Next
जुन्नर ते मार्लेश्वर : दिव्यांग व्यक्तीची पदयात्रा
श्री देव मार्लेश्वरच्या यात्रोत्सवाला उपस्थिती
संदेश सप्रे
Saturday, January 12, 2019 | 05:42 PM
15 0 0
Share this story

खंडू सरजिनेदेवरुख : जुन्नर ते मार्लेश्‍वर हे शेकडो किलोमीटरचे अंतर सर्वसामान्य धडधाकट माणसाने कापायचे म्हटले, तरी ते अशक्यच आहे; मात्र सर्वसामान्यांना अशक्य वाटणारी ही गोष्ट एका ४९ वर्षीय अपंग शिवभक्ताने शक्य करून दाखवली आहे. खंडू सरजिने असे त्यांचे नाव असून, गेली १४ वर्षे ते अव्याहतपणे जुन्नर ते मार्लेश्वर असा पायी प्रवास करत असून, याही वर्षी ते पायी प्रवास करून मार्लेश्वरला श्री देव मार्लेश्‍वराच्या यात्रोत्सवासाठी पोहोचले आहेत. केवळ परमेश्‍वराच्या साधनेसाठी एवढी पायपीट करणाऱ्या खंडू सरजिने यांच्या अचाट जिद्दीची दखल घेऊन संगमेश्‍वरातील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला आहे.

जुन्नर येथील अलदरे गावातील सरजिने यांना शालेय जीवनातच अर्धांगवायूचा झटका आला आणि त्याची उजवी बाजू पूर्णतः निकामी झाली. त्या वेळी उपचार करत त्यांनी काही अंशी बरे होण्यात यश मिळवले; मात्र अजूनही त्याची उजवी बाजू म्हणावी तशी काम करत नाही. याही अवस्थेत त्यांनी आपली ईश्‍वरभक्ती जराही कमी केली नाही. तोंडातून केवळ हरी ओम जप करीत चालताना उजवा पाय फरफटत नेत असताना सरजिने यांनी आजवर जुन्नर ते मार्लेश्‍वर हा शेकडो किमीचा प्रवास पायी यशस्वी केला आहे.

या वर्षीची मार्लेश्‍वरची यात्रा १२ जानेवारीपासून सुरू झाली. त्यासाठी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सरजिने यांचा पायी प्रवास सुरू झाला. पुणेमार्गे झालेल्या आपल्या पायी प्रवासात ते दररोज १० ते १३ किमी अंतर कापत ते इथवर पोचले. आता मार्लेश्‍वरला जाण्यासाठी त्यांना अवघे दोन दिवस लागणार आहेत.

या विषयी सांगताना सरजिने म्हणाले, ‘नोव्हेंबर ते जानेवारी अशा आपल्या पायी प्रवासात दररोज रात्री वाटेत येणारी मंदिरे, धार्मिक स्थळे, धर्मशाळा याठिकाणी वास्तव्य केले. दर सोमवारचा कडक उपवास असून, यादिवशी काहीही न खाता प्रवास करायचा. एरव्ही माधुकरी मागून पोट भरतो. राज्यातील अनेक शिवस्थानांचा पायीच प्रवास केला आहे. सकाळी कितीही थंडी असली, तरी थंड पाण्याने अंघोळ व सकाळी व सांयकाळी ज्याठिकाणी वस्ती असेल त्याठिकाणी शिवाचे नामसंकीर्तन, पठण व जप असा नित्यक्रम असतो.’

देवाचा ध्यास लागला, की भाविकांना अशक्य गोष्टी शक्य होतात. याचे अनेक दाखले आपल्याला दैनंदिन जीवनात पाहायला मिळतात. सरजिने यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून दाखवलेली ही जिद्द वाखाणण्यासाठी आणि प्रेरणादायी आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link