Next
जाणून घेऊ या योगासने - भाग दुसरा
BOI
Tuesday, June 18, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:


पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या औचित्याने काही योगासनांची माहिती आणि व्हिडिओ येथे प्रसिद्ध केले जात आहेत. आज, दुसऱ्या भागात पाहू या वक्रासन, शलभासन, पादहस्तासन आणि शवासन...
..................
वक्रासन : वक्रासन हे बसून करावयाचे आसन आहे. ‘वक्र’ हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ ‘वाकडा’ असा होतो. हे आसन केल्यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळतो. 

असे करावे हे आसन : 
दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून बसावे. दोन्ही हात बगलेत ठेवावेत. तसेच ताठ बसून नजर समोर ठेवावी. उजवा पाय हळूहळू गुडघ्याकडे वळवावा. तो वळवताना डावा पाय गुडघ्यापासून अगदी सरळ ठेवावा. नंतर उजवा हात मागे घेऊन, पाठीच्या कण्याला समांतर होईल, असा ठेवावा. थोड्या वेळानंतर डावा पाय गुडघ्याकडे वळवून घ्यावा. ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. त्यानंतर डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याकडे वाकडे करून जमिनीवर ठेवावा. नंतर मान हळूहळू मागच्या बाजूला वळवत जाऊन पूर्णपणे मागे पाहण्याचा प्रयत्न करावा. 

घ्यावयाची काळजी : 
उजवा पाय गुडघ्यात वळवताना डावा पाय सरळ ठेवणे आवश्यक आहे. मागे ठेवलेला हात काखेपासून सरळ ठेवत पाठीच्या कण्यापासून सहा ते नऊ इंचाच्या दरम्यान ठेवावा. पोट आणि कंबर यांचे आजार असलेल्यांनी योग च‍िकित्सक अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आसनाचे फायदे : 
वक्रासन केल्यामुळे किडनी, मूत्रपिंड निरोगी राहून, त्यांचे काही आजार असतील, तर ते बरे होण्यासही मदत होते. शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मानेची दुखणीही बरी होतात.


शलभासन : ‘शलभ’ म्हणजे ‘कीटक’. या आसनात शरीराची आकृती किंवा अवस्था एखाद्या कीटकासारखी होते. त्यामुळे या आसनास शलभासन असे म्हटले जाते. पोटावर झोपून केल्या  जाणाऱ्या आसनांमध्ये या आसनाचा समावेश होतो. 

असे करावे हे आसन :
सर्वप्रथम पोटावर झोपावे. हनुवटी जमिनीवर टेकवावी. नंतर दोन्ही हात जांघेखाली दाबावेत. दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय जवळ घ्यावेत व समांतर क्रमाने वर उचलावेत. पाय वर उचलण्यासाठी हाताने मांड्यांवर जोर द्यावा. ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. आता हळूहळू पाय पुन्हा जमिनीवर आणावेत. दोन्ही हात मांड्यांखालून काढून घ्यावेत व मकरासनाच्या स्थितीत परतावे.

घ्यावयाची काळजी : 
शलभासन करताना पाय गुडघ्यांवपासून वळणार नाहीत याची दक्षता घ्याावी. हनुवटी जमिनीवरच टेकलेली असावी. क्षमतेनुसार केवळ १० ते ३० सेकंद या स्थितीत राहावे. कोणत्याही कारणाने मांड्यांना त्रास होत असेल, तर हे आसन करू नये.

आसनाचे फायदे : 
कंबरदुखीच्या सर्व प्रकारांत आणि आजारांत शलभासन करणे फायद्याचे ठरते. हे आजार दूर होण्यास या आसनाने मदत होते.


पादहस्तासन : आपल्या शारीरिक आरोग्यात महत्त्वाच्या काही अवयवांमध्ये पाठीच्या कण्याचा समावेश होतो. कणा मजबूत आणि लवचिक राहिला, तरच आपण चालू शकतो आणि इतर शारीरिक हालचाली करू शकतो. हा पाठीचा कणा मजबूत राहण्यासाठी केले जाते ते पादहस्तासन.

असे करावे हे आसन : 
सरळ उभे राहून दोन्ही पाय एकमेकांना जोडावेत. एक दीर्घ श्वास घेऊन हात वर उचलून ताठ करावेत. वरच्या बाजूला खेचून घ्यावेत. या स्थितीत खांदे कानाला चिकटून असतील. आता श्वास सोडून कमरेतून पुढे खाली वाकावे. दोन्ही पाय गुडघ्यातून न दुमडता हाताचे तळवे जमिनीवर ठेवावेत. डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. हे करताना जास्त ताण देण्याचा प्रयत्न मात्र करू नये. श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून शक्य तेवढा वेळ या स्थितीत थांबावे. ही या आसनाची पूर्ण स्थिती आहे. मग हळूहळू पुन्हा आधीच्या स्थितीत यावे. दिवसातून दोन-तीन वेळा हे आसन करावे. 

घ्यावयाची काळजी : 
पित्त (अॅसिडिटी), उच्च रक्तदाब, हृदयविकार, मायग्रेन, कंबरेचे दुखणे, ऑस्टिओपोरोसिस, स्लिप डिस्क आणि सायटिकाच्या वेदना होत असतील, तर हे आसन अजिबात करू नये. क्षमतेपेक्षा जास्त वेळ आसनात थांबू नये. 

आसनाचे फायदे : 
जांघा, पोटऱ्या यांच्या स्नायूंना हे आसन बळकटी देते. या आसनामुळे बद्धकोष्ठता, गॅस, लठ्ठपणा, मधुमेह, भूक न लागणे हे पोटाशी संबंधित विकार कमी होण्यास मदत होते. हे आसन केल्याने फुफ्फुसे, हृदय आणि मेंदूच्या दिशेने होणारा रक्तपुरवठा वाढतो. यामुळे हे अवयव अधिक कार्यक्षम होतात. मुलांची उंची वाढवण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरते. सुषुम्ना नाडीवर ताण येत असल्याने ती मजबूत होते आणि पूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचे संतुलन कायम राहते.


शवासन : ‘शव’ म्हणजे अर्थातच ‘मृतदेह’. आपल्या शरीराला मृतावस्थेसारखे करणे म्हणजेच शवासन. थोडक्यात संपूर्ण शरीराला शिथिल करण्याचे कार्य हे आसन करते. 

असे करावे हे आसन : 
सर्वप्रथम पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही पायांत पुरेसे अंतर ठेवावे. पायाचा पंजा बाहेर व टाच आत असायला हवी. दोन्ही हात शरीरापासून सहा इंच लांब असावेत. हात मोकळे ठेवावेत. मान सरळ व डोळे बंद असावेत. हळूहळू संपूर्ण शरीर सैल सोडून द्यावे. त्यानंतर संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करावे. श्वास आत घेणे व बाहेर जाणे या प्रक्रियांवर नीट लक्ष द्यावे. श्वास आत येताना हळुवार थंडपणा जाणवतो, त्याचा अनुभव घ्यावा. त्याच वेळी श्वास बाहेर सोडताना हलका गरमपणा जाणवतो, हादेखील अनुभव घ्यावा. यानंतर अनुक्रमे छाती व नाभीवर लक्ष केंद्रित करावे. मनातल्या मनात शंभरपासून एकपर्यंत अशा उलट्या क्रमाने आकडे मोजावेत. आकडे मोजण्यात चूक झाल्यास शंभरपासून पुन्हा सुरू करावे. 

घ्यावयाची काळजी : 
या आसनात डोळे अखंड बंद असावेत. हात शरीरापासून सहा इंच दूर व पायात एक ते दीड फूट अंतर असावे. शरीर पूर्णपणे सैल सोडलेले असावे. श्वास घेताना शरीर हलवू नये. आपले लक्ष पूर्णपणे शरीरावर असायला हवे, मनातल्या विचारांवर नाही. त्यामुळे श्वास घेण्यातली सहजता अनुभवता येईल.

आसनाचे फायदे : 
मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश यांसारख्या आजारांवर हे आसन उपयुक्त आहे. या आसनात मन शरीराशी जोडले गेलेले असते. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे बाहेरचे विचार उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे मन विश्रांत अवस्थेत असते. शरीराचा सगळा थकवा दूर होतो.


(पहिल्या भागातील आसनांची माहिती वाचण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search