Next
लिंबू हस्त बहार व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण
BOI
Tuesday, July 23, 2019 | 01:34 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक छायाचित्रसोलापूर : शेजबाभूळगाव (ता. मोहोळ) येथे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हस्त बहार व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिक व शिवार भेट प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच झाला. 

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उद्यानपंडित शशिकांत पुदे यांनी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मदतीने लिंबू पिकातील हस्त बहाराचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. शेतीतील फळबाग पीक व्यवस्थापनात देशी गोवंशाचे महत्त्व याबाबतही त्यांनी माहिती दिली. 

उद्यानविद्या शास्त्रज्ञ प्रा. किरण जाधव यांनी लिंबू पिकातील तीनही बहार म्हणजे मृग, आंबे व हस्त बहार यांविषयी सविस्तर माहिती देऊन लिंबू पिकाचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांना समजावून संगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने लिंबू हस्त बहार व्यवस्थापनासाठी केलेल्या शिफारशीचे तंत्र त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. 

केंद्राचे विस्तार शिक्षणतज्ज्ञ प्रा. अजय दिघे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगून शेजबाभूळगाव व शिवारातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन तंत्र आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिवार भेटीदरम्यान कृती प्रात्यक्षिकाद्वारे लिंबू पिकातील जिब्रेलिक अॅसिडचा वापर व जीवामृत तयार करण्याबाबतचे तंत्र लिंबू बागायतदारांना समजावून सांगण्यात आले. 

‘महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे लिंबू पिकामध्ये जून-जुलै महिन्यात ५० पीपीएम (PPM) जिब्रेलिक अॅसिड, सप्टेंबर महिन्यात १००० पीपीएम सायकोसील (CCC) व ऑक्टोबर महिन्यात एक टक्का पोटॅशिअम नायट्रेट (KNO3) फवारणी करावी, जेणेकरून हस्त बहारातील फळांची संख्या वाढून लिंबू पिकाचे उन्हाळी उत्पादन वाढण्यास मदत होईल,’ असे प्रा. किरण जाधव यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर तांदळे, शेतकरी महेश पाटील, अण्णा पाटील, रणजित घोंगडे आदींनी परिश्रम घेतले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search