Next
मृत तळ्याला बालगोपाळांकडून नवसंजीवनी; हजारो लिटर पाणी साठणार
हणबरवाडीतील युवकांच्या पुढाकाराने केली कमाल
BOI
Thursday, June 06, 2019 | 10:00 AM
15 0 0
Share this article:

श्रमदान करताना हणबरवाडीचे युवक

हणबरवाडी (मसूर, ता. कराड, जि. सातारा) : दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जलसाठ्यांना नवसंजीवनी देणे हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय असतो. हणबरवाडीतील सिद्धनाथ शेडगे या तरुणाने बालगोपाळांच्या साह्याने असाच उपक्रम राबविला आहे. गावाबाहेर, पश्चिमेला असलेल्या थारोबाच्या डोंगराच्या पठारावर असलेल्या एका जुन्या, मृत तळ्याला या सर्वांनी नवसंजीवनी दिली असून, पाऊस पडल्यावर त्यात हजारो लिटर पाणी साठणार आहे.

थारोबाच्या डोंगरावरील हे तळे अनेक वर्षांसून मृत स्वरूपात होते. पूर्वी या तळ्यावर वन्य प्राणी, पशु-पक्षी पाणी प्यायला येत. हे तळे गावातील मेंढपाळ, गुरेढोरे व माणसांचीही तहान भागवत होते; मात्र मध्यंतरीच्या काळात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्षांपासून हे तळे मृतावस्थेत होते. अशा या मृत तळ्याला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सिद्धनाथ शेडगे या तरुणाने गावातील बालगोपाळांना एकत्र केले. सिद्धनाथ पहिलवान असून, तो सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. या कामी त्याला अक्षय शेडगे या तरुणाची मोलाची साथ मिळाली.


या कार्यासाठी चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धनाथ शेडगे, अक्षय शेडगे यांच्यासह हणबरवाडीतील शिवशंभो तालमीचे बालगोपाळ यशराज दबडे, साहिल शेडगे, सुशांत शेडगे, शंभूराज शेडगे, प्रणय साळुंखे, आदित्य पवार, देवराज शेडगे, सुजल शेडगे, नैतिक शेडगे, विजय शेडगे, सिद्धेश शेडगे, विशाल पवार, रविराज शेडगे, सिद्धार्थ शिंदे, आयुष पंदुगडे, अक्षय निगडे, शिवराज लोहार, शुभम ढेरे, विशाल घाडगे, रामकुमार शेडगे आदींनी श्रमदान केले.


याविषयी दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले, ‘सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असून, पाणीप्रश्न बिकट बनत चालला आहे. भूगर्भात पाणी नाही. विहिरी, तळी, नद्या हे नैसर्गिक पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. जलसंकटावर मात करायची असेल, तर पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडवून जिरवले, तरच भूगर्भात पाणीसाठा वाढेल आणि यातूनच संकटावर मात करता येईल. म्हणूनच हा उपक्रम राबविण्यात आला.’ येत्या पावसाळ्यात ‘एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना अंमलात आणली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.



कुणी तरी काही तरी केले पाहिजे, असे केवळ बोलत न बसता प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घालून दिलेल्या या बालगोपाळांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, असेच उपक्रम ठिकठिकाणी राबविले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search