Next
‘ओन मीडिया’तर्फे आदिवासी पाड्यातील शाळेत कार्यक्रम
मिलिंद जाधव
Wednesday, May 29, 2019 | 11:56 AM
15 0 0
Share this article:


कांदिवली : बुद्धजयंतीचे औचित्य साधून ‘ओन मीडिया’तर्फे संजय गांधी नॅशनल पार्कअंतर्गत असलेल्या कांदिवली येथील कळमाचा आदिवासी पाडा येथील शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

बुद्ध आणि भारतीय संविधानाला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. वैशाली भालेराव यांनी गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जीवनाबद्दल, कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यातर्फे (अंनिस) चमत्कार सादरीकरण करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. 


‘बुवा, मांत्रिक हे चमत्कार करतात व त्याद्वारे नागरिकांमध्ये भीती घालून त्यांच्याकडून धार्मिक विधींच्या नावाखाली पैसे उकळतात. मुळात या चमत्कारांमागे एकतर रासायनिक अभिक्रिया असते किंवा निव्वळ हातचलाखी असते,’ अशी माहिती देत या वेळी भोंदूबाबांचे विविध चमत्कार दाखवण्यात आले. नागरिकांनी अशा प्रकाराला बळी न पडता त्यामागील कारणांचा शोध घेण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. 

‘दारुबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, लिंबू-मिरची, ग्रहांचे खडे यावर परखड भाष्य करत सामान्यतः आपल्या भोवताली पदोपदी दिसणाऱ्या अंधश्रद्धा, व्यसन, स्त्रीला दिला जाणारा दुय्यम दर्जा यांमुळे आपला समाज मागे पडत आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी शिक्षण, आरोग्य यासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक लोकशाही मूल्यांची जोड आपल्या विचारांना लाभली पाहिजे,’ असे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या निशा फडतरे यांनी सांगितले.
‘’
या वेळी फडतरे, सचिन थिटे, अमित कदम या कार्यकर्त्यांनी समतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व विशद केले; तसेच प्रात्यक्षिके दाखवत विद्यार्थ्यांना माहिती दिली. आम्रपाली जाधव यांनी स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. हँडवॉशचा वापर करून निरनिराळ्या पद्धतीने हाथ कसे धुवावे व रोजच्या जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलांना वह्या, पेन, रंगीत खडू, हँडवॉश बॉटल, रुमाल आणि कापडी पिशवी या शैक्षणिक आणि स्वच्छतेच्या वस्तू भेट देण्यात आल्या. 


बुद्धजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ‘ओन मीडिया’कडून खीर आणि फरसाणचे वाटप करण्यात आले; तसेच क्रीडा क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्नती फाउंडेशनतर्फे प्रोत्साहनपर १० जोडी बूट भेट म्हणून देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली पुष्पगुच्छ देऊन ‘ओन मीडिया’च्या प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले. या उपक्रमात ‘उन्नती’चे सदस्य अमोल पवार, गणेश पाटेकर, आणि कळमाचा पाडा येथील स्थानिक कार्यकर्ते मच्छिंद्र वैजन यांचे सहकार्य लाभले. ‘ओन मीडिया’चे सिद्धार्थ चाबुकस्वार, वैशाली भालेराव, आम्रपाली जाधव, वैभव कांबळे, निरंजन शिर्के, प्रथमेश सकपाळ, सुषमा सकपाळ, राष्ट्रपाल काकडे, निखील तायडे, राहुल पगारे, प्रणाली काळे, श्रावंती हाबळे या उपक्रमात सहभागी झाले होते. 

‘आपल्याला चांगल्या सुख, सोयी मिळत आहेत; परंतु काही भागात विद्यार्थ्यांना दोन सुखाचे घाससुद्धा मिळत नाहीत यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला; तसेच जास्तीत जास्त आदिवासी समाजापर्यंत संविधान पोहोचले पाहिजे आणि त्यांना त्यांचे अधिकार समजले पाहिजेत हा यामागचा उद्देश होता,’ असे ‘ओन मीडिया’तर्फे सांगण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search