Next
‘मुलांच्या ‘आयक्यू’पेक्षा भावनिक निर्देशांक महत्त्वाचा’
‘विद्याभारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप बेतकेकर यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, April 03, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘मुलांच्या ‘आयक्यू’पेक्षा भावनिक, मानसिक निर्देशांक महत्त्वाचा आहे. आजच्या पालकांसमोर अनेक आव्हाने आहेत; पण त्यातही अनेक संधी आहेत. पालक हा पहिला शिक्षक असतो आणि शिक्षक हा दुसरा पालक असतो. तंत्रज्ञानाचे अस्त्र दुधारी आहे. त्याचा उपयोग चांगल्यासाठीच केला पाहिजे,’ असे प्रतिपादन ‘विद्याभारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप बेतकेकर यांनी केले. रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये गुरुवर्य पु. वा. फाटक यांच्या स्मृतिदिनानिमित्त नुकतेच त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘समस्या जेवढी मोठी, तेवढी मोठी संधी असते. रामायण, महाभारतामधील गोष्टी आजच्या संदर्भाने सांगून मुलांना अनेक गोष्टी शिकवता येतात. टीव्ही पाहताना पहिल्या ३० सेकंदांमध्ये मेंदूतील काही गोष्टी बदलू लागतात व अभ्यासाला मारक गोष्टी वाढतात. त्यामुळे मुलांना टीव्हीपासून दूरच ठेवावे. मुलांना नकारही पचवता आला पाहिजे. ही क्षमता त्यांच्यात विकसित केली पाहिजे. एखादी गोष्ट हवी असेल, तर चार दिवसांनी घ्या. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी मिळतील असे नाही, असे त्यांना सांगा. हे कौशल्य आहे. ते पालकांनी शिकून घ्यावे. हिमनगासारखा गरजांचा सात अष्टमांश भाग आपल्याला समजत नाही. आपण फक्त भौतिक सुखाच्या मागे धावतो. नोकरी करतो; पण बौद्धिक व भावनिक गरज भागवण्यासाठी काय करतो, याचा विचार प्रत्येकाने करावा.’

‘तंत्रज्ञानस्नेही बनताना साधने वापरावीत, पण साधना त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. शिक्षकाची जागा गुगल कधीही घेऊ शकत नाही, असे अमेरिकेतील लेखकाने लिहिले आहे. मुलांचे अभ्यासात लक्ष नाही. एकाग्रता नाही. त्यासाठी विशेष लक्ष द्यावे. आजचे शिक्षण सोपे नाही, तर गुंतागुंतीचे होत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रचंड वेगाशी आपण जुळवून घेऊ शकत नाही. समाजमाध्यमांमुळे विपरित परिणाम होत आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल साहित्य, यू-ट्यूबवर व्हिडिओ, ब्लॉग अशा विविध उपक्रमांतून जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक प्रगती करत आहेत. याची दखल परदेशांतील संस्थासुद्धा घेत असल्याची उदाहरणे बेतकेकर यांनी दिली.

या वेळी दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. सुमिता भावे यांनी फाटक गुरुजींविषयी माहिती सांगितली. चार मुले घेऊन सुरू झालेल्या शाळेत आज पाच हजार मुले असून बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व इंग्रजी माध्यम व मूकबधिर शाळा असा पसारा वाढल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी संस्थेच्या सचिव दाक्षायणी बोपर्डीकर व मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ उपस्थित होत्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 124 Days ago
True . But how do you judge it , measure it
1
0

Select Language
Share Link
 
Search