Next
१०० कोटी लिटर पाणी वाचवणाऱ्या ‘जलरक्षक प्रबोधिनी’चा गौरव
मकरंद टिल्लू यांना ‘हृदयमित्र प्रतिष्ठान’तर्फे ‘सेव्ह वॉटर हिरो’ पुरस्कार
प्रणित जाधव
Wednesday, June 12, 2019 | 01:32 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘जलरक्षक प्रबोधिनीच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत १०० कोटी लिटर पाणी वाचविले आहे. ज्या ठिकाणी काम करतो, त्या भागातील लोकांना आपल्यासोबत घेतल्याने हा उपक्रम इतका मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे,’ अशा शब्दांत जलरक्षक प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी आपल्या उपक्रमाचे वेगळेपण सांगितले. हृदयमित्र प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘सेव्ह वॉटर हिरो पुरस्कार’ प्रबोधिनीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी स्वीकारला. त्या वेळी ते बोलत होते. 

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत ११ जून रोजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी टिल्लू यांना डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. सतीश देसाई, प्रकाश पायगुडे व कार्यक्रमाचे संयोजक श्रीकांत मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. 

मकरंद टिल्लू यांनी या वेळी पाण्याचे महत्त्व विशद करून, आपल्या कार्याची सुरुवात कशी झाली ते सांगितले. ते म्हणाले, ‘मानवी जीवनात असलेले पाण्याचे महत्त्व आपण सर्वच जाणतो. अगदी माणसाच्या जन्मापासून ते लयापर्यंत प्रत्येक गोष्टीत पाणी लागते. म्हणूनच पाण्याला ‘जल’ असे म्हणतात. २०१२ मध्ये बीडमधील कार्यक्रम आटोपून पुण्याकडे परतत असताना वाटेतील आष्टी गावात प्रचंड गर्दी दिसली. ही गर्दी कशाची याची चौकशी केली असता तेथे सरकारी चारा छावणी असल्याचे कळले. कलाकार असल्याने प्रत्येक गोष्टीत उत्सुकता असते. त्यामुळे हा नेमका प्रकार काय हे पाहण्यासाठी छावणीत गेलो. तिथे असलेल्या गायींची कातडी हाडांना चिकटलेली दिसत होती. ते दृश्य पाहून माझ्या मनाला पहिल्यांदा त्रास झाला. पुढे असाच एक प्रसंग पिंपरी-चिंचवड येथे एका शासकीय कार्यालयात घडला. तिथे स्वच्छतागृहातील नळातून गळती होऊन बरेच पाणी वाया जात होते. तेथील कर्मचारी, अधिकारी यांच्याशी बोलून तेथील नळ बदलला आणि खऱ्या अर्थाने या कामाची सुरुवात झाली.’

टिल्लू यांनी या वेळी जलसंवर्धनासाठी आवश्यक चतुःसूत्रीची माहिती दिली आणि शाळांतील सुमारे १० हजार नळ बदलण्याचा आगामी उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, ‘मकरंद टिल्लू हे नाव समोर येताच हास्य आणि विनोद या गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्यांनी हास्ययोग ही संकल्पना सगळ्यांना समजावून सांगताना माणसे जोडत सामाजिक कार्यही केले. तसेच पाण्याचे हसणे आणि रडणे काय असते हे त्यांना माहिती असल्याने त्यांनी रडणाऱ्या पाण्याला हसविण्याचे काम करून दाखविले आहे. विनोबा भावेंनी सुरू केलेल्या भू-दान चळवळीसारखीच टिल्लू यांनी सुरू केलेली नळदान चळवळ आहे. जो माणूस दुसऱ्यांच्या जाणिवा शोधतो तोच आयुष्यात संतुष्ट होतो आणि असा जाणिवांचा पुरस्कार टिल्लूंना देण्यात आला आहे ते योग्यच आहे.’

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘मुळात जलसंवर्धन हा विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणूनच मी स्वतः माझ्या मतदारसंघातील ५२ सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम लोकांना करून दिले आहे. मकरंद टिल्लू यांचे हे कार्य कौतुकास्पदच आहे.’ 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत मुंदडा यांनी केले. मुंदडा म्हणाले, ‘हृदयमित्र संस्था गेल्या २४ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. याद्वारे तब्बल १५०० कोटी रुपयांची मदत लोकांना मिळवून देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून गरजूंवर हृदयाच्या शस्त्रक्रिया मोफत करण्याचा उपक्रमही संस्थेने सुरू केला आहे.’

‘पाणी वाचवण्याची मोहीम आम्ही मागील दोन वर्षांपासून सुरू केली आहे. या गोष्टीसाठी महानगरपालिकेनेसुद्धा प्रयत्न करायला हवेत,’ अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ लाहोटी यांनी, तर आभारप्रदर्शन सतीश भळगट यांनी केले.

(या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 66 Days ago
Can such projects be copied in other places , ESP. In Marathawada ?
0
0

Select Language
Share Link
 
Search