Next
‘लाडू’चे स्वप्न.. महाराष्ट्र केसरी..
BOI
Friday, July 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

लाडू गायकवाड

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका सध्या खूप गाजत आहे. या मालिकेत आलेला नवा पाहुणा लाडू म्हणजेच राजवीरसिंह रणजित गायकवाड सध्या खूप चर्चेत आहे. केवळ पाच वर्षांचा असलेला हा लाडू त्याच्या खऱ्याखुऱ्या जीवनातही कुस्ती शिकत असून, मालिकेतही हाच संदर्भ दाखवला जात आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या छोटा कुस्तीपटू लाडू गायकवाडबद्दल...
......................
दूरचित्रवाणीवरील काही मालिका व कार्यक्रमांत मनोरंजन असते; पण काही वेळा या मालिकांचा थेट संबंध त्यातील कलाकारांच्या व्यक्तिगत जीवनाशीही येत असतो. अशीच झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही  मालिका सध्या खूप गाजत आहे. या मालिकेत आलेला नवा पाहुणा लाडू म्हणजेच राजवीरसिंह रणजित गायकवाड हा सध्या खूप चर्चेत आहे. केवळ पाच वर्षांचा असलेला हा लाडू त्याच्या खऱ्याखुऱ्या जीवनातही कुस्ती शिकत असून, मालिकेतही हाच संदर्भ दाखवला जात आहे. या लाडूने आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून कुस्तीत नाव कमवण्याचे स्वप्न पाहिले आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र केसरी किताब मिळविण्याचेही स्वप्न त्याने इतक्या लहान वयात पाहिले आहे.

लाडूचे आजोबा विठ्ठल कृष्णा गायकवाड हे नामवंत पैलवान होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले; पण सांगली जिल्ह्यातील डिग्रज कसबे गावात आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते ते त्यांच्या कुस्तीतील प्रावीण्यासाठी. त्यांचा मुलगा आणि लाडूचे वडील रणजित गायकवाड यांनी महाराष्ट्र केसरी किताब मिळवावा असे विठ्ठल गायकवाड यांना नेहमी वाटायचे; पण रणजित यांची आवड कुस्तीपेक्षा वेटलिफ्टिंगमध्ये जास्त होती. आजवर त्यांनी सलग ५२ राज्यस्तरीय आणि दहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि अनेक पदके मिळवली आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही सहभाग नोंदवत आपली कामगिरी सिद्ध केली आहे. आता ते भारतीय लष्कराच्या सेवेत आहेत; पण आपल्या वडिलांची इच्छा आपल्या मुलाने म्हणजेच लाडूने पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा आहे.

वडिलांच्या पुढाकाराने व आईच्या पाठिंब्यामुळे लाडू आता कुस्तीच्या राजधानीत म्हणजेच कोल्हापूरमध्ये दाखल झाला आहे. आई पल्लवी यांनी काही काळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी केली; पण लाडूला जर पहिलवान बनवायचे असेल, तर कोल्हापूरला येण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर हे कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. इथेच लाडू मोतीबाग तालमीत कुस्तीचे धडे गिरवत आहे.

आजोबा टेलिफोन खात्यात नोकरी करत असताना त्यांचा या तालमीशी संपर्क असायचा आणि त्यामुळेच लाडूलादेखील याच तालमीत त्याच्या वडिलांनी प्रवेश घेऊन दिला. शिवकालीन लाठी-काठीच्या खेळात तर लाडू या इतक्या लहान वयातही इतकी प्रभावी कामगिरी करतो आहे, की पाहणारे थक्क होऊन जातात. कोल्हापूरमधीलच प्रसिद्ध लिटल वंडर शाळेत तो शिकत असून, रोज तो तीन तास तालमीत घाम गाळत आहे.  केवळ कुस्तीच नव्हे, तर बॅडमिंटन, फुटबॉल आणि बुद्धिबळाचीही त्याला आवड आहे. मध्यंतरी त्याची दखल डेन्मार्क येथील एका क्रीडाप्रेमी दिग्दर्शकानेही घेतली. त्यांनी लाडूच्या खेळाचे विशेषतः कुस्तीतील सरावाच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटोंचे संकलन केले आहे. लवकरच त्याच्यावर एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) प्रदर्शित होणार आहे.

शालेय शिक्षणातही अत्यंत हुशार असलेला लाडू क्रीडा क्षेत्रातच नाव कमावण्यासाठी अभ्यासाइतकाच मन लावून न कंटाळता कुस्तीचाही सराव करतो. लाडू इतक्या लहान वयात कुस्तीमध्ये प्रगती करत आहे. आज कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या संपूर्ण भागात त्याचे नाव तुफान चर्चेत आले आहे. त्याची हीच लोकप्रियता या मालिकेने लक्षात घेतली आणि लाडूची छोट्या पडद्यावर मालिकेच्या माध्यमातून दिमाखदार एंट्री झाली. आज या मालिकेतील लाडूचे काम पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. इतकेच नव्हे, तर मालिकेचे जिथे जिथे चित्रिकरण होते, तिथे लाडूला पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी होते. लाडूच्या आई पल्लवी यांचे वडील किरण आणि मामा विशाल नले हे मोतीबाग तालमीत रोज हजर राहून लाडूच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतात. त्याने भविष्यात महाराष्ट्र केसरीच नव्हे, तर हिंद केसरीदेखील गाजवावी असे त्यांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी लाडूही प्रचंड मेहनत घेत आहे.

कोल्हापूरच्या मातीतच रांगडे पहिलवान तयार होतात आणि आजही नवनवीन खेळाडू या खेळाकडे आकर्षित होऊन यात यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतात. कुस्तीला पूर्वीपासूनच मोठा लोकाश्रय आहे; पण राजाश्रय नव्हता. आता मात्र साक्षी मलिक, सुशील कुमार, नरसिंग यादव यांसारख्या खेळाडूंमुळे या खेळाला राजाश्रयही मिळू लागला आहे. एकीकडे प्रायोजक आणि पुरस्कर्तेदेखील येत आहेत. खेळाडूंना पूर्वीपेक्षा जास्त पैसेही मिळत आहेत आणि राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी केलेल्या मल्लांना शासकीय सेवेतही सामावून घेतले जात आहे.

लाडूसारखे अनेक खेळाडू घरचा वारसा जपण्यासाठी किंवा या खेळाची आवड म्हणून आखाड्यात उतरले आहेत. आता त्यांनी पाहिलेली स्वप्ने जर प्रत्यक्षात आली, तर केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला पदकविजेते कुस्तीपटू मिळतील याचा विश्वास वाटतो. कुस्तीची गौरवशाली परंपरा अशीच अखंडपणे पुढे चालत ठेवण्याची जबाबदारी लाडूसारख्या मुलांवर आहे आणि त्यांची या खेळाशी असलेली बांधिलकी पाहता, ही परंपरा देशाला येत्या काळात लाडूसारखे कित्येक नामवंत मल्ल देईल यात शंका नाही.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दत्तात्रय भोसले, रोपळे बुद्रूक About 244 Days ago
mast
0
0

Select Language
Share Link