मुंबई : अभिनेता गश्मीर महाजनी याने ‘स्टार प्रवाह’च्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले असून, ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने गश्मीर महाजनी याच्याशी साधलेला संवाद...
‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नव्या मालिकेचा तू एक भाग आहेस. त्याविषयी काय सांगशील?
- रोज एक कथा निवडली जाईल आणि नाट्यमय पद्धतीने दाखवली जाईल. आपल्याला नात्यांमध्ये खूप गोष्टी खटकतात, मग ते पत्नीसह असो, आईसह असो. आपण ते स्वीकारायला तयार नसतो. वरवर पाहता ते प्रश्न म्हणून वाटतही नाहीत. ते खूप छोटे प्रश्न वाटत असल्याने आपण त्याविषयी संवाद साधायला सुरुवात नाही केली. नेमके काय चुकते आहे, आपण एकमेकांपासून इतके का दुरावलो आहोत, सोशल मीडियाद्वारे आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जवळ आलोय, पण प्रत्यक्षात एकमेकांशी बोलत नाही, संवाद साधत नाही. या सगळ्यांविषयी मालिकेत आपण बोलणार आहोत; मात्र हे करताना कुठेही ज्ञानाचा डोस देण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. अभिनेता म्हणूनही या विषयी माझ्या मनात असलेली खदखद या कार्यक्रमातून मोकळी करणार आहे.
या मालिकेद्वारे तू छोट्या पडद्यावर पदार्पण करतोयस. नेमका काय विचार केलास ही मालिका स्वीकारताना?
- सर्वांत महत्त्वाचे मला प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची ही उत्तम संधी आहे. माझा देश, माझ्या महाराष्ट्रात जे काही घडते आहे, त्याविषयी बोलायचे होते, मांडायचे होते. माझे आजोबा एका मोठ्या वृत्तपत्राचे संपादक होते. ते त्यांच्या लेखांतून, अग्रलेखांतून समाजातील चुकीच्या गोष्टी दाखवायचे, समाजाच्या भल्याचा विचार करायचे. मलाही कुठेतरी, कधीतरी तसे करायचे होते. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका त्यासाठी सर्वोत्तम संधी होती. या माध्यमाचा पुरेपूर वापर मी संवाद साधण्यासाठी करणार आहे.
या मालिकेच्या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’शी तू जोडला गेलायस. त्याविषयी काय वाटते?
- खूपच छान वाटत आहे. कारण, तुम्ही माझी आजवरची वाटचाल पाहिलीत, तर लक्षात येईल की मी खूप कमी काम करतो. कारण, मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागते. प्रत्येक काम अपेक्षित परफेक्शनने झाले नाही की मला त्याचा त्रास होतो. ‘दिवसाचे पैसे मिळाले ना, चलता है यार’ अशा पद्धतीने मी काम करूच शकत नाही. माझी काही ठाम मते आहेत. माझ्या विचारांशी साम्य असलेली मंडळी ‘स्टार प्रवाह’मध्ये आहेत. श्रावणी देवधर आणि सगळीच क्रिएटिव्ह टीम यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकला आहे, मला क्रिएटिव्ह फ्रिडम दिला आहे, त्यामुळे मला काम करायला खूप मजा येतेय. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवे असते, त्यामुळे मी खूप खुश आहे.