रत्नागिरी : ‘माय फ्रेंड गणेशा’ ही पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा येत्या रविवारी (२६ ऑगस्ट २०१८) रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी ही स्पर्धा वेगळेपणा जपणारी असून, यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. दोन सप्टेंबरला राजापुरातही ही स्पर्धा होणार आहे.
ही स्पर्धा नंदकुमार पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा ‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजित करण्यात आली आहे. रविवारी पटवर्धन हायस्कूलमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून, सकाळी १० ते एक या वेळेच स्पर्धा व दुपारी तीन वाजता बक्षीस वितरण असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या स्पर्धेत पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे गट आहेत. तिसरा गट आधीच्या स्पर्धांतील विजेत्यांचा असेल. आतापर्यंत ५०हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी नावनोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी शहर, परिसरातील शाळांतील विद्यार्थी दररोज सराव करत आहेत. आसमंत फाउंडेशनतर्फे स्पर्धेसाठी पुठ्ठा व शाडूची माती दिली जाते.
राजापुरातही आयोजन
रत्नागिरीत या स्पर्धेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे मित्रमेळा या संस्थेच्या माध्यमातून राजापूरमध्येही स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा दोन सप्टेंबरला राजापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थी आणि पर्यावरणासाठी आसमंत फाउंडेशन वर्षभर विविध उपक्रम राबवते. ‘विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या निमित्ताने साकारलेल्या गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरिता ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो,’ असे आसमंत फाउंडेशनचे प्रमुख व उद्योजक नंदकुमार पटवर्धन म्हणाले.
अधिक माहितीसाठी संपर्क : नंदकुमार पटवर्धन : ९९७०० ५६५२३
(स्पर्धेच्या निकालाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)