Next
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उभारणार अंतराळ प्रयोगशाळा
BOI
Monday, December 10, 2018 | 03:19 PM
15 0 0
Share this story


पुणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उद्देशाने येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) टिळक रस्त्यावरील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये अंतराळ प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक किरण शाळीग्राम यांनी दिली.

संस्थेच्या टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डिजिटल सूचना फलकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बोलत असताना शाळीग्राम यांनी अंतराळ प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत माहिती दिली. ‘प्रयोगशाळा उभारण्यासंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्त्रो) शास्त्रज्ञांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. टिळक रस्त्यावर पूर्व-प्राथमिक वर्गांसाठी स्वतंत्र इमारतीचे कामही लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे डीईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागा उपलब्ध होणार आहे. या जागेत प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, त्यासाठी जवळपास पन्नास लाख रुपये खर्च लागणार आहे. पुढील दीड वर्षांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे’, अशी माहिती शाळीग्राम यांनी दिली. 

शाळीग्राम पुढे म्हणाले, ‘डीईएस इंग्लिश मीडियम स्कूलमधील सर्व ३८ वर्गांमध्ये डिजिटल बोर्ड बसविण्यात आले आहेत. लॅपटॉप व इंटरनेटच्या साहाय्याने शिक्षक विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रम शिकवितात. त्यासाठी ‘बीएसएनएल’चे मोड्यूल घेण्यात आले आहे. संपूर्ण शाळेच्या परिसरात वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे.’

‘गेली दहा वर्षे शाळेचे विद्यार्थी इस्त्रोला अभ्यास सहलीच्या निमित्ताने भेट देतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन क्षेत्रांबरोबरच अवकाश संशोधन क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. त्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना या विषयाची माहिती मिळावी यासाठी अंतराळ प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे.’ असे मत नायडू यांनी व्यक्त केले.  

संस्थेचे आजीव सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी, डीईएस माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता नायडू, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी, पूर्व-प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, किरण देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link