Next
नाशिकची संजना ठरतेय किन्नर समाजाचा आदर्श
BOI
Thursday, September 20, 2018 | 02:16 PM
15 0 0
Share this article:नाशिक :
  किन्नर समाजाला कायम उपेक्षेला सामोरे जावे लागते. तरीही त्यातील काही व्यक्तींनी आपल्या कृतीतून साऱ्या समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. नाशिक रोड येथील संजना मनोहर महाले ही त्यापैकीच एक. ती चहा आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय करून स्वतःचा चरितार्थ तर चालवतेच, पण समाजकार्यही करते. तिला समाजाचीही उत्तम साथ मिळते आहे. 

साधारणपणे किन्नर समाजातील माणसे नुसते पैसे मागून जगतात, असा एक समज सर्वदूर पसरलेला आहे. तो समज अगदीच चुकीचा नसला, तरी सगळेच किन्नर तसे नसतात. आधीच त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन वेगळा असतो. त्यात पुन्हा ते विनाकारण पैसे मागत असले, तर त्यांची आणखी अवहेलना होते. म्हणूनच संजना ऊर्फ राणीने स्वतःच्या पायावर उभे राहायचे ठरवले आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला.

आपण किन्नर आहोत, हे वयाच्या अकराव्या वर्षी तिच्या लक्षात आले. तिने नववीपर्यंतचे शिक्षण बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये घेतले. घरच्यांनीही राणीला दूर केले नाही आणि किन्नर समाजातील गुरूंकडेही पाठवले नाही. तिला घरातील इतर व्यक्तींप्रमाणेच सन्मानाची वागणूक दिल्याने राणीवर उत्तम संस्कार झाले. त्यातूनच तिने स्वतःच्या पायावर उभे राहायचे ठरवले. गेल्या सात-आठ वर्षांपासून नाशिक रोडच्या उड्डाणपुलाखालील संजय मेडिकलसमोर राणी चहा-नाश्त्याची टपरी चालवत आहे. मेसाई चहा टपरी असे तिच्या टपरीचे नाव. हा व्यवसाय करून ती आई, बहीण, भाऊ यांनाही सांभाळत आहे. 

‘किन्नर समाजाने केवळ पैसे मागण्यापेक्षा कष्ट करून चरितार्थ चालवला पाहिजे. भारतीय समाजव्यवस्था खूप निर्मळ असून, किन्नरांनी सदाचरण केल्यास लोक किन्नर व्यक्तींना स्वीकारतात,’ असे राणीला वाटते. लहानपणापासून शिक्षणातून सामाजिक अभ्यास केलेल्या राणीने आपल्या जीवनात मूल्य आणि सद्गुणांना नेहमीच उच्च स्थान दिलेले आहे. राणी स्वखर्चातून जमवलेल्या पैशांतून वह्या-पुस्तके घेऊन १५  ऑगस्ट आणि २६ जानेवारीला गरीब आणि गरजू मुलांना दान करते. प्रत्येक वर्षी विहितगाव येथील मतिमंद मुलांच्या आश्रमात जाऊन राणी एक दिवस मुलांना भोजन घालते. उड्डाणपुलाखालील गरीब भिकारी आणि पैसे नसलेल्या व्यक्तींना राणी स्वखर्चातून खाऊ-पिऊ घालते. राणीने एक मुलगा आणि एक मुलगी दत्तक घेतली आहे. सकाळी पाच वाजता राणी स्वतः दुकान उघडते. नाशिक रोडच्या भाजीबाजारात राणीची कांदाभजी खूप फेमस झाली आहेत. लोक आवडीने कांदाभजी खाण्यासाठी राणीच्या स्टॉलवर येतात. ‘इथल्या लोकांनी मला स्वीकारले आहे, म्हणून मी समाजात ताठ मानेने जगत आहे,’ असे राणी म्हणते. ‘किन्नर समाजाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होत चालला आहे. किन्नर समाजाला समाजात सन्मानाचे स्थान मिळेल,’ असे राणीला वाटते. 

राणीला अनेक जण घरी पूजेसाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी बोलावतात; मात्र राणी त्यांच्याकडून कधीही पैसे घेत नाही. राणी महिलांना मुलगी होण्याचा आशीर्वाद देते. दातृत्व ठेवल्यास सगळी सुखे आपल्याला मिळतात, असे राणी स्वानुभवातून सांगते. आपल्या जडणघडणीचे श्रेय ती आई, वडील, शिक्षक यांच्याबरोबरच मुंबईचे पायल गुरू यांनाही देते. राणीला आजपर्यंत विविध संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर गौरवण्यात आले आहे. सामाजिक कार्यासाठी राणीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. समाजात किन्नर समाजाबद्दल असलेली भीती कमी व्हायला पाहिजे. किन्नर समाजातील व्यक्तींना दत्तक घेतले गेल्यास समाजातील असमानतेची दरी कमी होईल, असे राणीला वाटते. किन्नर समाज आज मोठ्या सामाजिक समस्यांना सामोरे जात आहे. काही किन्नर व्यक्तींमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. अनेक किन्नर आर्थिक विवंचनेमुळे समस्याग्रस्त असतात. म्हणूनच, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून किन्नर समाजाला मदत होण्यासाठी स्वयंसेवी संस्था सुरू करण्याचा राणीचा मानस आहे. ‘माझ्यासारख्या अनेक संजना समाजात घडाव्यात,’ असे ती म्हणते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dipak About 71 Days ago
Hii-
0
0
Bal Gramopadhye About 175 Days ago
Good enterprise . Best wishes .
0
0
Siddhu barve About
Wowwww khupach😘sunder khup chan mammy
0
0

Select Language
Share Link
 
Search