Next
मला प्रश्नचिन्हांची उद्गारचिन्हं करायची आहेत! : अनघा मोडक
विशेष प्रतिनिधी
Thursday, May 11, 2017 | 01:19 PM
15 1 0
Share this story

अनघा मोडक हिला पुरस्कार देताना पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ. शेजारी (डावीकडे) हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले.

पुणे : ‘मी लढायचं ठरवलंय. अनेक प्रश्नचिन्हं माझ्यासमोर आहेत; पण मी त्यांची उद्गारचिन्हं करणार आहे. दुःस्वप्नाचं अनवट अभंगामध्ये रूपांतर करायचं मी ठरवलंय आणि ही लढाई मी जिंकणारच याचा मला विश्वास आहे...’ हे उद्गार आहेत तरुण निवेदिका आणि व्याख्याती अनघा मोडक हिचे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अचानक दृष्टी जाऊनही न खचता तिने स्वतःच्या आवडीच्या निवेदन व व्याख्यानाच्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले आणि त्या दिशेने प्रत्यक्ष वाटचालही सुरू केली. तिच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी पुण्यातील हिंदू महिला सभेने तिला ज्योतिर्मयी पुरस्कार देऊन गौरवले. बुधवारी, १० मे रोजी झालेल्या या हृद्य सोहळ्यात अनघाच्या विचारांनी उपस्थितांना भारावून टाकले.

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते अनघाला ज्योतिर्मयी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ११ हजार रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. एरंडवणे येथील मनोहर मंगल कार्यालयात झालेला हा सोहळा तब्बल अडीच तास रंगला. ‘मी ‘आम्ही पार्लेकर’ या मासिकात अनघाबद्दलचा लेख वाचला आणि ज्योतिर्मयी पुरस्कारासाठी ती अत्यंत योग्य व्यक्ती आहे, असं वाटलं. त्यामुळे तिची या पुरस्कारासाठी निवड केली. पुण्यातला हा तिचा पहिलाच सन्मान आहे,’ असे सुप्रिया दामले यांनी सांगितले. या वेळी काही उपस्थितांनीही अनघाला बक्षीस म्हणून काही रक्कम दिली. मीरा परांजपे यांनी तब्बल २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले.

‘सावरकरांमुळे ‘आधी सावर आणि मग कर, कृतिशील हो’ असा संदेश मिळाला. सावरकर हा पंचाक्षरी मंत्र आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार मिळतो आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. शिवाय सुधीरकाकांच्या (गाडगीळ) हातून हा पुरस्कार मिळणं म्हणजे मोठ्या शब्दांनी धाकुल्या शब्दांचा केलेला सन्मान, शब्दांनी शब्दांना दिलेलं आंदण, असं मला वाटतं,’ अशा शब्दांत अनघाने पुरस्काराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. 

प्रमुख पाहुणे सुधीर गाडगीळ यांनी या वेळी अनघाची छोटेखानी मुलाखत घेतली. त्यातून तिचे व्यक्तिमत्त्व उलगडत गेले. मुंबईकर असलेल्या अनघाला ऑक्टोबर २०१४मध्ये वयाच्या २५व्या वर्षी डेंग्यू झाला. त्या वेळी उपचारांदरम्यान काही कारणामुळे तिला अचानक दृष्टी गमवावी लागली. हा खूप मोठा धक्का होता; पण स्वतःची जिद्द आणि कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींनी दिलेली भक्कम साथ यामुळे ती सावरली आणि नव्या उमेदीने उभी राहिली. याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, ‘हे सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी माझे गुरू आले होते हॉस्पिटलमध्ये भेटायला. त्या वेळी त्यांनी सांगितलेल्या वाक्याने मला प्रेरणा मिळाली. ते म्हणाले होते, ‘बाहर बहुत देख लिया, अब थोडा अंदर देख लो.’ तेव्हा मी ठरवलं, की आपण लढायचं आणि जिंकायचंही. ‘नजर नहीं, नजरिया चाहिए’ ही गोष्ट माझ्या लक्षात आली. कुठलीही गोष्ट कधीही बाहेरून आत जात नाही. ती आतूनच बाहेर यावी लागते. तसंच माझा आतला प्रकाश दिशा दाखवील, हा गुरूंनी दिलेला संदेश माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला आणि मी लढण्याचा निर्धार केला.’

या कठीण प्रसंगानंतर आलेल्या अनुभवांबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘मला आलेले ८० टक्के अनुभव चांगले होते, तर वीस टक्के वाईट. त्यातून अनेक प्रश्नही विचारले जायचे; पण माझ्या लक्षात आलं, की यांना उत्तरं देऊन काही उपयोग नाही. उत्तरं माझी मलाच शोधायची आहेत. कारण मी अशा प्रश्नांमुळे वाईट वाटून घेत बसले, तर मी त्यातच राहीन आणि उभी राहूच शकणार नाही. माझ्यावर उपचार सुरू आहेत. तरीही अनेक प्रश्नचिन्हं माझ्यासमोर आहेत. पण मी त्यांची उद्गारचिन्हं करायचं ठरवलं आहे. जोपर्यंत प्रश्नचिन्हं आहेत, तोपर्यंत वाट वळणांची आहे. त्यांची उद्गारचिन्हं झाली की ती वाट सरळ होईल. ती छोटी आहे की मोठी, हे रसिकच ठरवतील. या दुःस्वप्नाचं अनवट अभंगामध्ये रूपांतर करायचं मी ठरवलंय. शब्द हीच माझी दृष्टी आहे.’ या अनुषंगाने ‘दुःखाने देता हूल, ती सौख्याची चाहूल, जरी दुभंगली यमुना, ते कृष्णाचे पाऊल’ या स्वरचित कवितेच्या ओळीही अनघाने या वेळी ऐकवल्या. 

आपल्या जडणघडणीत आई-वडील, पार्ले-टिळक शाळेतील आणि रूपारेल कॉलेजमधील शिक्षक आणि आणखी अनेक जणांचा मोठा सहभाग असल्याचे अनघाने नमूद केले. ‘नाटककार सुरेश खरे यांनी शब्दांकडे कसं बघावं ते शिकवलं. गुरू ठाकूरनं कविता कशी स्फुरते ते सांगितलं. कौशलदादा (इनामदार) आणि कमलेशदादा (भडकमकर) यांनी कार्यक्रमांबद्दल आणि अनेक गोष्टींबद्दल शिकवलं. लहानपणी वडिलांनी शिकवलेली स्तोत्रं, पाहिलेल्या आणि ऐकलेल्या अनेक मुलाखती, तसेच मेघदूतासारखे कार्यक्रम यांमुळे सुस्पष्ट उच्चारण, उत्स्फूर्तता यांसारख्या गोष्टी अंगी बाणवल्या गेल्या,’ असे तिने सांगितले. ‘‘तुला मोठं व्हायचं असेल तर पक्ष्यासारखी भरारी घेऊ नको. झाडासारखी मोठी हो. झाड उंच असल्यामुळे त्याचं आभाळाशी नातं असतंच, पण त्याची मुळं जमिनीशी जोडलेली असतात,’ या वडिलांनी दिलेल्या संदेशाचाही अनघाने आवर्जून उल्लेख केला.

अनघाचे व्याख्यान आणि रमा कुळकर्णी यांनी सादर केलेली गाणी यामुळे कार्यक्रम खुलत गेला.गुणांकित सावरकर
पुरस्कार सोहळा आणि अनघाची मुलाखत यानंतर ‘गुणांकित सावरकर’ या विषयावर अनघाचे व्याख्यान झाले. २८ मे रोजी असलेल्या सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत ओघवत्या शैलीत तिने सावरकरांचे चरित्र डोळ्यांसमोर उभे केले. सावरकरांच्या क्रांतीच्या गुणापासून साहित्यनिर्मितीतील योगदानापर्यंतच्या अनेक प्रेरक गोष्टी अनघाने आपल्या व्याख्यानातून मांडल्या. अनेक ठिकाणी ताजे संदर्भही तिने दिले. या व्याख्यानाला जोड होती ती सावरकरांनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांच्या सुरेल सादरीकरणाची. अनघाचे व्याख्यान आणि गायिका रमा कुळकर्णी यांनी मध्ये मध्ये सादर केलेली सावकरांची गीते यामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत खुलत गेला आणि साहजिकच उपस्थितांचीही त्याला चांगली दाद मिळाली. 

अनघाची गुणवैशिष्ट्ये
अनघा साहित्य विषय घेऊन बीए झाली असून, पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयातून तिने पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने गांधर्व महाविद्यालयातून गायनाचेही शिक्षण घेतले आहे. काही काळ विविध वृत्तपत्रांमध्येही ती कार्यरत होती. ती सध्या मुंबई आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवर निवेदक म्हणून कार्यरत आहे. त्याशिवाय ती अनेक कार्यक्रमांसाठीही निवेदन करते. विविध विषयांवर व्याख्याने देते. वक्तृत्वकलेची तिला लहानपणापासूनच आवड आहे. तिला पद्यवाचनात विशेष रस आहे. ती स्वतःही कविता करते. डबिंग आर्टिस्ट म्हणूनही तिने काम केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती आणि संस्कृत भाषेचेही तिला उत्तम ज्ञान आहे. भविष्यात उर्दू, जर्मन यांसारख्या भाषांवरही प्रभुत्व मिळवण्याची तिची इच्छा आहे. यापुढे विवध विषयांवर व्याख्याने द्यायचा आणि वैविध्यपूर्ण निवेदन करण्याचा तिचा मानस आहे. आतापर्यंत तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एकंदरीत, तरुणांना आणि सातत्याने अडचणींचा पाढा वाचत असलेल्या सर्वांसाठीच अनघाचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी असे आहे.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
ARUN MODAK About
जिद्द
2
0
Neeta Siddhaye About
Anagha, congratulations. Wish you all the best.
0
0
uday modak Thane About
Anagha, appreciate your feelings to look after your future life. best of luck. 👌👌👌👌
1
0
Archana About
मन हेलाऊन टाकणारी आणी धाडसाने सामोरी जाणारी अनघा मोडक. Hatsoff to Her👍
0
0
Shreekant Karve About
नवीन अध्यक्षा सौ. सुप्रिया दामले यांच्या कार्किर्दितील ऐक उत्तम शिरपेच. पुरस्कारासाठी योग्य निवड. मनापासून अभिनन्दन.
1
0

Select Language
Share Link