी राहुल साखवळकर या माझ्या सातारच्या मित्राने मोलाची मदत केली व समारोपाचे गीतही त्यानेच सुचवले. अशा प्रकारे अनेकांच्या सहकार्यामुळे मी ही शतकाची वाटचाल करू शकलो. त्या सर्वांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. 

आपणा सर्वांचा निरोप घेताना ‘सफर था भी जितना वो हो ही गया है’ या मुकेश यांच्या ओळी वास्तवतेचे भान देत आहेत. ऋतुचक्र सुरूच राहणार. ‘कल और आएंगे नग्मों की खिलती कलिया चुननेवाले, मुझसे बेहतर कहनेवाले’ या साहिर यांनी सांगितलेल्या सत्याची मला जाण आहे. तसेच तुमचा निरोप घेताना तुम्हाला शैलेंद्रच्या शब्दांत सांगायचे तर ‘छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते, कहीं तो मिलेंगे, कभी तो मिलेंगे’ हाच आशावाद जपायचा असतो. 

आणि निरोपाच्या वेळी जसे ‘खुदा हाफिज’ असे म्हणतात, तसे ‘अलविदा’ ही म्हणतात. माझ्या ओठांवर ‘अलविदा’ हाच शब्द आता आला आहे; पण...
 
कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना
रोते, हँसते, बस यूँही तुम गुनगुनाते रहना 
कभी अलविदा ना कहना 

जाता जाता माझी ही गाणी स्मरणात ठेवा; (पण) कायमचा निरोप घेऊ नका! दुःखात, सुखात हीच गाणी ओठांर राहू देत! 

प्यार करते करते हम तुम कही खो जाएंगे 
इन्ही बहारों के आँचल में थक के सो जाएंगे 
सपनों को फिर भी तुम यूँ ही सजाते रहना 
कभी अलविदा ना कहना.... 

(ही जीवनाची वाटचाल करता करता) स्नेह, माया, प्रेम करीत आपण बाकी सारे विसरून जाऊ आणि दमलो तर याच प्रेमाच्या वसंत ऋतूत निद्रा घेऊ; पण तेव्हाही स्वप्नातही हा प्रेमाचा बगीचा फुलवत राहू! 

बीच राह में दिलवर बिछड जाएं कही हम अगर 
और सूनी सी लगे तुम्हें, जीवन की ये डगर 
हम लौट आएंगे तुम यूँ ही बुलाते रहना 
कभी अलविदा ना कहना... 

जीवनाच्या वाटचालीत कोठे आपली ताटातूट झाली आणि जर तुम्हाला हा जीवनाचा मार्ग सुना सुना वाटायला लागला, तर तुम्ही मला बोलवा मी नक्कीच परत येईन; पण ही अखेरच्या निरोपाची (अलविदा) भाषा करू नका. 

रसिकहो, १९७६च्या ‘चलते चलते’ चित्रपटातील हे गीत किशोरकुमार यांनी गायले होते. बाप्पी लाहिरींनी संगीतात गुंफलेले हे गीत अमित खन्ना यांनी लिहिले होते. आता बाप्पी लाहिरी, अमित खन्ना ही नावे ‘सुनहरे गीत’ या संदर्भात येतील की नाही, याबाबत मतमतांतरे असतील; पण मी हे गीत अर्थाच्या दृष्टिकोनातून येथे घेतले. हे गीत केवळ प्रेयसी-प्रियकराच्या संदर्भातील नसून, ते कलेवर प्रेम करणाऱ्यांसाठीही आहे, असे मला वाटते. 

हे गीत जलद ताला-सुरातील आहे; पण याच गीताचे एक कडवे संथ गतीतही आहे आणि ते केवढे आशयसंपन्न आहे बघा! म्हणूनच या समारोपाप्रसंगी मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचे आहे, की - 

अलविदा तो अंत है अंत किसने देखा 
ये जुदाई ही मिलन है, जो हम ने देखा 
यादों में आकर तुम यूँही गाते रहना 
कभी अलविदा ना कहना

बस एवढेच! इति लेखनसीमा!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे ‘सुनहरे गीत’ हे सदर आता समाप्त झाले असून, त्या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर वाचण्यासाठी एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रतिभा सोमवंशी About 86 Days ago
मी खुप उशीराने हे अॅप डाऊनलोड केले होते. परंतु तुमचे सर्व लेख मी वाचलेत.......खुप छान माहिती मिळाली,गीतांचे रसग्रहण अप्रतिम.....👌👌
1
0
जनार्दन अनपट. सातारा रोड (सातारा)महाराष्ट्र About 87 Days ago
पाठकजी साहेब .. आपण अनमोल खजिना उलगडून दाखवलात,, आभारी आहोत.
1
0
Smita janwakar About 87 Days ago
Please don't stop this best work of entertaining peoples like very much your all songs . Thanks
1
1

Select Language
Share Link
 
Search