Next
‘समस्या सोडविण्यासाठी जनरेट्याची गरज’
मेजर मनीष सिंग यांचे मत
BOI
Thursday, March 28, 2019 | 01:56 PM
15 0 0
Share this article:

मेजर मनिष सिंग यांचे स्वागत करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते.

ठाणे : ‘लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे. लोकशाहीच्या प्रवाहात राहून शासनाला सुईसारखे टोचत राहिले पाहिजे. मग ते कोणाचेही सरकार असू दे. निर्भयाच्या घटनेनंतर कायद्यात झालेले महत्त्वपूर्ण बदल फक्त जनरेट्यामुळे झाले. समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी जनरेट्याची गरज आहे,’ असे मत शौर्यचक्र प्राप्त मेजर मनीष सिंग यांनी व्यक्त केले. रघुनाथनगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी त्यांनी नुकताच संवाद साधला.  

मेजर मनीष सिंग यांचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते यांनी स्वागत केले. या वेळी भाग्यश्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र खेर, प्राचार्य अॅड. सुयश प्रधान, विनायक जोशी, सिध्देश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा, प्रसिध्द लेखिका शिल्पा खेर यांनी मेजर मनीष  सिंग यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

‘लष्कराच्या शौर्यावर चित्रपट बनतात आणि ते पाहिले जातात; मात्र चित्रपट आणि वास्तव यात फरक आहे. सर्जिकल स्ट्राईक करणे इतके सोपे नसते. भारतीय सैन्याला आजपर्यंत कोठेही अपयश आलेले नाही. त्यामुळे चित्रपट कमी बघा आणि वाचनावर अधिक भर द्या,’ असा सल्ला सिंग यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

‘पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक जवान शहीद झाल्यानंतर देश हादरला; मात्र सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत. आपला एक जवान शहीद झाला, तरी ते युध्दच आहे. देशभक्ती हा चर्चा करण्याचा विषय नाही. प्रत्येक जवान हा देशाची ड्युटी करत असतो. विद्यार्थ्यांनीही आपली वैयक्तिक ड्युटी काय आहे ती ओळखली पाहिजे. मी स्वच्छता ठेवेन. परिसरातील साफसफाई होत नसेल, तर मी नगरसेवकाला जाब विचारेन. झुंडशाहीने देशभक्ती होत नाही. जबाबदारीने वागणे आणि स्वत: योगदान देणे ही खरी देशभक्ती आहे,’ असे मेजर मनीष सिंग म्हणाले. 

‘काश्मिरमधील नागरिकांबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उभे केले जाते. मी गोळी लागून जखमी झालो तेव्हा मला मदतीचा हात बारामुल्लामधील स्थानिकानेच दिला,’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.

‘आयुष्य मजेत जगा. वाचा आणि विचार करा. भोवतालच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल ते बघा. दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका. विचारांना कृतीची जोड द्या,’ असेही मेजर मनीष सिंग म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search