Next
रिअल हिरो - पोलिस आयुक्त महेश भागवत
BOI
Thursday, March 15 | 06:45 AM
15 0 0
Share this story

तेलंगण राज्याचे पोलीस आयुक्त महेश भागवत

महेश भागवत म्हणजे तेलंगण राज्याचे सध्याचे पोलिस आयुक्त. अहमदनगरजवळ असलेल्या पाथर्डी नावाच्या छोट्याशा गावातला हा एका शिक्षक दाम्पत्याचा मुलगा... आपल्या कार्यकर्तृत्वानं आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी मारतो, त्याची गोष्ट आज वाचू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
............
एखाद्या चित्रपटात हिरोनं पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली असेल, तर तो फारच रुबाबदार दिसतो. त्याचा कडक इस्त्रीतला युनिफॉर्म, डोक्यावरची ती कॅप, युनिफॉर्मवर लागलेली पदकं, कमरेला असलेलं रिव्हॉल्व्हर, पायातले टॉक टॉक वाजणारे बूट आणि तशीच दमदार चाल.... आणि या अधिकाऱ्यांचं फक्त दिसणंच नाही, तर त्यानं दहा-दहा गुंडांचा खातमा करताना बघणं म्हणजे तर स्वतःच्याही अंगात वीरश्री संचारल्याचा अनुभव मिळणं! पण असे हे अधिकारी मी आजपर्यंत हिंदी चित्रपटांतून आणि ‘क्राइम पॅट्रोल’सारख्या मालिकेतूनच बघितले होते. माझे नातेवाईक किंवा मित्रमंडळींत औषधालाही कोणी पोलिस अधिकारी नव्हता. माझ्या मावशीचे मिस्टर पोलिस अधिकारी होते, असं कानावर होतं; पण मी त्यांना कधीच बघितलेलं नसल्यानं तोही प्रश्न मिटला. आणि अचानक माझे मित्र कल्याण तावरे यांच्यामुळे माझी ओळख एका पोलिस अधिकाऱ्याशी झाली. समोरासमोर भेट झाल्यावर त्यांच्याकडून ते खास पोलिसी डायलॉग ऐकायला मिळणार, समोरच्याकडे त्यांनी एक कठोर कटाक्ष टाकला, की समोरचा गर्भगळीत होताना दिसणार, असं कल्पनारंजन करण्यात मी रमले. ठरलेल्या वेळी त्या पोलिस अधिकाऱ्यांशी आमची भेट झाली. त्यांचं नाव महेश भागवत!

प्रत्यक्ष भेटीत महेश भागवत यांचं व्यक्तिमत्त्व खूपच रुबाबदार आणि एखाद्या निर्भीड पोलिस अधिकाऱ्याला शोभेल, असंच मला वाटलं; पण माझ्या स्वप्नरंजनात मी जसा पोलिस अधिकारी कल्पिला होता, तसा मात्र हा मुळीच नव्हता! हा अधिकारी तर - अतिशय मृदू बोलणं, बोलताना साहित्याचा गाढा अभ्यासक असल्याचं जाणवणं, अधिकाराचा वापर करून कोणाशीही दमदाटीपूर्वक वागण्याचा लवलेश नाही - असं कसं होऊ शकतं... माझी तर मतीच गुंग झाली. ओळख वाढली तसतशी मी महेश भागवत यांना ओळखत गेले आणि त्यांच्यातलं साधेपण, कामाप्रति असलेली निष्ठा, सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा बघून मी चकित झाले. 

अहमदनगरजवळ असलेल्या पाथर्डी नावाच्या छोट्याशा गावातला हा एका शिक्षक दाम्पत्याचा मुलगा! आपल्या कार्यकर्तृत्वानं आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी मारतो त्याची ही गोष्ट! महेशच्या आई-वडिलांनी लहानपणापासून महेश आणि त्याच्या भावंडांना स्वावलंबनाचे धडे दिले. अभ्यासाची सवय लावली. महेशला क्रिकेट खेळायला खूप आवडायचं; मात्र खेळाबरोबरच अभ्यासातही तो चांगले गुण मिळवत असे. आई सकाळी सात वाजता शाळेत जात असे. शाळेत वेळेवर पोहोचायचं असल्यानं काम पूर्ण करताना तिची खूप तारांबळ उडत असे. अशा वेळी महेश आपल्या आईला मदत म्हणून कणिक मळून ठेवणं, भाजी निवडून, चिरून ठेवणं, पाणी भरून ठेवणं अशी कामं करून ठेवत असे. इतकंच नाही, तर आई स्वयंपाक करताना ती काय काय करत असते याचं तो बारकाईनं निरीक्षणही करत असे. यामुळे महेश लवकरच स्वयंपाक करण्यातही चांगलाच पारंगत झाला. 

महेशच्या आईनं मुला-मुलींमध्ये कधीच भेदभाव केला नाही. अमुक एक काम मुलीचं आणि अमुक एक काम मुलाचं, असं न केल्यामुळे महेशच्या अंगात लहानपणापासूनच समानता रुजली. त्यामुळे कुठलंही काम करताना त्याला त्या श्रमाचं महत्त्व  समजलं. त्या वेळी गावातल्या शाळा शेणानं सारवलेल्या असत. आठवडी बाजाराच्या दिवशी खूप गुरं तिथं आल्यामुळे शेणही खूप मिळायचं. अशा वेळी महेश आणि त्याचे मित्र शेण गोळा करून आणत आणि सुट्टीच्या दिवशी शाळा शेणानं सारवून काढत. आईनं शिकवलेल्या शेकडो कविता महेशच्याही आपोआप पाठ होत गेल्या होत्या. मोठा होत असताना हळूहळू त्याला साहित्याची गोडी लागली. 

महेशचं शालेय शिक्षण संपलं आणि तो महाविद्यालयीन विश्वात दाखल झाला. या वयात त्याला खूप काही शिकायला मिळालं. सामाजिक कार्याची गोडी लागली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात तो सक्रिय झाला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा महेशवर खूप मोठा प्रभाव पडला. ते कसं काम करतात, कार्यकर्त्यांशी कसा संवाद साधतात, भाषण करताना त्यांची शैली कशी आहे याचं निरीक्षण महेश करत असे. आपल्यालाही असं वागता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे असं त्याला वाटे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करताना महेशचा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचा अभ्यास झाला आणि स्त्री-पुरुष समानता पूर्णपणे अंगी बाणवली गेली. सहजीवन कसं असावं यासाठी आदर्श जोडी म्हणून जोतिराव आणि सावित्रीबाई यांच्याकडे तो बघत असे. या काळात महेशनं खूप वाचन केलं. डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोळकर, मेधा पाटकर आणि विलासराव साळुंखे यांच्या लिखाणाचा आणि कामाचा महेशवर खूप मोठा प्रभाव पडला. या लोकांमुळे त्याच्या विचारांना योग्य दिशा मिळाली. 

महेशचं इंजिनीअरिंग झालं, त्यानं स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आणि पोलिस खात्यात रुजू होत असताना तो पुढच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाला. ज्या वेळी महेश भागवत यांची पोलिस दलात निवड झाली, त्या वेळी त्यांचे मित्र कल्याण तावरे यांनी त्यांना किरण बेदींचं ‘आय डेअर’ हे पुस्तक भेट दिलं. त्या पुस्तकामध्ये कल्याण तावरे यांनी लिहिलं हेातं, ‘प्रिय महेश, तुझ्यातल्या कार्यकर्त्याला जिवंत ठेव.’ आपल्या मित्राचं हे वाक्य महेश भागवत यांच्यावर प्रचंड परिणाम करून गेलं आणि आजही त्यांनी आपल्यातल्या कार्यकर्ता जिवंत ठेवला आहे!

महेशला आता लोक महेश भागवत - एक कर्तव्यदक्ष, निर्भीड आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखू लागले. काही पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दिसणारी गुर्मी त्यांच्यात कधीही दिसत नाही. याचं कारण चळवळींमध्ये काम करताना सर्वसामान्य लोकांमध्ये राहून अंगी नम्रता बाणवून काम कसं करायचं, हे ते शिकले होते. काम करताना संयम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची जोड त्यांच्याबरोबर असते. आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचं ते मानतात. तसंच हाती घेतलेलं काम, आव्हान यशस्वीपणे कसं पेलायचं याची ते काळजी घेतात. 

महेश भागवत यांच्या कामात नक्षलवाद्यांचा बीमोड करणं ही खूप मोठी आव्हानात्मक कामगिरी होती. त्या आधी त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘प्रशासन आपल्या दारी, पोलीस आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. ज्या भागात विकास पोहोचला नाही, तिथे विकासाची कामं पोहोचली पाहिजेत, हे ध्येय समोर ठेवलं. (पिण्याचं पाणी, रस्ते, वीज, बस वाहतूक वगैरे) विकासाच्या कामांमुळे नक्षलवादी बनण्यापासून अनेक तरुणांना परावृत्त करण्यात त्यांना यश आलं. काम करत असलेल्या भागातल्या नक्षलवाद्यांना शरण येण्यास महेश भागवत यांनी भाग पाडलं. त्यांची संख्या २००वरून २०वर आणता आली. 

महेश भागवतांच्या अखत्यारीत असलेल्या एका गावात रस्ता धरणाखाली गेल्यानं त्या गावात जायला रस्ताच नव्हता. पाण्यातून बोटीनं जावं लागायचं. अशा वेळी नक्षलवादी त्रास द्यायचे. पोलिसांत तक्रार करायची असेल, डॉक्टरकडे जायचं असेल, इतर ठिकाणी संपर्क साधायचा असेल, तरी लोकांना रस्ताच नसल्यामुळे नक्षलवाद्यांचा त्रास सहन करावा लागायचा. अशा वेळी महेश भागवत यांना प्रश्नाच्या मुळाशी जाता आलं. त्यांनी गावातल्या लोकांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या गावात जाण्यासाठी रस्ता तयार करायचं ठरवलं. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह महेश भागवतइथूनच अडथळ्यांना सुरुवात झाली. रस्ता तयार करण्यासाठी त्या ठिकाणचा कुठलाही कंत्राटदार नक्षलवाद्यांच्या भीतीनं काम करायला तयार होईना. अशा वेळी महेश भागवत यांनी लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा श्रमसहभाग घेऊन त्यांच्या बरोबरीनं काही पोलीसही मदतीला दिले आणि यातूनच बघता बघता १२ किलोमीटरचा रस्ता दीड महिन्यात तयार झाला. रस्ता तयार झाल्यावर गावात बदलाचे वारे वाहू लागले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी गावावर हल्ला केला, तेव्हा तिथे असलेल्या लंबाडी आणि गोंड लोकांनी नक्षलवाद्यांचा प्रतिकार केला, त्यातल्या एकाची बंदूक हिसकावून घेतली आणि नक्षलवाद्यांना पळवून लावलं. ‘आपण करू शकतो,’ या एकाच गोष्टींचा गावकऱ्यांना इतका आनंद झाला, की सगळा गाव नाचत ती बंदूक पोलिसांना द्यायला पोलिस स्टेशनात पोहोचला. ही गोष्ट त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी गावकऱ्यांचं स्वतः कौतुक केलं आणि गावाच्या विकासासाठी आणखी एक कोटीची मदत जाहीर केली. त्यामुळे ते गाव आता सगळीकडे जोडलं गेलं. 

या गावापासून प्रेरणा घेऊन नंतर २६ गावांमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध उठाव झाले. ३६० गावांतल्या लोकांनी नक्षलवाद्यांना आपल्या गावात येऊ देणार नाही अशी शपथ घेतली. विकासाची कामं व्हायला लागताच ‘नक्षलवादापासून सुटका’ ही भावना लोकांच्या मनात जोर धरू लागली! अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय पोलिस संघटनेनं या सगळ्याची दखल घेतली आणि आदिलाबाद पोलिसांची आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. लॉस एंजेलिसला महेश भागवत यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत हा पुरस्कार स्वीकारला.

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह महेश भागवतनंतर महेश भागवत यांनी हैदराबाद इथं काम सुरू केलं. चारमिनार या भागात हिंदू-मुस्लिम दंगे नेहमी होत. लोकांना पोलिसांबद्दल विश्वास नसल्यानं ते पोलिसांवर हल्ला करत आणि यात अनेक पोलिसांचे बळी जात. महेश भागवत यांनी ‘असं का घडतं’ याच्या खोलाशी जाण्याचं ठरवलं. त्यांनी इमाम मशिदीच्या नेत्यांशी चर्चा केली. मुस्लिम समाजाचा विश्वास मिळवला आणि हे दर शुक्रवारी होणारे दंगे थांबवण्यात यश मिळालं. पोलिसांची प्रतिमा बदलवण्यातही त्यांना यश मिळालं. 

वेगवेगळ्या राज्यांत काम करताना महेश भागवत यांना भाषेचा प्रश्न सतावत असे. अशा वेळी तिथल्या स्थानिक सहकाऱ्यांची कामात मदत होत असेच; पण आपल्याला लोकांच्या मनातलं समजलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे या भावनेतून त्यांनी त्या त्या प्रांतातली भाषा शिकण्याचं आव्हान स्वीकारलं. आज महेश भागवत यांना सहा ते सात प्रादेशिक भाषा उत्तमरीत्या येतात. काम करताना संकटांचे अनेक प्रसंग त्यांच्या वाट्याला येतात. काही प्रसंगी निराशाही पदरी पडते; पण तरीही मनाला क्षणात सावरून पुढे जावं लागतं. आपल्या महाविद्यालयीन काळातली आपली जडणघडण आपल्याला पुढल्या प्रवासात एखाद्या शिदोरीसारखी साहाय्यभूत ठरत असल्याचं महेश भागवत सांगतात. आपल्या अंगी रुजलेलं सामाजिक भान आपल्याला कामात यश मिळवून देतं, असंही ते अभिमानानं सांगतात. 

एकदा एका नक्षलवाद्यानं समर्पण केल्यावर त्याच्याशी बोलताना त्यानं त्याचं इंजिनीअरिंगचं शिक्षण अर्धवट सुटल्याची खंत महेश भागवत यांच्याजवळ व्यक्त केली. तेव्हा महेश भागवत यांनी त्याचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली. आज शिक्षा संपल्यानंतर तीच व्यक्ती इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सन्मानानं जगते आहे. महेश भागवत यांच्या कामाबद्दल अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. 

महेश भागवत यांच्यातल्या कार्यकर्त्याबरोबरच त्यांच्या स्वभावातला मिश्किलपणाही त्यांच्या सहवासात येणाऱ्याला जाणवतो. ते स्वतःच पोलिस अधिकाऱ्यांवरचे विनोद सांगून उपस्थिताना हसवतात. एकदा त्यांनी सांगितलं, ‘आम्हा पोलिसांच्या डोक्यात २४ तास कामाचेच विचार सुरू असतात. त्यामुळे एकदा एका पोलिसाला लग्नाचं निमंत्रण आलं, तेव्हा सहजपणे बोलताना त्यानं समोरच्याला ‘विवाहस्थळ कुठे आहे’ असं विचारायच्या ऐवजी ‘घटनास्थळ कुठे आहे’ असा प्रश्न केला!’ दुसरा एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, ‘पोलीस विभागात आपल्या वरिष्ठांना नेहमी ‘येस सर’ असंच म्हणायचं असतं. एकदा एका अधिकाऱ्यानं एका पोलीस कॉन्स्टेबलची फिरकी घेण्यासाठी त्याला ‘जा हिमालय घेऊन ये’ असा आदेश दिला. तेव्हा ‘येस सर’ म्हणत तोही पठ्ठया कामगिरीवर निघाला. अर्ध्याच तासात एका आइस फॅक्टरीतून त्यानं बर्फाची एक लादी डोक्यावरून पोलीस स्टेशनला आणली आणि आपल्या अधिकाऱ्याला तो म्हणाला, ‘सध्या मी हिमालयातून इतकाच बर्फ आणू शकलो आहे. बाकीचा हिमालय नंतर आणतो.’’

स्पर्धा परीक्षेच्या तयारीत गुंतलेल्या अनेक तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांनी काय वाचावं, कशी तयारी करावी, हे सांगण्यासाठी त्यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. यात अनेक अधिकारी असून, सहभागी विद्यार्थी आपल्या शंका विचारू शकतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शनही केलं जातं. यात विद्यार्थ्यांनी काय वाचावं हे सांगताना मुलांनी ‘दी हिंदू’ पेपर नियमित वाचावा आणि त्यातलं संपादकीय आवर्जून वाचावं, जे वाचन करू, त्याची संक्षिप्त टिपणं काढून ठेवावीत, खेळांची माहिती, विम्बल्डन स्पर्धा, आंतरराष्ट्रीय परिषदा, देशांतले परस्पर संबंध, देशांमधले करार यांचा अभ्यास, इंग्रजी भाषा उत्तम कशी करता येईल ते पाहावे, असा सल्ला ते देतात.

तेलंगण पोलिसांपासून महाराष्ट्र पोलिसांनी निर्भया पथके तयार केली.आज महेश भागवत तेलंगण-हैदराबादचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा सर्वत्र दबदबा आहे. त्यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक, राष्ट्रपती पोलिस उल्लेखनीय सेवा पदक, मणिपूर पोलिस स्पेशल ड्युटी पदक आणि गृहमंत्री प्रशंसा पदक देऊन गौरवण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिस संघटनेचे मानाचे चार पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. मानवी तस्करीसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या भयंकर गुन्ह्यांना रोखण्यासाठी महेश भागवत यांनी ‘आसरा’ नावाचा एक प्रकल्प उभा केला आणि त्यांचं हे मॉडेल अनेक देशांनी स्वीकारलं. त्यांच्या अनोख्या कार्याची दखल भारतातच नव्हे, तर इतर देशांनी घेऊन त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान मिळाले. २००४ साली आदिलाबाद जिल्ह्यातल्या नक्षलवादी भागात लोकसहभागातून तयार केलेल्या १२ किलोमीटरच्या रस्याी मुळे त्यांना लॉस एंजेलिस इथं पुरस्कार देण्यात आला. २००६ साली नलगोंडा जिल्ह्यात वेश्याव्यवसाय निर्मूलनाच्या कामाबद्दल, त्यांच्या ‘आसरा’ प्रकल्पाबद्दल बॉस्टन इथं पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

महेश भागवत यांनी आजवर आठ पुस्तकांचं लेखन केलं असून, ‘साधना’पासून अनेक साप्ताहिकं, वर्तमानपत्रं यातूनही ते लोकांसाठी सातत्यानं लिखाण करत असतात. नुकताच, अमेरिकेचा ‘रिअल हिरो’ पुरस्कार मिळालेले आणि राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित झालेले महेश भागवत यांच्याशी बोलायला मिळणं म्हणजे स्वतः समृद्ध होणं आहे. खरं तर महेश भागवत यांचं वेगळेपण यात आहे, की हा माणूस इतका मोठा पोलीस अधिकारी असूनही तो सर्वसामान्य माणसांपासून तुटलेला नाही. आपला कोणी आप्त, स्नेही असावा, असा हा माणूस पहिल्याच भेटीत कोणालाही भावतो. अहंकाराचा लवलेश नसलेला हा माणूस प्रत्येकाला जोडत चालला आहे, याचं कारण त्याच्यात जागा असलेला कार्यकर्ता! समाजाविषयी त्यांना असलेली तळमळ!

महेश भागवत यांचा ई-मेल : mmbips@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sanjay sonis About 146 Days ago
A great person with great thoughts & visionary thinking. A royal salute for him. Lovely person.
0
0
Omprakash Vikramrao Dahiphale About 146 Days ago
महेश भाऊ म्हणजे, भावी पिढी साठी एक आदर्श मुलगा, कर्तव्यदक्ष अधिकारी आणि मित्राचा मित्र तसेच उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत.
0
0
Nandkishor Yewale About 146 Days ago
Salute to our Honest Police officer.. Great job ahead
0
0
Adv Bade subhash kundlik About 206 Days ago
Very great officer of India
0
0
वैशाली म्हेत्रे About 266 Days ago
कर्तृत्व आणि कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी महेश भागवत यांना मानाचा मुजरा,,आपले कार्य नकीच प्रशन्सनीय आहे,,आपल्या कडून अशीच देश सेवा घडावी या साठी हार्दिक शुभेच्छा आणि आपले अभिनंदन,,,
0
0
Sudhir Lipare About 267 Days ago
Salute to the Brave Police Officer. We have proud.
0
0
Vivek Deshpande About 269 Days ago
Excellent article on an excellent humen officer Mahesh Bhagwat
0
0
शिवाजी बबनराव शिरसाठ, म About 270 Days ago
महेश भागवत साहेब यांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
0
0
Sham Dekhane About 270 Days ago
महेश भागवत सरांच्या कर्तृत्वाला मनापासून अभिवादन💐💐
0
0
Devadhe Ashitosh About 270 Days ago
Great sir
0
0
Vitthal Dahifale About 270 Days ago
Amacha Mati amchi manas Congrats sir Salam tumchya kamala
0
0
श्री बाजीराव अनभुले About 270 Days ago
सलाम सर,आपल्या कार्यास....हार्दिक हार्दिक अभिनंदन.
0
0
Shirin Kulkarni About 271 Days ago
खूप सुंदर ओळख करून दिली आहे महेश भागवत सरांची. सरांच्या कर्तृत्वाला मनापासून अभिवादन 🙏🙏🙏
0
0
Dnyaneshwar Shirsat About 271 Days ago
महेश सर तुमच्यासारखा हिरा पाथर्डीच्या मातीत जन्मला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा
1
0
Dipmala Jadhav About 271 Days ago
Sir I am really proud of you. Your work is great and bravery.
0
0
Sanjay kokane About 271 Days ago
At the of engineering also he was social.Though he is a inteligent glory now and then, he use give more time in interaction with friends and surroundings.Being a classmate , I know about him ,he cannot show any type of attitude of his post. He is always humerous and trustworthy to mankind. Sanjay kokane
0
0
Nanda Virbhadre About 272 Days ago
महेश तुझ्या सारखा मित्र मिळवून आम्ही धन्य झालो. रोज किती लोकांचे आयुष्य सुधारून तू त्यांंचे आशीर्वाद मिळवतोस. नुसते वाचूनच मला फार अभिमान वाटतो आहे. खूप छान काम आहे तुझे, शब्द अपुरे पडताहेत. Hats off to you.
2
0
सोमनाथ अरुण बुगड. About 272 Days ago
महेश साहेब, आम्हांला आपला सार्थ अभिमान आहे. सलाम साहेब.
2
0
Ganesh Avhad About 272 Days ago
Really i dont hv words if i write/speak abt writer my word will be less Great job keep it up
0
0
Sunanda Sanjay Galande About 272 Days ago
Very good
0
0
Narayan wanve About 272 Days ago
Great
1
0
Prof.Madhav Murumkar About 272 Days ago
Very well wrtten ellucive article,describes his life graph so far... The article could inspire many young boys & girls... They can learn "If there is will anything is possible,irrespective of one's family background,financial condition,rural schooling.
3
1
Manik Jadhav,, About 272 Days ago
दीपा.तुमचं मनापासून अभिनंदन. अतिशय प्रेरणादायी आहे महेश भागवत सरांचा प्रवास.. इतिहासातल्या व्यक्तिरेखांपेक्शा वर्तमानातील अशा कर्तृत्ववान माणसांची ओळख समाजाला घडवून विचारांना दिशा योग्य देण्याची ही धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे..
2
1

Select Language
Share Link