मुंबई : ‘सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन पाळले आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘भाजप’ प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी व्यक्त केली. दरम्यान, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दानवे म्हणाले की, ‘आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. त्याचबरोबर ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी ‘भाजप’ सरकारने घेतली आहे. ‘भाजप’ने विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे स्पष्ट आश्वासन दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व वैधानिक प्रक्रिया भाजपा सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण केली आहे.’

‘सरकारने सातत्याने मराठा समाजासह सर्वच समाज घटकांचा संवेदनशीलतेने विचार केला आहे. मराठा समाजाने काढलेल्या मोर्चांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी समाज रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने सर्व मागण्यांचा विचार केला. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळातून मदत, असे उपाय लागू केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या आजच्या निर्णयामुळे समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना याचा लाभ होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सब का साथ सब का विकास’ या धोरणानुसार मराठा समाजासोबतच ओबीसी, धनगर, मुस्लिम अशा सर्व समाजाच्या कल्याणासाठी ‘भाजप’ सरकार वचनबद्ध असून, सरकार याबाबतीत योग्य निर्णय घेईलच,’ असे दानवे यांनी नमूद केले.

दरम्यान, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज एकमताने मंजूर करून मराठा समाजाला न्याय दिल्याबद्दल ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय ईच्छाशक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली असून, तत्परतेने मराठा समाजाला आरक्षण देताना एससी एसटी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची काळजी त्यांनी घेतली. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी ‘आरपीआय’ने सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आंबेडकरी जनतेची भूमिका रिपब्लिकन पक्षाने मांडली होती.’
‘मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाजाने अनेक मोर्चे आणि अनेक मराठा तरुणांनी आत्मबलिदान केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला आलेले यश साजरे करताना त्यासाठी शाहिद झालेल्यांना मराठा तरुणांचे संस्मरण कायम मनात ठेवा,’ अशी भावना आठवले यांनी व्यक्त केली.

विधीमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘शैक्षणिकदृष्टया मागास एसइबीसी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी, जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्यातील नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी तत्सम व संबंधित बाबींची तरतूद करण्यासाठी जे विधेयक मांडण्यात आले त्या विधयेकाचे आम्ही संपूर्ण विरोधी पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वागत करतो.’