Next
एस्पेरांतो - प्रयत्न कृत्रिम, हेतू उदात्त आणि प्रगती दमदार!
BOI
Monday, October 22, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

संस्कृत, तमिळ, हिंदी, मराठी किंवा इंग्रजी, स्पॅनिश आणि जर्मनी यांसारख्या प्रमुख भाषा नैसर्गिक भाषा मानल्या जातात. कारण या भाषांचे मूळ सापडणे अशक्य आहे. मानवी जीवनाच्या विविध व्यवहारांतून आणि अनेक पिढ्यांचे ज्ञान साठत गेल्याने या भाषा उत्क्रांत झाल्या आहेत. परंतु एस्पेरांतो ही भाषा ल्युडोविक एल. झामेनहॉफ यांनी स्वप्रयत्नातून घडविली. जगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी; ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी, अशी झामेनहॉफ यांची कल्पना होती. विकिपीडियावर या भाषेतील अडीच लाख लेखांचा टप्पा नुकताच ओलांडला गेला. त्या निमित्ताने...
.........
गेल्या महिन्यात, १८ सप्टेंबर २०१८ रोजी एक महत्त्वाची घटना घडली. या दिवशी फ्रान्समधील ‘लिव्ही’ नावाच्या एका व्यक्तीने एक लेख लिहिला होता. अन् त्यासोबतच विकिपीडिया या खुल्या विश्वकोशात एस्पेरांतो या भाषेतील अडीच लाख लेखांचा टप्पा ओलांडला गेला.

आता यात काय विशेष? तर एस्पेरांतो ही भाषा जगातील अन्य प्रमुख भाषांपेक्षा वेगळी आहे. बोलायला अतिशय सोपी, सरळ आणि मुख्यतः वेगवेगळ्या संस्कृतीतील समूहांसाठी निर्माण झालेली ही भाषा. निर्माण झालेली नव्हे तर निर्माण केलेली - होय, पूर्णपणे कृत्रिम भाषा! एस्पेरांतो या भाषेची गंमतच वेगळी.

संस्कृत, तमिळ, हिंदी, मराठी किंवा इंग्रजी, स्पॅनिश आणि जर्मनी यांसारख्या प्रमुख भाषा नैसर्गिक भाषा मानल्या जातात. कारण या भाषांचे मूळ सापडणे अशक्य आहे. मानवी जीवनाच्या विविध व्यवहारांतून आणि अनेक पिढ्यांचे ज्ञान साठत गेल्याने या भाषा उत्क्रांत झाल्या आहेत. परंतु एस्पेरांतो ही भाषा एका माणसाने स्वप्रयत्नातून घडविली. आज या भाषेचे वय आहे १३१ वर्षे!

एस्पेरांतो ही भाषा घडविण्याचे श्रेय जाते ते ल्युडोविक एल. झामेनहॉफ या व्यक्तीला. पोलंडच्या वॉर्सा प्रांतात राहणाऱ्या झामेनहॉफ यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटिन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथुआनियन या भाषा अवगत होत्या; मात्र ‘व्हरायटी अॅड्स एन्जॉयमेंट टू लाइफ’ (वैविध्यामुळे जीवनाला रंग येतो) अशी उक्ती असली, तरी वास्तवात भाषेचे वैविध्य ही बजबजपुरीच ठरत होती.

झामेनहॉफआजमितीला जगात लहानमोठ्या अशा दोन-तीन हजार भाषा आहेत. त्यातील अनेक भाषांचा समावेश धोक्यात आलेल्या भाषांमध्ये झाला असला आणि अनेक भाषा लुप्त होत असल्या, तरी अस्तित्वात असलेल्या भाषांची संख्या प्रचंड मोठी आहे. मनुष्य ज्या भाषेच्या वातावरणात वाढलेला असतो ती भाषा, शिक्षणाच्या माध्यमाची भाषा, त्याच्या कानावर आदळणारी भाषा अशा अनेक भाषा त्याला किंवा तिला विनासायास येतात. परंतु अशा माहीत असलेल्या भाषांची संख्या फार मोठी असत नाही आणि अनोळखी भाषांची संख्याच जास्त. यामुळेच माणसांचा एकाच माध्यमातून एकमेकांशी व्यवहार होणे अशक्य होते. शिवाय भाषा शिकायला मेहनत लागते आणि ठराविक मर्यादेनंतर ते शक्यही नसते. अन् एकमेकांची भाषा न समजल्यामुळेच विविध समुदायांमध्ये संघर्ष उत्पन्न झाला होता आणि आजही होतो.

स्थानिक लोकांच्या आपापसांतील अशा भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि गैरसमजुतींना झामेनहॉफ कंटाळले होते. म्हणून जगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी; ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी, अशी झामेनहॉफ यांची कल्पना होती. त्याच उद्देशाने त्यांनी एस्पेरांतो घडविली.

यासाठी झामेनहॉफ हे १८७७ ते १८८५पर्यंत खपत होते. त्यातून त्यांनी ल इंतरनॅशिया लिंग्वो (दी इंटरनॅशनल लँग्वेज) ही भाषा घडविली; मात्र झामेनहॉफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो या नावाने ओळखली जाते.

१८८७मधील पुस्तकएस्पेरो या शब्दाचा अर्थ होतो ‘आशा बाळगणारा.’ पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया या मुलीने एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून या भाषेचा प्रचार करण्याचे काम केले. डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाने झामेनहॉफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक इ. स. १८८७मध्ये प्रकाशित केले होते. यानंतर १९०५ मध्ये झामेनहॉफ यांनीच ‘फंदामेंतो दे एस्पेरांतो’ हे पुस्तक लिहिले, यात एस्पेरांतोचे व्याकरण आणि शब्दसंग्रह यांचा समावेश होता. त्याच वर्षी फ्रान्समध्ये पहिली वर्ल्ड एस्पेरांतो काँग्रेस भरली. त्यानंतर ती भाषा जगाच्या विविध भागांत पोहोचली.

फंदामेंतो दे एस्पेरांतोअसे नाही, की एस्पेरांतो ही जगातील एकमेव कृत्रिम भाषा आहे. अशा अनेक भाषा आहेत. परंतु एस्पेरांतो ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय कृत्रिम भाषा म्हणता येईल. सध्या १२० देशांमधील एक लाख ते २० लाख लोक एप्सेरांतो भाषिक आहेत, असे या भाषेच्या सर्वोच्च संघटनेचे म्हणणे आहे. ही भाषा लोकप्रिय होण्याचे एक कारण म्हणजे तिचा सोपेपणा. एस्पेरांतोतील सर्व शब्द आणि वाक्ये १६ मूलभूत नियमांवर आधारलेले आहेत. इतर भाषांप्रमाणे यात गुंतागुतीच्या वाक्यरचना नसतात. त्यातील शब्दही जर्मन, इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि इटालियन यांसारख्या भाषांतून घेतलेले असतात. युरोपियन भाषांत सामान्यपणे आढळणारे शब्द व त्यांची रचना लक्षात घेऊन झामेनहॉफने ही भाषा तयार केली होती. त्यामुळे ती कोणालाही पूर्णपणे अपरिचित राहिली नाही. या भाषेत काहीतरी आपलेपणा प्रत्येक भाषकाला वाटला पाहिजे, ही मूलभूत गोष्ट न विसरल्यामुळे एस्पेरांतोला यश मिळाले.

आज परिस्थिती अशी आहे, की एस्पेरांतो बोलणारे लोक जगातील कानाकोपऱ्यात तुम्हाला मिळतील. काही राजकीय कारणांमुळे या भाषेचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही. जगावेगळी असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या भाषेकडे परकेपणाने आणि संशयानेच पाहिले. म्हणूनच नाझी जर्मनीत एस्पेरांतोभाषकांना लक्ष्य करण्यात आले, तर सोव्हिएत काळात स्टॅलिनच्या राजवटीतही एस्पेरांतोभाषकांचा छळ करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात इंग्रजीचे संपर्कभाषा म्हणून वर्चस्व निर्माण झाले. त्यामुळे संपर्कभाषा म्हणूनच विकसित झालेल्या एस्पेरांतोवर मात्र वनवासात जाण्याची वेळ आली. तरीही काही जणांनी ती नेटाने जिवंत ठेवली.

एस्पेरांतोचे व्रत घेतलेल्यांमध्ये एक प्रमुख नाव म्हणजे आपल्या पुण्यातील डॉ. एफ. एस. अब्दुल सलाम यांचे. भारतातील सात-आठ भाषांसोबतच अरबीचेही जाणकार असलेले डॉ. सलाम हे एस्पेरांतोने भारावलेले व्यक्तिमत्त्व होते. ‘एस्पेरांतो ही शिकायला अत्यंत सोपी असलेली भाषा आहे. ती कोणत्याही वांशिक गटाशी संबंधित नसल्यामुळे सार्वत्रिक भाषा म्हणून आपण तिचा प्रसार करू शकतो,’ असे ते आवर्जून सांगत. ‘फेडरासियो एस्पेरांतो दी भारतो’ ही संस्था त्यांच्या प्रयत्नांतून सुरू झाली आणि तिचे मुख्य कार्यालयही पुण्यात आले ते त्यांच्यामुळेच. तसेच या संस्थेच्या माध्यमातून १९९५मध्ये या संस्थेचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन झाले तेही पुण्यात. तसेच डॉ. अनिरुद्ध बनहट्टी यांनी मराठीत या भाषेवर ‘सात दिवसांत एस्पेरांतो’ हे एक पुस्तकही लिहिले आहे.

आता इंटरनेटच्या प्रसारामुळे अनेक भाषांनी एक नवी भरारी घेतली आहे, तशीच एस्पेरांतोनेही घेतली आहे. वरील विकिपीडियाची घडामोड ही त्याच भरारीचा एक भाग होती. एस्पेरांतो भाषेची विकिपीडिया आवृत्ती सुरू झाली सहा नोव्हेंबर २००१ रोजी. सध्या ३००हून अधिक वापरकर्ते विकिपीडियाच्या एस्पेरांतो आवृत्तीचे संपादन करत आहेत. हे स्वयंसेवक विकिपीडियावर नवीन लेख जोडत असतात. गुगलसारख्या जगड्व्याळ कंपनीनेही या भाषेचा स्वीकार केला आहे. ‘गुगल ट्रान्स्लेट’सारख्या सेवांवर एस्पेरांतो भाषेचा पर्याय उपलब्ध आहे.

अर्थात जगातील अन्य भाषकांच्या संख्येच्या तुलनेत एस्पेरांतो बोलणाऱ्यांची संख्या तशी मर्यादितच आहे. परंतु सकारात्मकता आणि सौहार्दाचा एक प्रयोग म्हणून तिचे यश - मग भले ते कितीही मर्यादित का असेना - विचार करायला लावणारे आहे. हे प्रयत्न असेच चालू राहोत.

एस्पेरांतो युनिगास ला होमारोन (एस्पेरांतो माणसांना एकत्र आणते) हे वाक्य खरे ठरत राहो.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search