Next
‘खताळ पाटील यांचे आयुष्य आजच्या नेत्यांना प्रेरणादायी’
प्रेस रिलीज
Thursday, March 29, 2018 | 12:03 PM
15 0 0
Share this article:

खताळ दादांचा सत्कार करताना राज्यपाल सी. विद्यासागर राव. सोबत बाळासाहेब थोरात, प्रा. राम शिंदे, सुशीलकुमार शिंदे, डॉ. डी. वाय. पाटील, दत्ता पवार, डॉ. पी. डी. पाटील

पुणे : ‘महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे व प्रगतीचे साक्षीदार असलेले बी. जे. खताळ-पाटील यांचा वयाच्या शंभरीतही उत्साह दांडगा आहे. त्यांचे आयुष्य नीतिमूल्ये आणि तत्त्वांचा वस्तुपाठ आहे. आजच्या पिढीतील सर्वच नेत्यांसाठी त्यांचे कार्य आणि आयुष्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून आपण सर्वांनी प्रशासकीय कारभाराचे धडे घ्यायला हवेत. खताळ पाटील यांनी पुन्हा एकदा विधानसभेत यावे, आपण त्यांचे स्वागत करू. त्यासाठी खताळ दादांना उदंड आयुष्य लाभावे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बी. जे. खताळ शतक महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा समिती आणि ‘श्री आदिशक्ती फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने, राज्याच्या सामाजिक व राजकीय इतिहासाचे साक्षीदार, राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एकमेव हयात मंत्री बी. जे. खताळ-पाटील (दादा) यांच्या शतक महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. 

शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, धनंजय ठाकरे यांनी रेखाटलेले रेखाचित्र असे या सत्काराचे स्वरूप होते. ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठा’च्या वतीने, बी. जे. खताळ पाटील यांना ‘डिलीट’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी डॉ. पी. डी. पाटील यांनी केली.

सी. विद्यासागर राव म्हणाले, ‘देशाच्या प्रगतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांपैकी खताळ पाटील एक आहेत. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आजच्या पिढीसमोर आदर्श आहे. लोकांमध्ये कौशल्य विकसनाचे बीज रोवण्यात खताळ पाटलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्यासारखी नवीन कौशल्ये आत्मसात करून, युवकांनी देशाच्या उभारणीत योगदान द्यायला हवे.’

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘राजकारणामध्ये विविध विचारसरणींमध्ये दादांनी स्वतःची बाजू नेहमी ठोसपणे मांडली. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल केली. एक थोर विचारवंत नेता, राज्य कसे चालवायचे, सत्ता कशी चालवायची हे ज्यांच्या कार्यातून आपल्याला शिकायला मिळाले, असे आपल्या सर्वांचे लाडके खताळ दादा आज शंभरीमध्ये पदार्पण करत आहेत. दादांसारखे थोर नेते आज आपल्या सोबत आहेत, हे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे. त्यांच्यातील कामाबाबतची तळमळ, पक्षनिष्ठा, तत्त्ववादीपणा आपण शिकला पाहिजे.’

पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बी. जे. खताळ पाटील म्हणाले, ‘आजच्या या सत्काराने कृतार्थ झालो आहे. राज्यपाल, माजी केंद्रीय गृहमंत्री अशा थोरांच्या हस्ते माझा सन्मान झाला, याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जाती-धर्माच्या आहारी जाऊन राजकारण होता कामा नये. त्यातून बाहेर आल्याशिवाय राज्याची स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे नेत्यांनी जातीधर्मापेक्षा लोकशाही विचाराला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. वेगवेगळ्या विचारसरणीच्या व्यक्ती आज या सन्मान सोहळ्यासाठी एका व्यासपीठावर आल्या, हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे.’

या वेळी अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगपती अरुण फिरोदिया, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाबूशेठ सारडा, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, डॉ. शरद हर्डीकर, संगमनेरचे आमदार डॉ. सुधीर तांबे, श्री आदिशक्ती फाउंडेशनचे दत्ता पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे, बाळासाहेब थोरात, अरुण फिरोदिया, डॉ. डी. वाय. पाटील यांनी खताळ दादांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. दादांबरोबर काम करताना अनेकदा परमेश्वर पाहायला मिळतो, अशी भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता पवार, स्वागत डॉ. पी. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जीवराज चोले यांनी केले. तर सुरेश कोते यांनी आभार मानले.

(खताळ पाटील यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search