Next
‘अनादि मी, अनंत मी’ : ध्वनिनाट्य रूपात ऐका सावरकरांची जीवनगाथा
BOI
Tuesday, May 28, 2019 | 11:33 AM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. हे ध्वनिनाट्य सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून, आजपासून (२८ मे) १२ भागांत प्रसिद्ध होणार आहे. ते डिजिटल माध्यमांवर मोफत उपलब्ध होणार असून, ‘ऑडिओ बुकगंगा’वरही ऐकता येणार आहे. मूळ नाटकाच्या निर्मितीपासून ध्वनिनाटकाच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास सांगताहेत ध्वनिनाट्याचे निर्माते ओंकार खाडिलकर...
........
इसवी सन १९८३-८४चा तो काळ!

साधारणपणे ज्या काळात, बहुतेक आई-वडील आपल्या चार ते सहा वर्षांच्या लहानग्यांना बागेत किंवा मोकळ्या जागी फेरफटका मारायला नेतात, अशा सुमारास माझे वडील, ज्येष्ठ नाट्यरंगकर्मी माधव खाडिलकर मात्र एका अनोख्या वैचारिक अग्निकुंडाचा घाट घालत होते. भारताने क्रिकेटचा विश्वचषक अनपेक्षितपणे प्रथमच जिंकला होता; पण बाबा मात्र मुंबईतील आमच्या विलेपार्ल्याच्या घरात एक अलौकिक ऐतिहासिक कहाणी साकार करण्याची तयारी करत होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिकारक, प्रखर देशभक्त, ज्येष्ठ साहित्यकार, समाजसुधारक, विज्ञानवादी विचारवंत, द्रष्टे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ज्वलंत आयुष्याचा रंगमंचीय आविष्कार दाखविणारं अनोखं नाट्यशिल्प ते शब्दांकित करत होते. बरोबरीने, आई सुप्रसिद्ध गायिका आशाताई खाडिलकर, यांच्या सांगीतिक प्रतिभेच्या समिधा त्या शाब्दिक अग्निकुंडाला सतत चेतवत होत्या. 

रोमांचकारी निवेदन माध्यमातून फुललेल्या नाट्य कलाकृतीच्या प्रत्येक टप्प्याचे जिवंत साक्षीदार होण्याचं आणि त्यामधून नकळत घडणाऱ्या संस्कारांना आपलंसं करण्याचं भाग्य आम्हा भावा-बहिणीला लाभलं. आमची विचारसरणी त्या संस्कारांच्या तेजस्वी प्रभेमध्ये नकळत तावून-सुलाखून निघत होती. मनाला प्रज्ज्वलित करणे म्हणजे काय, ह्याचं काहीसं प्रत्यंतर त्या पर्वानं आम्हाला दिलं. बाबांनी पार्ल्यातल्या शाळा-कॉलेजांमधली तरुण मुलं-मुली हळूहळू एकत्र केली आणि तीन-साडेतीन महिन्यांच्या अथक, अविरत आणि कधी कधी अविचारी वाटणाऱ्या त्या प्रयत्नांचा नाटकीय आविष्कार मे १९८४मध्ये लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात जवळजवळ एक-दीड हजार लोकांच्या साक्षीने सादर झाला. ‘अनादि मी, अनंत मी’ या नावानं सावरकर जीवनदर्शनाची तेजस्वी गाथा साकारण्याचं भाग्य माझ्या आई-बाबांना लाभलं. 

रोमांचकारी इतिहासाचं दर्शन घडविणाऱ्या ह्या नाट्यकलाकृतीचा पहिला व्यावसायिक प्रयोग २६ फेब्रुवारी १९८४ रोजी दादरच्या शिवाजी मंदिरात बहुसंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादर झाला. १९८५ साली नाटकाच्या पुस्तकाचं प्रकाशन लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’च्या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनोळखी भारतीयांच्या उपस्थितीत झालं. पुस्तकाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांची बेधडक आणि दिलखुलास प्रस्तावना तर लाभलीच; पण विशेष लक्षणीय वाङ्मयनिर्मितीसाठी, लेखनासाठी महाराष्ट्र शासनाचा आणि नाट्यदर्पण प्रतिष्ठानचा संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार ह्या नाटकाला मिळाला. नाटकाचे व्यावसायिक स्वरूपात जवळजवळ दीडशे प्रयोग १९८५-१९९० या कालावधीत झाले. नाट्याभिवाचन स्वरूपात इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडामध्ये प्रयोग सादर झाले. मुंबईच्या दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ मे १९८९ रोजी ह्याच नाटकाने झाले. त्या प्रयोगात बाल सावरकरांचं ‘माझी मातृभूमी’ या विषयावरचं निबंधात्मक भाषण करण्याचं अहोभाग्य मला स्वतःला लाभलं. 

नाटकाच्या तालमीत बाजूला समूहगान करता करता हळूहळू बाल-सावरकरांचं वक्तृत्व मी आत्मसात केलं आणि काही ठराविक प्रयोगांमध्ये कामही केलं. मी आणि माझी बहीण शाळा-कॉलेजमध्ये गेलो आणि नेहमीचं शैक्षणिक जीवन सुरू झालं; मात्र खरं सांगायचं तर, त्या काळाचा खरा प्रभाव आम्हा भावा-बहिणीला उमगेपर्यंत मध्यंतरी बराच काळ उलटून गेला. नंतर आम्ही नोकरी-व्यवसायात मग्न झालो; पण सावरकर ह्या अकल्पित प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाचे ठसे आमच्या वाढत्या वयाच्या मनांमध्ये कायमचं घर करून राहिले, हे मात्र खरं! अथक त्याग, बलिदान, क्रियाशीलता, सचोटी, जिद्द, धैर्य, निश्चयी, साहित्यिक, विज्ञानवादी विचारसरणीचे संस्कार आम्हाला पुढे आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर मदतीचा आणि मार्गदर्शक हात देत राहिले. 

आम्ही हे सगळं पाहिलं, तेव्हाही भारत स्वतंत्र होता; आणि आजही आपण स्वातंत्र्य लोकशाही पद्धतीनं अनुभवण्याचा प्रयत्न करीत आहोत; पण बहुतेक सामान्य नागरिकांना, स्वातंत्र्याचा अर्थ खऱ्या अर्थानं समजला का, हा विचार ज्यानं-त्यानं सतत करणं जरूरीचं आहे. मनमिळावू वृत्ती जपून आणि परिश्रम चालू ठेवून, काही पराभवांच्या चटक्यातून सावरून समर्थपणे अविरत पुढे चालण्याची भावना आपल्या बहुतेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय राहणीमानामध्ये अजूनही दिसत नाही. आपल्या सर्वधर्मसहिष्णुतावादी अखंड भारतात ब्रिटिशांनी भारतीयांना एकत्रित येण्यापासून परावृत्त करून दीडशे वर्षं जखडून ठेवलं. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ सत्तर वर्षांच्या टप्प्यावर येऊनही आपण अजूनही एकमेकांना दूर करून, जातिभेदांना साकडं घालत, देशाच्या संरक्षणाबाबत दूरदर्शी न राहता, आपल्याच गौरवशाली इतिहासाकडे दुर्लक्ष करत, आपापलं घोडं पुढे दामटविण्याच्या प्रवृत्तीला अजूनही आळा घालू शकलेलो नाही. त्या वेळी इस्ट इंडिया कंपनीच्या नावानं भारत व्यापला गेलेला होता आणि आज विशेषतः तरुण पिढी हळूहळू वेस्टर्न इंडिया होण्याच्या दिशेने मार्गस्थ आहे. 

२०१६ साली स्वा. सावरकरांच्या ५०व्या आत्मार्पण स्मृती वर्षानिमित्ताने ‘अनादि मी, अनंत मी’ नाटकाचं नाट्याभिवाचन स्वरूपात पुनर्निर्माण करण्याच्या ईर्ष्येने मला चेतना दिली.! त्यानंतर पुण्या-मुंबईतल्या २५-३० तरुण हौशी कलावंतांना, गायक-वादकांना आणि तंत्रज्ञांना हाताशी धरून ह्या नाटकाची उलाढाल नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही जमेल तशी सुरू केली. आमचे प्रयत्न आणि बऱ्यापैकी चांगल्या होत असलेल्या तालमी पाहून बाबांनी मला ‘ह्याचं पुन्हा पूर्ण स्वरूपात नाटक सादर कर’ असं प्रोत्साहन आणि विश्वास दिला. 

पहिल्याच प्रयोगाला पुण्याच्या ऐतिहासिक भरत नाट्य मंदिरात रसिकांनी ‘हाउसफुल’ असा अनपेक्षित, प्रचंड प्रतिसाद दिला. जवळजवळ ३०० लोकांना आम्हाला नाट्यगृहाबाहेरूनच परत पाठवावं लागलं. तेव्हा आम्हाला थोडी जाणीव झाली, की आपण जे काही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ते सर्वसामान्यांना आवडत आहेत. त्याबरोबरीनेच माझ्या पिढीतले किमान २० तरुण हौशी कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांपर्यंत स्वा. सावरकरांचे पूर्ण जीवनचरित्र आपण ह्या माध्यमातून पोहोचवू शकलो, ह्याचं मनोमन समाधानही मिळालं. 

त्यानंतर आतापर्यंत पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, सांगली, औरंगाबाद, वाई, पारनेर, रत्नागिरी अशा विविध प्रमुख केंद्रांवर सादर झालेल्या जवळजवळ २०पेक्षा जास्त प्रयोगांवेळी कुठलीही प्रापंचिक, आर्थिक अपेक्षा ठेवलेली नव्हती. केवळ जास्तीत जास्त लोकांना ह्या अनोख्या जीवनकहाणीचा अनुभव घेता यावा आणि खर्चाची तोंडमिळवणी व्हावी इतपत अपेक्षा ठेवून हे प्रयोग सादर झाले आणि प्रत्येक प्रयोग प्रेक्षकांनी उचलून धरला! अमेरिकेत बे एरिया, कॅलिफोर्निया आणि सिअॅटल, वॉशिंग्टन येथेही ह्या कलाकृतीचे एकपात्री नाट्याविष्कार सादर झाले आहेत. 

कोणत्याही नाटकाच्या प्रयोगासाठी प्रेक्षक उठून नाट्यगृहात जावेत, ही किमान अपेक्षा असतेच. त्यामुळे कोणताही नाट्यप्रयोग विनामूल्य सादर केला, तरीही किती प्रयोग, कोणत्या ठिकाणी, किती प्रेक्षक अनुभवू शकतील ह्यालाही मर्यादा आलीच. 

स्वा. सावरकर हे महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणात, समाजकारणात, तसंच शैक्षणिक जीवनात विविध कारणांमुळे आतापर्यंत दुर्लक्षित आणि बहुतांशी चुकीच्या तऱ्हेनं समजलं गेलेलं व्यक्तिमत्त्व. अजूनही बहुतेक शालेय इतिहासाच्या पुस्तकात केवळ क्रांतिकार्य, अंदमानचा बंदिवास, जयोस्तुते आणि बोटीतून उडी मारलेले एक स्वातंत्र्यसेनानी एवढीच माहिती आहे. काही साहित्यामध्ये त्यांना खुजं ठरविण्यात धन्यता मानण्यात आली आहे. त्यापलीकडचे त्यांचे शतपैलू व्यक्तिमत्त्व आणि सर्वांगीण विचारधारा समजून घेण्याचा प्रयत्न काही अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक सोडता कोणाला पचनी पडत नाही. 

आताचा जमाना तर सोशल मीडिया, स्मार्टफोन्स, संगणकीय तंत्रज्ञानाचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कल नेहमीच अद्ययावत गोष्टी आणि तंत्रज्ञान आत्मसात करून उपयागोत आणण्याकडे राहिला. तेव्हा ‘अनादि मी, अनंत मी’ ह्या नाट्यकलाकृतीच्या माध्यमातून, मराठी भाषेतील सर्वोच्च दर्जाची एक उत्तम नाट्यसंहिता आणि स्वा. सावरकरांची समग्र जीवनगाथा नव्या पिढीला पुन्हा एकदा सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत व्हावी, स्वा. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची आणि त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाची ओळख नव्या पिढीला व्हावी, ह्या उद्देशानं सावरकर जयंतीदिनापासून (२८ मे २०१९) ‘अनादि मी, अनंत मी’ ह्या महानाट्याचं ध्वनिनाट्य स्वरूपातलं (ऑडिओ ड्रामा) रूपांतरण विविध डिजिटल माध्यमांद्वारे प्रकाशित होत आहे. 

ओघवत्या निवेदनाद्वारे सावरकरांच्या धगधगत्या आयुष्याचं नाट्यपूर्ण कथन करतानाच, आरती, देशभक्तिपर गीतं, भाषणं, ओव्या, फटके, पोवाडे, नाट्यप्रवेश, अंदमानातील विविध प्रसंग अशा पैलूंनी सजलेलं हे ध्वनिनाट्य तरुणांना, इतिहासतज्ज्ञांना माहीत नसलेले अनेक पैलू प्रकाशात आणेल. सुप्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत संयोजक आदित्य ओक आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध ध्वनिसंयोजक मंदार कमलापूरकर ह्या मित्रवर्य कलाकारांच्या तांत्रिक परीसस्पर्शानं उजळून निघालेलं नव्या स्वरूपातलं ‘अनादि मी, अनंत मी’ हे ध्वनिनाट्य सर्व इतिहासप्रेमी, राष्ट्राभिमानी आणि कलाप्रेमी रसिकांना आवडेल, ह्याची खात्री आहे. 

हे ध्वनिनाट्य उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आणि ‘रिव्हर्ब कट्टा’ ह्या डिजिटल मनोरंजन मीडियाच्या सहकार्याद्वारे संपूर्णत: विनामूल्य स्वरूपात www.revebkatta.in ह्या संकेतस्थळावर, तसंच, ऑडिओ बुकगंगा, स्नॉव्हेल इत्यादी ऑडियो अॅप्स आणि ‘अनादि मी अनंत मी’ यू-ट्यूब चॅनलवर उपलब्ध असणार आहे. मूळ नाटक अडीच तासांचं असलं, तरी सर्वांना ते सलग ऐकणं शक्य होणार नाही हे लक्षात घेऊन सुमारे १५ मिनिटांच्या १२ भागांत एखाद्या नाट्यपूर्ण गोष्टीसारखं हे ध्वनिनाट्य तयार करण्यात आलं आहे. रसिकांना, त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार घरबसल्या किंवा प्रवास करताना ते अनुभवता येईल. सर्व शालेय आणि महाविद्यालयीन मुलांनी ही नाट्यपूर्ण गाथा आवर्जून ऐकावी आणि आत्मसात करावी, ह्यासाठी पार्श्वसंगीताचा प्रभावी वापर केला गेला आहे. 

ह्या नाट्यगाथेच्या रूपानं प्रत्येकात कुठेतरी लपलेल्या राष्ट्राभिमानी वृत्तीला जागविण्यासाठी ह्या कलाकृतीचा एक जरी शब्द आणि क्षण कामी आला आणि स्वा. सावरकरांचं खरं समग्र धगधगतं आयुष्य आणि विचार श्रोत्यांना समजले, तरी आमचा संकल्प सिद्धीस गेला, असे आम्ही समजतो. 
धन्यवाद.

- ओंकार खाडिलकर, ‘अनादि मी, अनंत मी’ ध्वनिनाट्याचे निर्माते
............
(ध्वनिनाट्याचा पहिला भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. या ध्वनिनाट्याचे १२ भाग आजपासून दर मंगळवारी ऑडिओ बुकगंगा या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहेत.)

पहिल्या भागाबद्दल....

सव्वा-शतकाहूनही अधिक काळ भारतीय उपखंड ब्रिटिश राजवटीच्या आधिपत्याखाली होरपळून निघाला होता. इसवी सन १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धापासून स्फूर्ती घेऊन, ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या अनेक आद्य क्रांतिकारकांना हौतात्म्य पत्करावं लागलं; पण १८८३साली नाशिकजवळ भगूर इथं, एका युगपुरुषाचा, साक्षात श्री विनायकाचा सावरकर कुटुंबात जन्म झाला. प्लेग आणि महामारीच्या आजारांमुळे लहानपणीच आई-वडिलांच्या मायेला मुकाव्या लागलेले सावरकर बंधू आणि येसूवहिनी ह्यांनी नाशकास प्रयाण केलं आणि विनायकाचं व्यक्तिमत्त्व बहरू लागलं. ‘माझी मातृभूमी’ ह्या विषयावर, शालेय वयात लिहिलेल्या निबंधातून त्याच्या मनातील देशप्रेमाच्या पाऊलखुणा सर्वांच्या दृष्टिक्षेपात आल्या.
  
लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट


..........

सावरकरांचे विविध पैलू उलगडणारे लेखन वाचण्यासाठी खालील शीर्षकांवर क्लिक करा.  

रत्नागिरीतील प्रेरणादायी सावरकर स्मृतितीर्थ

सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search