Next
‘जीएसटी’चा ताळमेळ सोप्या पायऱ्यांमध्ये
BOI
Wednesday, December 12, 2018 | 01:44 PM
15 0 0
Share this article:

वस्तू आणि सेवा कराखालील (जीएसटी) ताळमेळ म्हणजे दुसरे काही नाही, तर पुरवठादाराने सादर केलेला डेटा त्याच्या पावत्यांसोबत जुळवणे आणि त्या विशिष्ट कालावधीत झालेल्या सर्व व्यवहारांची नोंद करणे. जीएसटी विवरणपत्रात विक्री किंवा खरेदीचा कोणताही व्यवहार गाळला जाणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने सादर होणार नाही हे ताळमेळ जुळवण्याची प्रक्रिया निश्चित करते. करदात्याने पात्र इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी (आयटीसी) दावा करता यावा म्हणून त्याच्याजवळचा डेटा नियमितपणे व्हेंडरजवळच्या डेटाशी जुळवून घेतला पाहिजे. ताळमेळ जुळवण्याची प्रक्रिया सुलभ आहे; पण ती वेळखाऊ ठरू शकते, कारण यामध्ये आयटीसी दाव्यांवर परिणाम करू शकतील अशा तफावतीवर किंवा विसंगतीवर करदात्याला सातत्याने बारीक लक्ष ठेऊन राहावे लागते. एरवी किटकट भासणाऱ्या या प्रक्रिया ‘क्लीअरटॅक्स’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता यांनी काही सोप्या पायऱ्यांमध्ये स्पष्ट केल्या आहेत.
-----------------------------------------------------------------
आर्थिक वर्ष २०१७-१८ साठीच्या ‘जीसीटी’ ताळमेळ जुळवणी प्रक्रियेत, करदात्यांना सर्व नियतकालिक ‘जीएसटी’ विवरणपत्रे सादर करणे सक्तीचे आहे. एखाद्या जीएसटी विवरणपत्राची मुदत उलटली, तरीही ते लागू विलंबशुल्क किंवा व्याजासह सादर झालेच पाहिजे. जोपर्यंत ‘जीएसटी’ विवरणपत्र सादर होणार नाही, तोवर ताळमेळ जुळवणी व समायोजनाची प्रक्रिया सुरूच होणार नाही. करदात्यांना त्यांच्या लेखापुस्तिका अद्ययावत ठेवत राहाव्या लागतील आणि त्यानुसार कर विवरणपत्र जुळवून घ्यावे लागेल. जोपर्यंत सर्व ‘जीएसटी’ विवरणपत्रे सादर होत नाहीत, तोपर्यंत करदाता आयटीसीसाठी नीट दावा करू शकणार नाही.

याशिवाय, करदात्याने लेखापुस्तिकांमधील विसंगती ओळखून त्या एंट्रीज दुरुस्त केल्या पाहिजेत. आगामी ‘जीएसटी’ रिटर्न सादर करण्याच्या कालावधीतही त्यांनी या तपशिलांमध्ये बदल केले पाहिजेत. मागील काळात सादर झालेल्या कर विवरणपत्रांमध्ये बदल करण्याची परवानगी ‘जीएसटी’ कायदा देत नाही; मात्र पुढील नियतकालिक विवरणपत्रात सुधारणेसाठी रिटर्न भरून सुधारित एंट्रीज सादर करण्याची परवानगी हा कायदा देतो. या सुधारित एंट्रीज ‘जीएसटीआर वन’ आणि ‘जीएसटीआर थ्रीबी’ यांमधून सादर केल्या पाहिजेत.

अर्चित गुप्तातुमची खरेदीची नोंदवही ‘जीएसटीआर थ्रीबी’सोबत (महिनावार अपलोड केलेले) आणि ‘जीएसटीआर टूए’ (पुरवठादाराने अपलोड केलेले) जुळणारी आहे याची खात्री काळजीपूर्वक करून घ्या. लेखापुस्तिका, ‘जीएसटीआर-थ्रीबी’ रिटर्न आणि ‘जीएसटीआर-टूए’ हे फॉर्म्स सुसंगत असणे खरेदीवरील पूर्ण आयटीसीसाठी दावा करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा करदात्याला पूर्ण आयटीसी मिळणार नाही आणि अखेरीस अतिरिक्त कर भरावा लागेल.

लेखापुस्तिका आणि ‘जीएसटी’ विवरणपत्रामध्ये समानता असणे आयटीसी दाव्यांसाठी निर्णायक आहे. शिवाय, करदात्यांनी, खरेदीवरील आयटीसीसाठी दावा करताना, विरुद्ध शुल्क यंत्रणेखाली (रिव्हर्स चार्ड मेकॅनिझम) भरलेल्या करांवरही बारीक नजर ठेवली पाहिजे. अर्थात, वस्तू आणि/किंवा सेवा व्यापाराच्या हेतूने वापरल्या गेल्या असतील किंवा जाणार असतील, तरच करदात्याला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमखाली भरलेल्या करांवर क्रेडिट मिळू शकते.

उत्तम संवाद ही गुरूकिल्ली आहे, विशेषत: विक्रेते आणि ग्राहकांमधील संवाद महत्त्वाचा आहे. या समन्वयामुळे ‘जीएसटी’ विवरणपत्रांमधील तपशील एकसमान सादर होतात. विसंगती, एंट्रीज गाळल्या जाणे, पुरवठादार आणि ग्राहकांनी (रेसिपिअंट) आपापले तपशील एकमेकांशी व्यवस्थित जुळवून ‘जीएसटी’ विवरणपत्रे भरली असतील, तर चुकीच्या एंट्रीज भरल्या जाणे याच्या शक्यता बऱ्याच अंशी कमी होतात. ‘जीएसटी’ची पूर्तता न करणारे विक्रेते शोधून काढणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि समस्यांचे निराकरण करणे हेही खूप महत्त्वाचे आहे; यामुळे आयटीसी अधिकाधिक मिळण्यात मदत होते. आता, प्रगत ताळमेळ सॉफ्टवेअर्समुळे पुरवठादार व ग्राहक (रेसिपिअंट) यांच्यातील संवादाची दरी भरून काढण्यात मदत होऊ शकते. या सॉफ्टवेअरमुळे वापरकर्त्याला विक्रेता किंवा पुरवठादाराला ताळमेळातील विसंगतीची माहिती पाठवणे व यातून निर्माण होणाऱ्या समस्येचे निराकरण करणे शक्य आहे.

अखेरीस, करदात्याने आर्थिक वर्ष २०१७-१८मधील विक्री व खरेदी व्यवहारांतील सर्व सुधारित तपशील सप्टेंबर विवरणपत्रात भरले पाहिजेत. सप्टेंबर २०१८ची विवरणपत्रे २० ऑक्टोबर २०१८पर्यंत सादर करायची आहेत. आर्थिक वर्ष २०१७-१८साठीच्या कर विवरणपत्रांतील सर्व तफावती दुरुस्त करण्याची ही अखेरची संधी आहे.
 
मागील महिन्यांमध्ये आयटीसीसाठी दावा न केलेले सर्व करदाते पुढील महिन्याच्या विवरणपत्रांत दावा करू शकतात; मात्र वार्षिक विवरणपत्र म्हणजेच ‘जीएसटीआर-नाइन’ सादर होण्यापूर्वी किंवा त्यानंतरच्या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये विवरणपत्र भरण्यापूर्वी (यातील जे काही लवकर असेल तेव्हा) हा दावा केला पाहिजे. पूर्वी सादर केलेल्या विवरणपत्रात कोणतीही सुधारणा किंवा बदलही याच मुदतीत केला जाऊ शकतो. आर्थिक वर्ष २०१७-१८मधील तपशिलांमधील कोणतेही बदल २० ऑक्टोबर २०१८पूर्वी करणे आवश्यक आहे.

‘जीएसटी’चा ताळमेळ जुळवणे ही पुन:पुन्हा करावी लागणारी प्रक्रिया आहे. कमाल परतावा मिळवण्यासाठी, तसेच मोठ्या प्रमाणावरील विसंगती टाळण्यासाठी ही प्रक्रिया नियमित काळाने करत राहिले पाहिजे. करदात्याने त्याच्या शंका ग्राहक (रिसिपिअंट) किंवा विक्रेत्यापर्यंत लवकरात लवकर पाहोचवून अचूक विवरणपत्रे सादर केली पाहिजेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search