Next
मराठीचा ‘राजसूय यज्ञ दिन!’
BOI
Monday, June 11, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा मराठी जीवनात सर्वसमावेशक क्रांती घडवून आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. इतर गोष्टींसोबतच परकीय भाषांचे आक्रमणही परतवून लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परकीय भाषांतील शब्दांचा वापर टाळण्यासाठी त्यांनी राज्यव्यवहारकोश तयार करून घेतला. पूर्वीचे राजे अश्वमेध, राजसूय यज्ञ करायचे. शिवाजीराजांनी भाषेचा अश्वमेध केला, मराठीचा राजसूय यज्ञ केला. त्या यज्ञाचे आपण पाईक होऊ या. शिवराज्याभिषेक दिन मराठीचा ‘राजसूय यज्ञ दिन’ म्हणून साजरा केला गेला पाहिजे.
...........
सहा जून. राज्याभिषेक दिन. ‘प्रतिपच्चंद्रलेखैव’ वाढणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा अत्युच्च कळस गाठणारा दिन. या वर्षीही हा दिन तेवढ्याच थाटामाटाने साजरा झाला. आता काही दिवसांनी तिथीनुसारही तो वेगळा साजरा होईलच. शिवाजी महाराजांचे स्मरण होत असेल तर तो दोनदा काय, तीनदा साजरा केला तरी हरकत नाही; पण महाराजांचे स्मरण करायचे म्हणजे काय करायचे? शिवाजी महाराज म्हणजे केवळ लढाई, केवळ गनिमी कावा एवढेच आहे काय?

शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावरील परकी सत्तेचे जोखड काढले, हे केवळ एक विधान झाले. त्यांनी हे जोखड सर्वार्थाने काढले, हे वास्तवाच्या अधिक जवळ जाणारे विधान होय. अन् सर्वार्थाने म्हणजे त्यात भाषेचाही समावेश आलाच. शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला, हे आपण जाणतो; पण त्यामागची कारणमीमांसा किंवा भूमिका आपल्याला कधी जाणवत नाही. 

साधारण तेराव्या शतकापासून मराठीला फारसी (पर्शियन) भाषेचा वेढा पडायला सुरुवात झाली... इतकी, की मराठी नामशेष होते की काय, अशी भीती निर्माण झाली. मराठी साहित्यामध्ये फारसी शब्दांचा प्रादुर्भाव तेराव्या शतकापासून सुरू झाला; मात्र चौदाव्या शतकात बहामनी राज्याची स्थापना झाल्यानंतर फारसी शब्दांचे आक्रमण अधिकाधिक वाढत गेले. आणि शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत ते मराठी भाषेला पूर्णपणे ग्रासून टाकण्याइतके व्यापक झाले. शिवाजी महाराजांच्या काळात राज्याची भाषा फारसी की मराठी असा प्रश्न उद्भवला होता. 

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी या परिस्थितीचे सविस्तर विवेचन केले आहे. चौदाव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत मराठीत लेखन, अन् तेही जाणीवपूर्वक मराठीत लेखन करणाऱ्या संतकवींनी व पंडित कवींनी फारसीच्या आक्रमणाला आपल्या परीने पायबंद घालण्याचा प्रयत्न केला; पण ही जातिवंत मराठी त्यांच्या पद्यापुरतीच मर्यादित राहिली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा त्यामागे केवळ राजकीय सत्ताबदल एवढा संकुचित उद्देश नव्हता. मराठी जीवनात सर्वसमावेशक क्रांती घडवून आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. 

शिवाजी महाराजांनी लिहिलेला पत्रसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्या पुस्तकात एकूण २०३ पत्रे समाविष्ट केलेली आहेत. या पत्रांतील फारसी मायन्यांची चर्चा शं. ना. जोशी यांनी तपशिलात केलेली आहे. या पत्रांचा कालानुक्रमाने अभ्यास केला, तर महाराजांनी मराठीला किती जाणीवपूर्वक वळण लावले, याचे चित्तथरारक उदाहरण सापडते. 

वि. का. राजवाड्यांनी इ. स. १६२८, १६७७ व १७७७ अशी पन्नास वर्षांच्या अंतराने (१५० वर्षांत) लिहिलेल्या तीन पत्रांचा एक तुलनात्मक अभ्यास केला होता. त्यातून त्यांनी फारसी शब्दांचे प्रमाण कसे कमी होत गेले या संबंधात आपले काही निष्कर्ष नमूद केले होते. त्यांनी या संदर्भात एक कोष्टकच दिले होते. ते असे होते - 

वर्ष

एकूण शब्द

मराठी शब्द

शेकडा प्रमाण

 

१६२८

२३६

 

३४

१४

१६७७

१३५

८४

६२

१७२८

१२७

११९

९३


महाराजांच्या पत्रसंग्रहातील एकूण २०३ पत्रांतील फारसी शब्दांची मोजणी केली, तर ती सुमारे ७०० एवढी भरते, असे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. त्या तुलनेत समर्थ रामदासांच्या सर्व लहान-मोठ्या रचनांतून २१० फारसी शब्द आलेले आहेत. यावरचे राजवाडे यांचे भाष्य मोठे रंजक आहे. ते म्हणतात, ‘शिवाजीच्या पूर्वी तीनशे वर्षे फारसी शब्दांचा व प्रयोगांचा जो बेसुमार भरणा मराठीत होत होता, तो राजव्यवहारकोषादि साधनांनी भाषा सुधारणाऱ्या ह्या शककर्त्यालाही पदोपदी स्पर्श केल्यावाचून राहिला नाही.’ (ऐतिहासिक प्रस्तावना)

‘राजा कालस्य कारणम्’ या न्यायाने महाराजांनी या सर्व परिस्थितीला मराठी वळण दिले. राज्याभिषेक शक सुरू करून मराठी तिथींचा वापर सुरू केला. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले व त्यांची संस्कृत पदनामे प्रचारात आणली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनादरम्यान मुंबईतील एका भाषणात कॉ. श्रीपाद अमृत डांगे म्हणाले होते, ‘महाराष्ट्राची भाषा मराठी. कर्ता मी मराठी, कर्म माझे, क्रिया माझी, बाकी तुमचे! भाषेचा वाद मातृभाषा ठेवूनच सुटेल. भाषेचा लढा तांत्रिक नसून, जीवनाचा लढा आहे. शिवाजीराजांप्रमाणे जनतेची भाषा घेणे हाच ‘स्व’ राज्याच्या हिताचा मार्ग आहे.’ 

शिवाजी महाराजांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांच्याकडून ‘राज्यव्यवहार कोश’ या नावाचा शब्दकोश लिहवून घेतला. राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फारसी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांचे पर्यायी संस्कृत, प्राकृत शब्द सुचविले आहेत. त्याचप्रमाणे ‘लेखनपद्धती’ सांगणारी ‘मेस्तके’ व अधिकाऱ्यांच्या कामासंबंधातील नियम (कानुजावते) तयार करण्यात आले. याच उपक्रमातून पुढे कार्यालयीन पत्रव्यवहाराची शैली विशद करणारा ‘लेखनकल्पतरू’ हा ग्रंथ निर्माण झाला. साने गुरुजी म्हणतात, ‘स्वतंत्र मराठी सत्तेचा पर-दरबारी पत्रव्यवहार होऊ लागला. परभाषेतील शेकडो शब्द मराठीत घुसले होते. शिवरायांनी ‘राज्यव्यवहार कोश’ करवून सर्व परकी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द रूढ केले. आपले असेल ते ठेवावे. नवीनच कल्पना असेल, तर घ्या एखादा परकी शब्द. परंतु घरचे बुडवून परके घेण्यात काय अर्थ?’

आज आपण जी मराठी वापरतो त्यात तुर्की, अरबी किंवा फारसी मूळ असलेले शब्द फक्त २९०० म्हणजे २.९६ टक्के आहेत. आता आपण काढू म्हटले, तरी ते जाणार नाहीत, इतके ते आपल्या अंगवळणी पडले आहेत. ते आपलेच झाले आहेत; पण म्हणून आपल्या शब्दांची आस कमी होणार नाही. आज फारसीची जागा इंग्रजीने घेतली आहे. काही प्रमाणात हिंदीचेही दडपण आहेच. अशा वेळेस शिवाजी राजांनी केलेला हा महाउपक्रम आठवावा. त्यासाठी राज्याभिषेक दिनापेक्षा चांगली संधी कोणती मिळणार? पूर्वीचे राजे अश्वमेध यज्ञ करायचे, राजसूय यज्ञ करायचे. शिवाजी महाराजांनी भाषेचा अश्वमेध केला, मराठीचा राजसूय यज्ञ केला. त्या यज्ञाचे आपण पाईक होऊ या. राज्याभिषेक दिन मराठीचा ‘राजसूय यज्ञ दिन’ म्हणून साजरा करू या! 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link