Next
दर शनिवारी दप्तराविना शाळा
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम
संदेश सप्रे
Saturday, October 20, 2018 | 10:37 AM
15 0 0
Share this article:देवरुख :
शाळकरी मुलांच्या पाठीवरचे ओझे हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यावर अनेक उपाय सुचविण्यात आलेले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र अगदी नगण्य. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळच्या पूर गावातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार दप्तराविना असतो. शनिवारी हे विद्यार्थी अभ्यास तर करतातच; पण अन्य विविध उपक्रम राबवतात आणि एक वेगळी ऊर्जा घेऊन घरी जातात. 

अभ्यासक्रमाच्या सगळ्या विषयांची पुस्तके, वह्या, चित्रकला वही, कंपासपेटी, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा असे भरगच्च भरलेले दप्तर घेऊन ओझे दिल्याप्रमाणे चालणारे विद्यार्थी ग्रामीण भागातही दिसतात. इंग्रजी माध्यमाची तर कथाच वेगळी. यामुळे विद्यार्थ्यांना बालवयातच पाठीचे दुखणे उद्भवू लागले आहेत. हे ओझे वाढतच निघाल्याने याविषयी तक्रारी वाढत निघाल्या. राज्य सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न जरूर केले; मात्र त्याला हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. 

पूर या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने मात्र यावर उपाय राबवण्यासाठी पुढाकार घेतला. दर शनिवारी शाळेत कोणी दप्तर आणायचेच नाही, असा निर्णय सहा ऑक्टोबरला घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ‘एक दिवस दप्तराविना’ म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच; पण दप्तर नाही म्हणजे अभ्यास नाही, असे नव्हते. उलट अभ्यासक्रमाचे चार टप्पे ठरवण्यात आले. तसे वेळापत्रक आखण्यात आले.

दर शनिवारी सकाळी मुले शाळेत जमली की प्रार्थना, हजेरी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात इंग्रजी परिपाठ होतो. दुसऱ्या टप्प्यात व्यायाम, कवायती, योगासने, मनोरंजक खेळ होतात. तिसऱ्या टप्प्यात इंग्रजी कविता म्हणणे, संभाषण सादरीकरण हे उपक्रम राबवले जातात. चौथ्या टप्प्यात ग्रंथालयातील आपल्या आवडीचे पुस्तक वाचून त्यावर चर्चा करणे, नव्या पुस्तकांचा परिचय, कथाकथन, तसेच संगणक शिक्षण, परिसर भेट व मैदानी खेळ आदी बाबींचा समावेश असतो. अशा तऱ्हेने शाळेचा दिवस पूर्ण होतो. 

शाळेतील शिक्षक महावीर कांबळे आणि सहकाऱ्यांनी ही आगळीवेगळी संकल्पना राबवली असून, ती यशस्वी होत आहे. यामुळे एक दिवस का होईना, दप्तराचे ओझे तर कमी झालेच. शिवाय अवांतर वाचन व मैदानी खेळ, व्यायाम अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रमांना अधिक वेळ मिळाला आहे. 

पूर शाळेच्या या अनोख्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी परिसरातील शाळांचे शिक्षक शनिवारी येथे भेट देत आहेत हे विशेष. अशा पद्धतीचे उपक्रम विविध शाळांमध्ये राबवले गेले, तर जास्तीत जास्त मुले मोकळा श्वास घेऊ शकतील आणि अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतील.

संपर्क : महावीर कांबळे – ९५२७८ २६१८१

(या उपक्रमाचा शाळेने उपलब्ध करून दिलेला व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 33 Days ago
Worth trying. Will. Make attendane less boring .
0
0
Rakesh jayram kamble About 181 Days ago
सर तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत तरीही संपूर्ण टिमला मानाचा मुजरा
0
0

Select Language
Share Link
 
Search