Next
‘व्यवसायात नावीन्य, कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा’
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे मत
BOI
Tuesday, January 08, 2019 | 05:33 PM
15 0 0
Share this article:

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या २७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह युरोपा लॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक सलील जोशी यांची मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली.

पुणे : ‘व्यवसाय करताना नावीन्यता आणि कुटुंबीयांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. व्यवसाय उभारताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, या समस्यांना घाबरून जाण्याऐवजी त्याचे संधींमध्ये रूपांतर केले, तर आपण यशस्वी होऊ शकतो. नातेवाईकांवर विश्वास आणि एकमेकांच्या विचारांचा आदर ठेवणे हे उत्तम व्यावसायिक असल्याचे लक्षण आहे,’ असे मत एलके केमिकल्सचे संस्थापक संचालक डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या २७व्या वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह युरोपा लॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक सलील जोशी यांची मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली. या वेळी दोन्ही उद्योजकांचे कुटुंबीय, मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी, श्रीपाद करमरकर, माधव गोडबोले, राहुल कुलकर्णी, प्रसाद पटवर्धन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. जास्तीत जास्त तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे काम मित्रमंडळ गेली २६ वर्षे करीत आहे.


रवींद्र कुलकर्णी म्हणाले, ‘शालेय वयापासूनच काहीतरी इनोव्हेशन करण्याचा विचार मनात होता. बेंगळुरूच्या आयआयटीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर माझे जग बदलले. तेथील अनुभवामुळे माझे विश्व विस्तारले. कोलंबिया विद्यापीठात शिक्षणाची आणि तिथेच कामाचीही संधी मिळाली. आईच्या इच्छेनुसार, काही काळानंतर भारतात परतलो आणि व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. आपल्या देशात उपलब्ध साधनांचा वापर करून जगात मागणी असणाऱ्या वस्तूंची निर्मिती करण्यासह वैश्विक स्तरावर भारताचे नाव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शैक्षणिक गुणवत्ता, दळणवळण, कुशल कामगार यामुळे पुण्याची निवड केली. आज संपूर्ण कुटुंब या व्यवसायात आहे, याचा आनंद वाटतो. अनेक नावीन्यपूर्ण केमिकल बनवणारी कंपनी म्हणून आमची ओळख आहे.’


सलील जोशी म्हणाले, ‘कठोर परिश्रम आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर व्यवसाय वृद्धी होते. कुलूपासारख्या उत्पादनांचा व्यवसाय सुरू करणे सुरुवातीला जिकिरीचे वाटत होते. परंतु, गुणवत्ता, कामातील प्रामाणिकपणा आणि ग्राहकाशी जोडलेली नाळ यामुळे आज युरोपा लॉक्स यशस्वी कामगिरी करीत आहे. व्यवसायात ‘टर्न ओव्हर’पेक्षा ‘कलेक्शन’ला महत्व दिले पाहिजे. तरुणांनी जिद्द, मेहनत आणि नावीन्यतेचा ध्यास घेऊन काम केले, तर कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय उभा करता येतो. नोकरी मागण्यापेक्षा व्यवसाय करणे कधीही चांगले आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करत राहणे गरजेचे आहे.’ ‘जीएसटीमुळे कररचनेत सुसूत्रता आली असून, सध्या कर भरणे अधिक सुकर वाटते,’ असेही त्यांनी नमूद केले. 

या कार्यक्रमात गजानन चाफळकर, चिंतामणी हसबनीस, प्रज्ञा आगाशे, प्रतिभा भांबूरकर या छोट्या व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. विशाखा वेलवणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक सुप्रिया देव यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search