Next
जलमित्र अभियानातून वाचवणार ५० लाख लिटर पाणी
पाणी बचतीसाठी अमनोरा येस फाउंडेशनचा पुढाकार
BOI
Wednesday, July 24, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this article:

जलमित्र अभियानाचे उद्घाटन करताना अमनोरा येस फाउंडेशनचे संस्थापक अनिरुद्ध देशपांडे, ‘सेवावर्धिनी’चे कार्याध्यक्ष किशोर देसाई व मराठी अभिनेत्री श्रुती मराठे

पुणे : उन्हाळ्याच्या व पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या की पाणीबचतीचे महत्त्व, त्याबद्दलची जागृती एकदम वाढते; मात्र पाऊस पडायला लागला की पाणीबचत आणि जलसंवर्धन याकडे आपले दुर्लक्ष होते. अशा वेळी जलसाक्षरता वाढावी व जलसंवर्धन व्हावे या उद्देशाने अमनोरा येस फाउंडेशनतर्फे ‘जलमित्र अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत पुढील सहा महिन्यांत प्रतिदिन तब्बल ५० लाख लिटर पाणी वाचविणे हे आमचे उद्दिष्ट असणार आहे,’ अशी माहिती अमनोरा येस फाउंडेशनचे संस्थापक अनिरुद्ध देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अमनोरा येस फाउंडेशनचे हे जलमित्र अभियान ‘सेवावर्धिनी’ या जलसंवर्धन विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून, त्यात ‘अमनोरा’मधील तब्बल १८०० घरकाम करणाऱ्या महिला व गाडी धुणाऱ्या कामगारांना पाणीबचतीचे धडे देण्यात येणार आहेत. ‘अमनोरा’ येथे झालेल्या कार्यक्रमात येस फाउंडेशनचे संस्थापक अनिरुद्ध देशपांडे, सेवावर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष किशोर देसाई व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या उपस्थितीत जलकलशाचे पूजन करीत या अभियानाला सुरुवात झाली.   


या उपक्रमाची अधिक माहिती देताना देशपांडे म्हणाले, ‘जलसंवर्धन आणि जलसाक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन अमनोरा टाउनशिप मागील आठ वर्षांपासून या विषयात  सक्रियपणे काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रतिदिन तब्बल २५ लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर ‘अमनोरा’मध्ये केला जात आहे; मात्र आता त्यापुढे जात जलसाक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने भरीव कामगिरी करण्याच्या उद्देशाने आम्ही ‘जलमित्र अभियान’ हाती घेतले आहे. या उपक्रमाची सुरुवात आम्ही अमनोरा टाउनशिपपासून करीत असून, याद्वारे जलसाक्षरता व्हावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करायला सुरुवात केली आहे. यात आमच्या येथील एक हजार ७६१ घरकाम करणाऱ्या महिला व कार धुणारे ३०० कामगार सहभागी होणार असून, त्यांना सेवावर्धिनीच्या मदतीने प्रशिक्षित करण्यात येईल. सेवावर्धिनीच्या वतीने ग्रामीण भागात जलदूत तयार करण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. हे काम आजवर केवळ ग्रामीण भागात होत होते आता जलमित्र अभियानामार्फत हे काम शहरी भागातही सुरू होणार आहे.’

‘अमनोरा पार्क टाउनमध्ये आज तब्बल पाच हजार ५०० कुटुंबीय राहतात. या प्रशिक्षित जलमित्रांच्या मदतीने पाणीबचत करून आपण प्रतिदिन सुमारे १० ते १२ लाख लिटर पाणी हे केवळ ‘अमनोरा’मध्ये वाचवू शकतो. ‘अमनोरा’च्या आजूबाजूचा परिसर आणि उर्वरित पुण्याचा विचार केला, तर हा आकडा आणखी वाढणार असून, शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या जलबचतीबरोबरच विशेष बाब म्हणेज या उपक्रमात घरकाम करणाऱ्या महिला, कार वॉशर्स हे सदिच्छादूत असणार आहेत. जलसंवर्धनाच्या प्रशिक्षणाबरोबरच या अभियानाद्वारे या महिलांना आत्मसन्मान मिळणार आहे,’ असे देशपांडे यांनी सांगितले.

घरकाम करणाऱ्या महिला व कार धुणाऱ्या कामगारांना पाणी बचतीचे प्रशिक्षण

केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता यामधून नजिकच्या भविष्यात १०० ‘चॅम्पियन्स’ आणि त्यामधून ५० ‘मास्टर्स’ तयार करण्याचा आमचा मानस असून, हे पुढे जाऊन उर्वरित जलमित्रांना तयार करतील. अशा पद्धतीने अमनोरा टाउनशिपमध्ये तयार झालेल्या या जलमित्रांना हडपसर, कोंढवा व केशवनगर भागातही काम करून पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करण्यात येईल. या धर्तीवर पुढील सहा महिन्यांत प्रतिदिन तब्बल ५० लाख लिटर पाणी वाचविणे हे आमचे उद्दिष्ट्य असणार असल्याचेही देशपांडे यांनी नमूद केले.


‘आपल्या घरात काम करायला येणाऱ्या महिलांना आपण पाणी बचतीसंदर्भात काही प्रमाणात का होईना साक्षर करू शकलो, तर वाया जाणारे पाणी आपण वाचवू शकू असा विचार आमच्या मनात आला. हे करीत असताना आपण पाण्यासारखी राष्ट्रीय संपत्ती वाचवीत आहोत, त्याचे संवर्धन करीत आहोत याची जाणीव या घरकाम करणाऱ्या महिलांना होईल आणि राष्ट्रीय कर्तव्याची ही भावना त्यांच्यासाठी अभिमानाची व आत्मसन्मान वाढविणारी ठरेल, असा आमचा विश्वास आहे. प्रशिक्षित झाल्यानंतर या महिलांचा सक्रिय सहभाग तर वाढेलच याबरोबर त्यांच्यासारख्या जास्तीत जास्त महिलादेखील यात सहभागी होतील, तसेच पाणी बचतीचे महत्व पटू लागल्यावर नजीकच्या भविष्यात या भागातील मोठ्या सोसायट्यांमध्ये आम्ही ‘वॉटर मीटर’ बसवू. जेणेकरून दर महिन्याला किती पाणी वापरले गेले आणि किती बचत व्हायला सुरुवात झाली याचा अंदाज येईल. यातून पाणी बचतीच्या स्पर्धेची मानसिकता तयार होईल जी उपयुक्त ठरेल’, असे देशपांडे यांनी सांगितले. 

जलमित्र अभियानासाठी घरकाम करणाऱ्या महिला याच आपल्या सदिच्छादूत असणार असून, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण पुढील तीन महिन्यांत देण्यात येईल या प्रशिक्षणामध्ये जलसंवर्धनाचे महत्त्व, जलबचतीचे सोपे, पण उपयुक्त उपाय यांची माहिती त्यांना देण्यात येईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search