Next
ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सजग करणारं पुस्तक
प्रसन्न पेठे
Friday, December 15 | 03:35 PM
15 0 0
Share this story

‘निदान लवकर झालं आणि वेळेवर उपचार केले तर कॅन्सर हा बरा होऊ शकणारा विकार आहे,’ हे वाक्य जाहिरातींद्वारे किंवा रेडिओ, टीव्हीवरून वारंवार ऐकवूनसुद्धा भारतात ही बाब तितक्या गांभीर्याने घेतली जात नाही. म्हणूनच ‘ब्रेस्ट कॅन्सर’सारख्या भयानक विकारावर उपचार करणाऱ्या डॉ. भाऊसाहेब बकाणेंसारख्या प्रख्यात कर्करोगतज्ज्ञाने ‘ब्रेस्ट कॅन्सर : इंडियन पर्सेप्शन्स’ हे इंग्लिश पुस्तक लिहून त्याविषयी समाजात सजगता निर्माण होण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या या पुस्तकाचा परिचय....
......
कर्करोगतज्ज्ञ डॉ. भाऊसाहेब बकाणे यांनी ‘ब्रेस्ट कॅन्सर : इंडियन पर्सेप्शन्स’ हे पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिले असले, तरी सहज कळण्यासारख्या भाषेत लिहिले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच डॉ. बकाणे यांनी कॅन्सर म्हणजे एखाद्या खेकड्याच्या नांग्यांच्या पकडीप्रमाणे घट्ट पकड घेणारा विकार अशी अत्यंत सोप्या भाषेत व्याख्या सांगत भारतीय स्त्रियांच्या बाबतीत कॅन्सरने इतके भयानक स्वरूप का धारण केले आहे, त्याची मीमांसा केली आहे. जगाच्या तुलनेत भारतीय पुरुषांची आणि राजकीय मंडळींची अनास्था आणि भारतीय स्त्रीचे समाजातील स्थान यावर बोट ठेवले आहे.

भारतीय स्त्रियांमध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर’ या जीवघेण्या आजाराविषयी अत्यंत कमी माहिती असते आणि त्यामुळेच कदाचित अनेक गैरसमजुतीही असतात. मग त्या अपुऱ्या माहितीमधून उद्भवलेल्या चुकीच्या प्रवादांमुळे बहुसंख्य स्त्रिया ‘ब्रेस्ट कॅन्सर’ला बळी पडतात. काही ‘प्रमुख प्रचलित गैरसमजुतीं’कडे डॉ. बकाणे यांनी लक्ष वेधले आहे. त्या अशा - १) ब्रेस्ट कॅन्सर हा नेहमीच कुटुंबात संक्रमित होणार आजार आहे. २) स्तनांचा आकार मोठा असणाऱ्या स्त्रियांनाच हा आजार होऊ शकतो. ३) संततिप्रतिबंधक गोळ्या तोंडावाटे घेणाऱ्या स्त्रियांनाच हा आजार होतो. ४) ब्रेस्ट कॅन्सर हा सांसर्गिक आजार आहे. ५) ब्रेस्ट कॅन्सर हा पन्नाशीनंतरच होतो. ६) फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू राहणीमान असणाऱ्या स्त्रियांनाच हा आजार होतो. ७) ब्रेस्ट कॅन्सरवर सर्वोत्तम उपाय म्हणजे तो उद्भवलेला स्तन शस्त्रक्रिया करून पूर्णपणे काढून टाकणे. ८) केमोथेरपीमध्ये सापाचे विष असते. ९) ब्रा वापरणाऱ्या स्त्रियांनाच ब्रेस्ट कॅन्सर होतो. १०) ब्रेस्ट कॅन्सर हा कधीच बरा होऊ शकत नाही. ११) ब्रेस्ट कॅन्सर फक्त स्त्रियांनाच होतो....वगैरे वगैरे. २५ वर्षांहून अधिक काळ शल्यविशारद असलेल्या आणि सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि ब्रेस्ट सर्जरी स्पेशालिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉ. बकाणे यांनी या सगळ्या ‘भ्रामक समजुतीं’वर अत्यंत मुद्देसूद उत्तरे या पुस्तकामध्ये दिली आहेत.

एकूण १२ प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात डॉ. भाऊसाहेब बकाणे यांनी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, तो होण्याची कारणे काय, त्याची लक्षणे काय असतात, त्याचा वेध घेऊन त्यावर उपचार कसे, कोणते आणि कधी करायचे - हे सर्व अत्यंत सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत सांगितले आहे. सुरुवातीच्या टप्प्याचा ब्रेस्ट कॅन्सर ओळखण्यासाठी, त्याची व्याप्ती समजण्यासाठी, स्तनाचा आकार कसा बदलतो, वाढत्या किंवा प्रगत स्टेजमध्ये स्तनाचा आकार कसा होतो, स्तन काढावा लागल्यास काय - असे काही मुद्दे समजण्यासाठी आवश्यक फोटोजसुद्धा दिले आहेत जेणेकरून समजणे सुलभ होऊ शकते.

भारतामधली ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्सची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि भविष्यात एकूणच यावर जलद उपाय होण्यासाठी कोणकोणते बदल आवश्यक आहेत, हेही डॉ. बकाणे यांनी त्यांच्या अनुभवातून सडेतोडपणे मांडले आहे. एकूणच समाजमध्ये याबद्दलची सजगता कशी निर्माण करता येईल, पुरुषांमध्ये जागृती कशी निर्माण करता येईल, स्त्रियांनी वेळोवेळी चाचण्या कशा करून घ्यायला हव्यात, वैद्यकीय अभ्यासक्रमात काही बदल करता येतील का, कर्करोगावर संशोधन करणारी अधिकाधिक केंद्रे उभारता येतील का आणि शासन, समाज तसेच डॉक्टर, पेशंट आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या मध्ये सुसंवाद कसा घडवता येईल याविषयीसुद्धा डॉ. भाऊसाहेब बकाणे यांनी त्यांचे मौलिक विचार मांडले आहेत.

हे पुस्तक केवळ स्त्रियांनीच नव्हे, तर पुरुषांनीसुद्धा वाचणे आवश्यक आहे यात शंका नाही.

पुस्तक : ब्रेट कॅन्सर : इंडियन पर्सेप्शन्स
लेखक : डॉ. भाऊसाहेब बकाणे
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स, डेक्कन जिमखाना, पुणे-४
पाने : ११२
किंमत :
हार्ड कॉपी : २७५ रुपये
ई-बुक : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(For the English review of this book, please click here.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link