Next
नाट्यसंस्कार रुजविण्यासाठी रत्नागिरीत बालनाट्य परीक्षांचे आयोजन
BOI
Wednesday, July 03, 2019 | 03:35 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : मुलांना लहानपणापासूनच नाट्यशास्त्राचे बारकावे अवगत व्हावेत, त्यांच्यावर त्या दृष्टीने संस्कार व्हावेत, यासाठी नाट्यसंस्कार कला अकादमी गेली अनेक दशके काम करत आहे. गेल्या वर्षीपासून अकादमीच्या वतीने रत्नागिरीत बालनाट्यांच्या तीन वयोगटांतील परीक्षांचेही आयोजन केले जात असून, यंदाही हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी मार्गदर्शनही केले जाणार असून, अर्ज करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत आहे.

रत्नागिरीच्या शाखाप्रमुख आसावरी शेट्ये यांनी या उपक्रमाची माहिती दिली. बाल नाट्यसंस्कार, किशोर नाट्यसंस्कार आणि कुमार नाट्यसंस्कार अशा तीन टप्प्यांत यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी रत्नागिरीतील ८२ मुलांनी बाल नाट्यसंस्कार या अभ्यासक्रमाची परीक्षा दिली. (त्या संदर्भातील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) ही परीक्षा तोंडी व प्रात्यक्षिक स्वरूपाची असून, याचे चित्रीकरण केले जाते. 

गेल्या वर्षी बाल नाट्यसंस्कार परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यंदा किशोर नाट्यसंस्कार ही परीक्षा देतील. नवीन विद्यार्थी बाल नाट्यसंस्कार ही परीक्षाही देतील. रत्नागिरीच्या शाखाप्रमुख आसावरी शेट्ये यांच्यासह किरण जोशी आणि अॅड. सरोज भाटकर यांनी शाळांशी संपर्क साधून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. शाळांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

‘बालनाट्यांमध्ये अनेक केंद्रांवर हजारो बालकलाकार सहभागी होतात. तसेच रंगमंचावरही येतात; पण परीक्षा नसल्याने त्यांच्या अंगच्या गुणांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. म्हणूनच नाट्यसंस्कार कला अकादमीने या परीक्षा सुरू केल्या आहेत. या उपक्रमाचा अधिकधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्यातून व्यक्तिमत्त्वाचाही विकास घडून येईल. तो त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अत्यावश्यक नव्हे, तर अपरिहार्य आहे,’ असे शेट्ये म्हणाल्या.

यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करायचे आहेत. बाल नाट्यसंस्कार परीक्षा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात, तर किशोर नाट्यसंस्कार परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे, असे कळवण्यात आले आहे. बाल नाट्यसंस्कार परीक्षेसाठी ५०० रुपये, तर किशोर नाट्यसंस्कार परीक्षेसाठी ८०० रुपये शुल्क आहे. अर्ज भरल्यावर अभ्यासपुस्तिका देण्यात येणार असून, मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन केले जाणार असल्याने अकादमीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क :
आसावरी शेट्ये : ७५०७४ १६१६६ 
अॅड. सरोज भाटकर : ७९७२४ २२४७७ 
किरण जोशी : ८४०८८ ८३१५८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search