Next
स्वयंअध्ययनावर भर हवा
प्रेस रिलीज
Thursday, February 15, 2018 | 02:04 PM
15 0 0
Share this story

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना डावीकडून मंजूषा वैद्य, दया कुलकर्णी, ए. बी‌. मर्चंट, डॉ. उमेश प्रधान, डॉ. अ. ल‌. देशमुख, डॉ. स्नेहा जोशी व सुवर्णा कऱ्हाडकर

पुणे : ‘पुढील वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमात अमूलाग्र बदल होत आहेत. कुतुहल वाढविणाऱ्या, कृतीत्मक, चिकित्सक आणि तार्किक पद्धतीच्या रचना नव्या अभ्यासक्रमात आहेत. त्यामुळे दहावीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन, आकलन आणि कृतीवर अधिक भर द्यायला हवा,’ असा सल्ला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी विद्यार्थी व पालकांना दिला.

पुण्यातील ‘सुपरमाईंड’ संस्थेतर्फे विद्यार्थी व पालकांसाठी टिळक स्मारक मंदिरात आयोजित ‘नववीतून दहावीत जाताना’ या विषयावरील विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी डॉ. देशमुख बोलत होते. सुपरमाईंड संस्थेच्या प्रमुख मंजूषा वैद्य, अर्चिता मडके, दया कुलकर्णी, समुपदेशिका सुवर्णा कऱ्हाडकर, ए. बी. मर्चंट यांच्यासह इतर मान्यवर उद्घाटनाला उपस्थित होते. 

डॉ. अ. ल. देशमुखडॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी स्वानुभवातून अनेक गोष्टींचे आकलन करुन घेतले पाहिजे. आकलनासहित वाचन अवगत केले, तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लिहिणे सोपे जाते. नव्याने येणारी पाठ्यपुस्तके विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे त्यातील संकल्पना नीटपणे समजून घेतल्या, तर विद्यार्थ्यातील चिकित्सक वृत्ती विकसित होण्यास मदत होईल. मुलांना सुटीत खासगी शिकवण्या लावण्यापेक्षा त्यांना स्वयंअध्ययनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी वाव दिला पाहिजे. केवळ शिकण्यापेक्षा कसे शिकावे, याचा विचार विद्यार्थी व पालकांनी केला, तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात भर पडेल.’

या कार्यशाळेमध्ये डॉ. स्नेहा जोशी (मराठी), डॉ. उमेश प्रधान (इंग्रजी), डॉ. गणेश राऊत (इतिहास), डॉ. सुलभा विधाते (विज्ञान), डॉ. जयश्री अत्रे (गणित) यांनी मार्गदर्शन केले. अभ्यासकौशल्य व क्षमता याविषयी माहिती देणाऱ्या या कार्यशाळेला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

डॉ. स्नेहा जोशी म्हणाल्या, ‘वाचन, आकलन आणि निरीक्षण याला आता अधिक महत्व येणार आहे. आपल्याला मराठी विषयाचा नाही, तर मराठी भाषेचा अभ्यास करायचा आहे, हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. पारंपरिक आणि वाचिक उत्तरांपेक्षा अनुभवजन्य लिहिण्याला प्राधान्य द्यावे. लेखन सराव अतिशय महत्त्वाचा असून, पालकांनी त्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे.’

डॉ. उमेश प्रधान म्हणाले, ‘या पिढीकडे कल्पनाशक्ती, सर्जनशीलता ठासून भरलेली आहे. त्यामुळे त्यांना नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी पालक व शिक्षकांनी प्रेरित करावे. इंग्रजीचा कोणताही बाऊ न करता त्यातील संकल्पना नीट समजून घेतल्या, तर ती भाषा अधिक सोपी वाटते. इंग्रजीचे नियमित वाचन आणि श्रवण यातून इंग्रजी अवगत होत जाते.’

डॉ. गणेश राऊत यांनी इतिहासातील अनेक संकल्पना कशा आकलन कराव्यात हे सांगितले. तर डॉ. जयश्री अत्रे यांनी गणितीय अभ्यासाच्या पद्धती आणि स्वरुप सांगितले. डॉ. सुलभा विधाते यांनी विज्ञानाचा अभ्यास सहज आणि प्रात्यक्षिकांतून कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. सुवर्णा कऱ्हाडकर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या विषयामागील महत्त्व विशद केले. अर्चिता मडके यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link