Next
रसिक श्रोता कसा असावा?
BOI
Tuesday, December 18, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


‘मला शास्त्रीय संगीतातलं फार काही कळत नाही, पण ऐकायला खूप आवडतं’,’ असं म्हणणारा सर्वसामान्य रसिक श्रोता कलाकाराला नेहमीच आवडतो, कारण जाणत्या श्रोत्यांबरोबरच अशा श्रोत्याला जिंकणं अधिक आव्हानात्मक असतं, पण हे करत असताना जसं कलाकार मनापासून कला सादर करत असतात तसंच श्रोत्यानंही ती तितकीच मनापासून ग्रहण करावी, त्याचा आनंद घ्यावा...’ ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी पाहू या उत्तम श्रोता होण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गुणांबद्दल...
...................
कोणत्याही कलाकाराची मैफल रंगण्यासाठी महत्त्वाची असते ती कानसेन रसिकांची दाद. त्यांची भरभरून दाद मिळताच, कलाकार अधिक उत्साहानं, जोमानं आपली कला सादर करतो. तो स्वत: कलेत रमून जातोच, पण समोरच्या श्रोत्यालाही गुंगवून टाकतो. स्वत: कलानंद घेतो आणि रसिक श्रोत्यालाही त्यात सामावून घेतो. आनंदाची अशी देवाण-घेवाण अनुभवायची, तर श्रोताही तसाच तयार हवा.

‘मला शास्त्रीय संगीतातलं फार काही कळत नाही, पण ऐकायला खूप आवडतं,’ असं म्हणणारा सर्वसामान्य रसिक श्रोता कलाकाराला नेहमीच आवडतो. कारण जाणत्या श्रोत्यांबरोबरच अशा श्रोत्याला जिंकणं अधिक आव्हानात्मक असतं, असं मला नेहमी वाटतं. वारंवार शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकून, सुरेलपणाला त्याचे कान सरावलेले असतात. अशा श्रोत्याच्या मनाला जर कलाकाराचे सूर भिडले, तर आपली स्वरसाधना फळाला आली, असंच कलाकाराला वाटतं. म्हणूनच अशा श्रोत्याला ‘कानसेन’ म्हटलं जातं. असे श्रोते कलाकारास मनापासून दाद देतात. 

श्रोते आणि कलाकार यांच्यातील अंतर जेवढं कमी, तेवढा त्यांच्यातील संवाद अधिक चांगला. सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात, श्रोते रंगमंचाच्या जवळ असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया कलाकाराला सहज टिपता येतात, पण थिएटर अथवा मोठ्या ऑडिटोरिअममधील कार्यक्रमांत, कलाकार प्रकाशात, तर श्रोता अंधारात असल्यानं ही प्रतिसादाची देवाणघेवाण तिथं होत नाही. 

सच्च्या रसिकानं पाळायची काही पथ्यं : 
उशिरा येऊन अगदी पुढेपर्यंत जाऊन बसणारा श्रोता जसा रसभंग करतो, तसंच कार्यक्रमातून मध्येच उठून जाणारा श्रोताही कलाकाराच्या सादरीकरणात व्यत्यय आणतो. कधी कधी तर समोर बसलेले श्रोते आपापसांत बोलत असतात. सच्च्या रसिकांनी अशा गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजेत. कलाकाराच्या तन्मयतेनं चाललेल्या स्वराविष्कारात रसिकानंही एकरूप झालं पाहिजे. कलाकारानं मनापासून कला सादर करावी आणि श्रोत्यानंही ती तितकीच मनापासून ऐकावी, त्याचा आनंद घ्यावा.

योग्य ठिकाणी योग्य तेवढी दाद देणं, हेसुद्धा खऱ्या रसिकाचं लक्षण आहे. केवळ सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी दाद देऊ नये. ज्या बाबतीत माहिती नसेल, तिथं बोलू नये. एकदा एका मैफलीत कलाकारानं दीड तास ‘तोडी’ राग आळवल्यानंतर, एका उत्साही रसिकानं, ‘आता तोडी होऊन जाऊ द्या,’ अशी फर्माईश केली. तेव्हा त्याच्या डोक्यात हातोडी घालावी, असं त्या कलाकाराला वाटलं नसेल, तर नवल.

साधारणपणे भैरवीनं मैफलीची सांगता होते. अशा वेळी त्यानंतर कुठलीही फर्माईश करायची नसते, याचं भान रसिकांनी ठेवलं पाहिजे. संगीताचं ज्ञान नसलेल्या आणि बोलण्याचंही भान नसलेल्या आयोजक संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांमुळेही काही वेळा गमतीशीर गोष्टी घडतात. आकाशवाणी संगीत संमेलनात सतारवादनाचा कार्यक्रम होता. वाद्यवादनाच्या पद्धतीप्रमाणे, कलाकारानं सतारीवर आलाप, जोड, झाला असं सगळं तासभर सादर केलं. त्यानंतरच नेहमी तबल्यासह वादन सुरू होतं, हे माहीत नसलेला, पहिल्या रांगेत बसलेला आकाशवाणीचा एक प्रशासकीय अधिकारी तबलजीकडे पाहत खूप अस्वस्थ झाला होता. शेवटी न राहवून आपल्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यास तो म्हणाला, ‘त्या तबलजीला म्हणावं वाजव आता काहीतरी. इतका वेळ नुसता बसून राहिलास, तर पूर्ण पेमेंट मिळणार नाही.’

परदेशातल्या स्टुडिओत एका भारतीय कलाकाराच्या गायनाचं रेकार्डिंग होतं. हार्मोनिअम, तबला आणि तानपुरा असे तीन साथीदार आणि गायक कलाकार, असे स्टुडिओत स्थानापन्न झाले. शास्त्रीय गायनाचं रेकॉर्डिंग असल्यानं, ऑडिओ चेक- बॅलन्सिंग झाल्यावर रेकॉर्डिंग सुरू झालं आणि सलग तासाभरात पूर्ण झालं. चांगलं रेकॉर्डिंग झाल्यानं सर्वांना समाधान वाटलं. त्यानंतर सर्वांना मानधन देण्यात आलं. तेव्हा लक्षात आलं, की तानपुरा साथीदारास सर्वांत जास्त मानधन, त्या खालोखाल हार्मोनिअम साथीदारास, नंतर गायकास आणि तबलजीस. सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. त्यांनी ती चूक तिथल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर तिथल्या अधिकाऱ्यानं केलेला खुलासा ऐकून सगळे चाट पडले. ‘ज्यानं जेवढा वेळ परफॉर्मन्स दिला, त्याच्या टायमिंगनुसार मानधन दिलं आहे.’ मग बरोबरच होतं. तानपुरेवाल्यानं पहिल्या सेकंदापासून गायन संपेपर्यंत म्हणजेच शेवटपर्यंत परफॉर्मन्स दिला होता. आता बोला...

एकदा एका म्युझिक सर्कलमध्ये पं. वसंतराव देशपांडे यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम खूपच रंगला. भैरवीपूर्वी संस्थेचा सेक्रेटरी बोलायला उभा राहिला. वसंतरावांचे आभार वगैरे मानून झाले. म्युझिक सर्कलच्या सभासदांना पुढील कार्यक्रमाची माहिती देताना तो अगदी उत्साहात बोलून गेला, ‘पुढच्या महिन्यात याहीपेक्षा चांगला कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय.’ त्यावर वसंतरावांनी तिरपा कटाक्ष टाकत मान हलवली आणि त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटले. 

बोरिवलीत सुविद्यालय शाळेच्या सभागृहात श्रीमती शुभाताई जोशी यांचा उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम अगदी रंगात आलेला असताना, अचानक लाइट गेले. साउंड सिस्टीम बंद पडली. श्रोत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. शुभाताईंनी सांगितलं, साउंड सिस्टीम बंद पडली आहे; पण त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही शांत चित्तानं ऐका, तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल. सभागृहात शांतता पसरली. शुभाताईंनी आपल्या कसलेल्या आवाजात गझल चालू ठेवली आणि खरोखरच ऐकण्यात काहीच फरक पडला नाही. मुळातच शुभाताईंचा रियाजानं कमावलेला भारदार आवाज असल्यानं, पुन्हा लाइट येईपर्यंत कार्यक्रमाच्या रंगतीत काहीच फरक पडला नाही. कच्च्या आवाजाला साउंड सिस्टीमचा आधार लागतो, हेच खरं. असेही समंजस श्रोते असतात. 

या बाबतीत परदेशातील श्रोते खूप शिस्तप्रिय असतात. आम्ही अमेरिकेतल्या डलास येथील म्युझिक सर्कलच्या कार्यक्रमांना गेलो होतो. तिथे ही शिस्त अनुभवली. परदेशी लोकांमुळे आपले लोकही तिथे ही शिस्त दाखवतात. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटं सर्व श्रोते स्थानापन्न झालेले असतात. अगदी वेळेत कार्यक्रम सुरू होतो. ठरल्या वेळी संपतो. सर्व जण शांतपणे मनापासून कार्यक्रमाचा आनंद घेतात. कार्यक्रम संपल्यावर आपली प्रतिक्रिया देतात. पाच-पाच मिनिटं टाळ्यांचा गजर करतात. आपल्याकडे अशी शिस्तप्रियता आणि रसिकता अनुभवायला मिळते, ती पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये. हजारो कानसेन श्रोते जिवाचे कान करून ऐकतात. मनसोक्त दाद देतात. कधी कधी चोखंदळ रसिक, न आवडलेल्या कार्यक्रमाबद्दल नाराजीसुद्धा व्यक्त करतात. त्यामुळे तिथे कलाकारसुद्धा आपलं कौशल्य पणाला लावून, रसिकांची दाद मिळवण्यास उत्सुक असतात. संगीताच्या बाबतीत कलाकार आणि रसिकांमधलं असं हे नातं अतूट आहे.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होईल. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search