मुंबई : अंदाजे १.५ ट्रिलिअन रुपयांचे मॉर्गेज कर्ज वितरित करण्याचा टप्पा ओलांडणारी आयसीआयसीआय बँक देशातील पहिली खासगी बँक ठरल्याचे बँकेतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले. यामुळे ही बँक देशातील खासगी बँकांतील सर्वात मोठी मॉर्गेज लेंडर ठरली आहे. बँकेने आर्थिक वर्ष २०२०पर्यंत भारतभरातील मॉर्गेजचे प्रमाण दोन ट्रिलिअन रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मॉर्गेज व्यवस्था डिजिटाइज करण्याच्या हेतूने बँकेने विकसकांना त्यांच्या प्रकल्पांसाठीची मंजुरी पेपरलेस पद्धतीने मिळवण्याची सुविधा दिली. या उपक्रमामुळे बँकेला दोन हजार नव्या गृह प्रकल्पांना पूर्णतः ऑनलाइन मंजुरी देणे शक्य झाले. बँकेने आपल्या ग्राहकांसाठीही ४० शहरांतील ३० हजार मंजूर प्रकल्पांची ऑनलाइन रिपॉझिटरी उपलब्ध केली आहे. घर घेणाऱ्या ग्राहकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी देण्याचे पोर्टलचे उद्दिष्ट आहे. या पोर्टलमुळे ग्राहकांना बँकेने मान्यता दिलेल्या विविध गृह प्रकल्पांतून त्यांच्या पसंतीचे घर निवडता येईल, कोठूनही व केव्हाही कर्जाची पात्रता तपासता येईल व गृह कर्जासाठी अर्ज करता येईल.
या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेने रिटेल कर्जे व विशेषतः गृह कर्जे मोठ्या प्रमाणात उपलब्ध व परवडणारी बनवून २००० च्या सुरुवातीच्या कालावधीत देशात रिटेल कर्जांच्या वाढीला चालना दिली. गेल्या काही वर्षांत, आम्ही अनेक नवे उपक्रम अंगिकारले आहेत: नाविन्यपूर्ण गृह कर्ज उत्पादने दाखल केली, वितरण जाळे विस्तारले व डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेतला, जसे टॅब बँकिंग व कामाच्या आठ तासांत पूर्णतः ऑनलाइन मंजुरी. आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ म्हणजे, आम्ही मॉर्गेज कर्जांचा १.५ ट्रिलिअन रुपयांचा टप्पा पार केला असून, हा टप्पा नफात्मक पद्धतीने व या उद्योगातील कमीत कमी डेलिंक्वेन्सी राखून गाठण्यात आला आहे.’
‘आम्ही मॉर्गेज पोर्टफोलिओमध्ये वार्षिक १५ टक्के दराने वाढ करायचे ठरवले आहे आणि आर्थिक वर्ष २०२० च्या अखेरीपर्यंत दोन ट्रिलिअन रुपयांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी, आम्ही शहरांत, तसेच मुख्य शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात मायक्रो-मार्केटमध्ये नवनव्या ठिकाणी आमचे जाळे विस्तारत आहोत आणि पूर्णतः डिजिटाइज्ड पद्धतीने गृहगहृ कर्जे देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत,’ असे बागची यांनी सांगितले.