Next
‘व्यसनमुक्तीसाठी कुटुंबवत्सल भावना गरजेची’
प्रेस रिलीज
Friday, June 29, 2018 | 05:07 PM
15 0 0
Share this story

‘समाजातील व्यसनाधीनता’च्या विशेषांकाचे प्रकाशन करताना डावीकडून मुक्ता पुणतांबेकर, डॉ. अनिल अवचट, हरीश बुटले, डॉ. राजा दांडेकर व डॉ. प्रवीण मोतीवाला.

पुणे : ‘दारूचे व्यसन गरीब, मध्यम आणि उच्चवर्गीय सर्वांमध्येच आहे. व्यसनमुक्तीसाठी आपल्याकडे कुटुंबातील व्यक्ती सोबत असतात. त्यामुळे रुग्ण व्यसनातून लवकर बरा होण्यास मदत होते. भारतीय संस्कृतीमधील कुटुंबवत्सल भावना व्यसनी माणसाला बरा करण्यात उपयुक्त ठरते. या अवस्थेत कुटुंबाकडून प्रेम, वात्सल्य, आत्मीयता मिळाली, तर आपण व्यसनांना दूर ठेवू शकतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी केले.

पालकत्वाला वाहिलेल्या आणि समाजाला समर्पित विनाजाहिरातीचा अंक ‘तुम्ही-आम्ही पालक’च्या ‘समाजातील व्यसनाधीनता’ या विशेषांकाचे प्रकाशन मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या उपसंचालिका मुक्ता पुणतांबेकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर, ‘तुम्ही-आम्ही पालक’चे संस्थापक संपादक हरीश बुटले, ‘युक्रांद’चे सचिव संदीप बर्वे आदी उपस्थित होते. हेरंब कुलकर्णी या अंकाचे अतिथी संपादक आहेत.

डॉ. अवचट म्हणाले, ‘मुक्तांगणमध्ये येऊन लोकांच्या वागण्यात सुधारणा होते. आज येथील अनेक कर्मचारी पूर्वी रुग्ण होते; परंतु, त्यांचा आणि कुटुंबाचा सहभाग लाभल्याने त्यांच्यात परिवर्तन शक्य झाले. समर्पित भावनेने एखादी गोष्ट केल्यास ती लवकर स्वीकारली जाते.’

पुणतांबेकर म्हणाल्या, ‘व्यसनाधीनता हा सामाजिक प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अल्पवयीन मुले, महिला दारू आणि ड्रग्ससारख्या गंभीर व्यसनांना बळी पडत आहेत. सोशल मीडिया व्यसनाच्या वर्गात येऊ लागले आहे. अशावेळी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. पालक आणि शिक्षकांपर्यंत अशी मासिके पोहोचली, तर व्यसनांपासून समाज मुक्त होईल.’

डॉ. दांडेकर म्हणाले, ‘पालक आणि शिक्षकांचे संस्कार मुलांवर परिणाम करीत असतात. त्यामुळे त्यांना चांगली शिकवण देण्याचे दायित्व आपल्यावर आहे. त्यांच्यात नम्रपणा, चांगले वागणे, व्यसनमुक्त यासाठी संगत आणि चांगले संस्कार व्हायला हवेत.’

बुटले म्हणाले, ‘व्यसनाधीनतेने आज समाज पोखरला जात आहे. अशावेळी समाजाचे रक्षण करणे आणि येणाऱ्या पिढीला चांगल्या वाईट गोष्टीचे ज्ञान देण्याचे काम ‘तुम्ही-आम्ही पालक’ गेली पाच वर्षे करीत आहे. पाच वर्षांच्या यशस्वी पूर्तीच्या निमित्ताने समाजातील व्यसनाधीनता यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link