Next
बिअट्रिक्स पॉटर, बाबा भांड
BOI
Friday, July 28, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

पीटर रॅबिट’सारख्या बच्चेकंपनीला प्याऱ्या ससेभाऊच्या व्यक्तिरेखेतून भावविश्व रंगवणारी इंग्लिश लेखिका बिअट्रिक्स पॉटर आणि लहान मुलांवरच्या अतोनात प्रेमापोटी बालमनावर संस्कार करणाऱ्या बालसाहित्याची निर्मिती करणारे बाबा भांड अशा दोन बालसाहित्यकारांचा २८ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘दिनमणी’मध्ये आज त्यांच्याबद्दल...
.......................

बिअट्रिक्स पॉटर

इंग्लिश कंट्रिसाइड हा एक विलक्षण देखणा प्रकार. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेलं ते सौंदर्य आणि त्यावर प्रचंड प्रेम करणारी, ते जतन करण्यासाठी धडपडणारी आणि त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचं भावविश्व रंगवणारी लेखिका म्हणून बिअट्रिक्स पॉटरची ओळख!

२८ जुलै १८६६ रोजी लंडनच्या साउथ केन्सिंग्टन विभागात बिअट्रिक्सचा जन्म झाला. भाऊ लहानपणापासून दूर बोर्डिंगमध्ये असल्यामुळे ती एकाकी असायची. त्यातूनच तिला आपल्याच कल्पनेतल्या जगात रममाण होण्याची सवय लागली. त्यातूनच तिचं लेखन फुलायला लागलं. पुढे तिच्या हातून ‘पीटर रॅबिट’ या बच्चेकंपनीच्या प्रचंड लाडक्या पात्राची निर्मिती झाली. ते पात्र तिला तिच्या घरच्याच बेंजामिन बाउन्सर नावाच्या सशावरून सुचलं होतं. पीटर रॅबिट इतका गाजला, की त्या काळात (१९०३च्या आसपास) त्याचं बाहुलं बाजारात आलं होतं. इतकंच नव्हे, तर त्याच्यावर आधारित एक बोर्डगेम आणि वॉलपेपर्ससुद्धा आले होते.
 
इंग्लंडमधल्या नयनरम्य लेक डिस्ट्रिक्टमध्ये तिचं घर होतं. तिथल्या हिरव्यागार कुरणांच्या आणि छोट्या छोट्या टेकड्यांच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर तिने वेगवेगळ्या प्राण्यांच्या कथा बच्चेकंपनीसाठी लिहिल्या. अर्थातच त्यांमध्ये ‘पीटर रॅबिट’च्या कथांना मानाचं स्थान आहे. ससे, बेडूक, उंदीर, साळिंदराच्या कुळातला हेजहॉग, बदकं असे भलतेभलते प्राणी तिने घरी पाळले होते. तिची गोष्टींची जवळपास २४ पुस्तकं प्राण्यांच्या कथांवर आधारित आहेत. तिची चित्रकलादेखील वाखाणण्यासारखी होती आणि ती स्वतःच्या गोष्टीच्या पुस्तकांसाठी फार सुंदर इलस्ट्रेशन्स करत असे. तिच्या पुस्तकांची ३५ भाषांत भाषांतरं झालेली आहेत.

प्रियकर अकाली गेल्यामुळे तिची बरीच वर्षं एकाकी अवस्थेत गेली होती. उतारवयात दृष्टी अधू झाल्यामुळे तिच्या हातून लेखन होईना. तेव्हा तिने मेंढीपालन व्यवसायात मन रमवलं.

२२ डिसेंबर १९४३ला तिचा लँकशरमध्ये मृत्यू झाला. तिचं १९०५ सालचं घर आजही लेक डिस्ट्रिक्टमध्ये जपून ठेवण्यात आलंय आणि पर्यटक त्याला भेट देऊ शकतात.
.......................

बाबा साळूबा भांड

२८ जुलै १९४९ साली जन्मलेल्या बाबा भांड यांना लहान मुलांविषयी अतोनात प्रेम आणि त्यातूनच त्यांनी बालमनावर संस्कार करणारी ‘आनंदमेळा’, ‘धर्मा’, ‘धर्माची गोष्ट’, ‘एक घर एक ओटा’, ‘गोष्ट अर्चनाच्या गाडीची’, ‘गोष्ट कपड्याच्या जोडाची’, ‘खरी कमाई’, ‘नीतिकथा’ यांसारखी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

बालसाहित्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ या रिचर्ड बाखच्या अप्रतिम कादंबरीचा त्यांनी सुंदर अनुवाद केला आहे. समष्टीच्या मळलेल्या पायवाटेवरून चालण्यापेक्षा आपली स्वतःची वेगळी पायवाट चोखाळावी, आपल्या ज्ञानाची कक्षा वाढवावी, आवाका वाढवावा अशा प्रकारचा सकारात्मक संदेश देणारं हे पुस्तक आणि त्याचा बाबा भांड यांनी केलेला अनुवादही सरस!

‘जरंगा’, ‘काजोळ’, ‘लागेबांधे’, ‘झेलम ते बियास’, ‘तंट्या भिल्ल’ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक म्हणजे ‘दशक्रिया.’ अत्यंत वास्तव, ओघवती शैली, अचूक बोलीभाषा, चित्ररूप वर्णनं आणि ठोस वैचारिक भूमिकेतून केलेलं जातिव्यवस्था, समाजव्यवस्था आणि आत्यंतिक गरिबीवरचं भाष्य हे त्या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. साकेत प्रकाशन ही त्यांनी सुरू केलेली प्रकाशनसंस्था.

भांड यांना ‘दमाणी पुरस्कार’, तसंच ‘श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार’ यांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search