Next
विजयदुर्ग : सौंदर्यपूर्ण वास्तू
BOI
Thursday, October 26, 2017 | 06:24 PM
15 0 0
Share this article:


शिलाहार राजांनी कोकणात बांधलेली सूर्यमंदिरे आणि किल्ले आजही इतिहासाची साक्ष म्हणून उभे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा त्यापैकी एक. भुईदुर्ग आणि जलदुर्गाचे उत्तम मिश्रण असलेला हा किल्ला केवळ ऐतिहासिक वास्तू म्हणून पाहिला जातो; मात्र सौंदर्यपूर्ण वास्तू म्हणूनही हा किल्ला कसा पाहता येईल, याबद्दल मार्गदर्शन करणारा एका ज्येष्ठ वास्तुविशारदाने लिहिलेला लेख ‘साप्ताहिक कोकण मीडिया’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. तो लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. 
........
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला कोकण किनारपट्टीवरील समुद्री मार्गावरील महत्त्वपूर्ण असा जलदुर्ग आहे. या लेखाचा उद्देश विजयदुर्ग किल्ल्याविषयीच्या ऐतिहासिक, स्थापत्य आणि वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांची माहिती करून घेण्याचा असला, तरी त्याआधी कोकणाची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेणे गरजेचे आहे. शिलाहारांनी ठाणे-कोकणावर जवळपास चारशे वर्षे राज्य केले. शिलाहार घराण्याच्या तीन शाखा होत्या. पहिली उत्तर कोकण. दुसरी दक्षिण कोकण आणि तिसरी कोल्हापूर-सातारा. शिलाहार स्वत:ला तेरपूर परमेश्वर समजत. तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील गाव. सुरुवातीस हे घराणे पूर्वकालीन चालुक्यांचे मांडलिक होते. काही काळ हे राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणूनही राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३मध्ये विजापूरच्या आदिलशहाचा पराभव करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचे विजयदुर्ग असे नामकरण केले.

मध्ययुगीन सामाजिक, राजकीय स्थिती
विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास शिलाहार घराण्यापासून सुरू होतो. शिलाहार हे कन्नडभाषक होते. मराठी आणि कन्नड भाषेत त्यांचे व्यवहार चालत. राजा भोज दुसरा हा या घराण्याचा शेवटचा राजा होता. कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई ही या घराण्याची देवता. शिलाहार घराणे स्वत:ला नागवंशी समजे. म्हणून त्यांच्या ध्वजावर नागाचे चिन्ह असे. राजा भोज जैन आणि शैव धर्माचा पुरस्कर्ताही होता. सन ११९३-१२०५मध्ये भोज राजाने हा किल्ला बांधला, जो घेरिया या नावानेसुद्धा ओळखला जात असे. याच घराण्यातील छित्तराजाने (१०२०-१०३५) ठाणे जिल्ह्यात कल्याणजवळ अंबरनाथाचे मंदिर बांधले. शिलाहार घराण्याने कोकणात बांधलेली सूर्यमंदिरे आणि किल्ले आजही इतिहासाची साक्ष म्हणून उभे आहेत. देवगिरीच्या यादवांनी भोज राजाचा पराभव केला आणि शिलाहार घराणे लोप पावले. 

मध्ययुगीन काळात (८०० ते १२७०) कोकण समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सागरी सुरक्षेच्या हेतूने किल्ले बांधले गेले. युद्ध परिस्थिती नसताना शांततेच्या काळात राज्यकारभार, संपत्ती आणि राज्याचे रक्षण करण्यासाठी किल्ल्यांचा उपयोग होत असे. म्हणून किल्ले म्हणजे सामर्थ्याचे प्रतीक समजले जात. भारतात विदेशी राजवटीची सुरुवात होण्याआधीपासूनच मुंबई-साष्टीतील बंदरातून परदेशांशी व्यापार होत असे. स्थानिक राजे आपापली प्रतिष्ठा जपण्याच्या महत्त्वाकांक्षेतून आपसात लढत. त्यामुळे कोकणाचे अतोनात नुकसान होत असे. या कारणांमुळे अनेक लोक प्रदेश सोडून जात असत. म्हणून बंदरे ओस पडत गेली. पुढील काळात किल्ल्यांच्या बाबतीतही तेच घडले. विजयदुर्ग ताब्यात घेण्यासाठी होणारी युद्धे शांत झाली. कारण ब्रिटिशांनी व्यापारातील लक्ष कमी करून नागरी राज्यस्थापनेवर लक्ष केंद्रित केले. सन १८६५पर्यंत ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळातदेखील मुंबई-फोर्टभोवताली तटबंदी होती, हा ऐतिहासिक पुरावा अगदीच अलीकडच्या काळातील आहे, त्यावरून तटबंदीचे महत्त्व लक्षात येते.            


किल्ल्याचे भौगोलिक स्थानमहत्त्व
कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हे बंदर नैसर्गिकरीत्या सुंदर आणि सुरक्षित असे बंदर आहे. देवगडजवळील खारेपाटण खाडीस लागून सतरा एकर जागेत विजयदुर्ग हा किल्ला उभा आहे. किल्ल्याच्या पायाचे क्षेत्रफळ जवळपास पाच एकर आहे. भुईदुर्ग आणि जलदुर्ग याचे उत्तम मिश्रण असलेला हा उत्तम दुर्ग आहे. शुक नदीचा काठ आणि खारेपाटण खाडीच्या मुखावरील दुर्ग तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. अंदाजे ४० किलोमीटर लांब खारेपाटण खाडीचा किनारा लाभलेल्या नैसर्गिक आणि भौगोलिक स्थानाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी किल्ल्याला आरमाराचे केंद्र बनवण्याचे ठरविले. किल्ला हाती आल्याबरोबर महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेस वीस बुरुजांच्या साह्याने दुहेरी तटबंदी बांधून किल्ला आणखी सुरक्षित केला. अशा प्रकारच्या बांधणीस चिलखती तटबंदी असेही म्हटले जाते. सर्वाधिक तोफांचा मारा होण्याची शक्यता असलेल्या नाजूक भागास अधिक सुरक्षित करण्यासाठी महाराजांच्या काळातच या पद्धतीचा वापर केलेला आढळतो. लांब पल्ल्याच्या तोफेतून किल्ल्यावर मारा करता येईल, असे दुसरे उंच ठिकाण जवळपास नसल्यामुळे हा किल्ला जिंकणे अशक्य होते. म्हणून ब्रिटिश विजयदुर्गला ‘ईस्ट ऑफ जिब्राल्टर’ असे म्हणत. त्या काळी विजयदुर्ग किल्ल्यात आणि आसपासच्या परिसरात अनेक उल्लेखनीय संरक्षक क्लृप्त्यांचा वापर खुबीने केलेला आढळतो. गोमुखी महाद्वार, दुहेरी तटबंदी, कल्पक भुयारी मार्ग इत्यादी. त्याशिवाय समुद्रतळातील नैसर्गिक अडसर, आरमार, नैसर्गिक प्रक्रियेतून बदलत जाणारी सागरी पाण्याची पातळी इत्यादी नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण जागा आहेत. या कल्पकतेचा वास्तुविशारदाच्या दृष्टिकोनातून थोडक्यात आढावा घेता येईल.

भूवैज्ञानिक निर्मिती
लॅटराइट म्हणजेच स्थानिक भाषेतील जांभा दगड. हा दगड, माती आणि मजबूत खडकाच्या मिश्रणातून बनला आहे. ही प्रक्रिया साधारणपणे उष्णकटिबंधीय प्रदेशात होते. त्यातील आयर्न ऑक्साइडमुळे दगड आणि मातीस लाल रंग प्राप्त होतो. आयर्न आणि मॅग्नेशियममुळे कालांतराने झीज होण्याची प्रक्रिया थांबते. म्हणून या दगडात पुढील अनेक वर्षे टिकून राहण्याची क्षमता आहे.

किल्ल्याची तटबंदी
काटकोनातील भिंती तोफेच्या माऱ्यात फार काळ तग धरू शकत नाहीत. म्हणून या भिंती काटकोनात न बांधता जोत्याकडील भाग पसरट आणि छताकडील भाग किंचित कलता ठेवल्यामुळे भिंत मजबूत होते. तसेच पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन भिंतीत पाणी झिरपण्याचे प्रमाणही कमी होते. कलत्या रचनेमुळे बुरुजावरील पहारेकऱ्याला अधिक न झुकता जमिनीवरील गनिमास टिपणे अधिक सोपे जाते. तटबंदीची रुंदी जवळपास सहा मीटर आणि उंची समुद्रसपाटीपासून ३६ मीटर आहे. दोन भिंतींच्या पोकळीत चुनामिश्रित दगडी गोट्यांचा भराव टाकून तटभिंतीची रुंदी वाढवली जात असे. खासगी उपयोगासाठी बांधलेला खलबतखाना आणि इतर इमारतीच्या छताचा आधार पेलण्यासाठी दगडी भिंतीत छुप्या लाकडी खांबांचा वापर केला आहे. यातून वास्तुविशारदाची कल्पकता दिसून येते.

टेहळणी बुरुज आणि जंग्यांची रचना
शिवाजी महाराजांनी किल्ल्यात जंग्यांची रचना केली होती. जंग्या म्हणजे तटबंदी छतावरील संरक्षक भिंतीत केलेली आयताकृती छिद्रे किंवा झरोक्यांची रचना! अरुंद आणि उभट आयताकृती आकार आणि विविध कोनांतील झरोक्यांमधून गनिमांच्या नजरेत न येता तटबंदीस खेटून उभ्या असलेल्या किंवा लांब पल्ल्यावरील गनिमास बाण, बंदुकीच्या गोळ्यांचा मारा करून अचूक टिपता येत असे. एकाच वेळी आणि अनेक बाजूंनी वेगवेगळ्या कोनांतून भडिमार करून गनिमास गोंधळात पाडण्यासाठी अशा क्लृप्त्यांचा वापर केला जात असे.


सांधेजोड बंधकद्रव्य प्रक्रिया आणि निर्मिती
त्या काळात सिमेंट नव्हते. म्हणून दगड किंवा विटांच्या सांधेजोडणीसाठी बंधकद्रव्य म्हणून चुन्याचे मिश्रण (लाइम मॉर्टर) वापरण्याची पद्धत होती. चुना नैसर्गिक आहे. चुन्यात निसर्गतत्त्वाशी एकरूप (बायोडिग्रेडेबल) होण्याची क्षमता आहे. अनेक वर्षांपासून विशिष्ट प्रक्रिया केलेला चुन्याचा लगदा जगातील पहिले जोडबंधकद्रव्य म्हणून बांधकामासाठी वापरत. जमिनीवरील गोलाकार रिंगणात नैसर्गिक चुन्याचे खडे दळले जात असत. तयार भुकटीत अनेक वनस्पतींचा अर्क, पाम तेलापासून बनविलेला गूळ आणि डिंकाचा वापर केला जात असे. तयार मिश्रण पंधरा दिवस पाण्यात भिजत ठेवल्याने चिवटपणा वाढतो. बांधकामासाठी, वाळू आणि पिष्टमय चुन्याचा लगदा एकास दोन या प्रमाणात वापरला जात असे. तटबंदीसाठी तासलेला जांभा दगड वापरत. शून्य सांधेजोड बांधकाम पद्धतीमुळे भिंत भारदस्त दिसते आणि भिंतीत खिळे रोवणे अशक्य होत असे. इमारतीच्या सौंदर्यापेक्षा किल्ल्याच्या मजबुतीस अधिक महत्त्व होते. चुन्यापेक्षा सिमेंट बनवणे सर्व दृष्टिकोनातून अधिक सोपे आणि कमी श्रमाचे असल्याने कालांतराने चुना वापरणे बंद झाले. चुन्याची क्षमता सिमेंटपेक्षा थोडी कमी असली तरी तो मजबुती टिकवून धरण्याच्या क्षमतेत कमी पडत नाही! हे मिश्रण आज वापरात असते तर ते नक्कीच ग्रीन मटेरियल म्हणून ओळखले गेले असते!          

जिभीचा दरवाजा
मुख्य प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी केलेल्या अतिरिक्त रचनेस जिभी असे म्हणत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकच मार्ग होता. गनिमी तोफांचा मारा आणि पायदळी सैन्यास रोखण्यासाठी बुरूज आणि त्यानंतर केलेल्या दरवाजास जिभीचा दरवाजा असे म्हणतात. या मार्गापासून ते थेट प्रवेशद्वारापर्यंतच्या मार्गिकेतील अनेक अडथळे पार केल्यानंतर गोमुखी रचनेस सुरुवात होते.

किल्ल्याचे महाद्वार आणि गोमुखी रचना
किल्ल्यात प्रवेश करण्यापासून गनिमास अटकाव करण्यासाठी अनेक कल्पक क्लृप्त्यांचा वापर करत. त्या काळात गनिमास रात्री-अपरात्री गाफील अवस्थेत गाठून हल्ला करण्याची पद्धत होती. किल्ल्याचे प्रवेशद्वार गनिमाच्या नजरेत येऊ नये, या हेतूने केलेल्या रचनेस गोमुखी रचना म्हणत. रचनेचा आकार गायमुखासारखा दिसे. किल्ल्यात प्रवेश करताना अरुंद मार्गातून वाट काढत कसे आणि केव्हा वळायचे, हे गनिमास समजणे कठीण जावे, या हेतूने ही रचना असे! गनिमाच्या उजव्या हातातील तलवार भिंतीच्याजवळ येत असल्यामुळे प्रतिवार करणे अवघड जात असे. त्यामुळे डाव्या हातातील ढालीवर वार पेलण्यावाचून गनिमास पर्याय उरत नसे. गनिम गडबडून जावा, अडखळून पडावा म्हणून प्रवेशद्वाराच्या मार्गातील पायऱ्या कमी-अधिक उंचीत ठेवत असत. घोडेस्वार किंवा पायदळी फौजेचा वेग कमी करण्यासाठी गोल आणि गुळगुळीत दगडी गोट्यांचा वापर करत. तसेच वेगात येणाऱ्या गनिमास रोखण्यासाठी किंवा घसरून इजा व्हावी, म्हणून सहजगत्या कळून न येणाऱ्या मार्गिकेत या क्लृप्त्यांचा वापर करत. खडतर मार्ग आणि अडथळे पार करून चलाख शत्रू आत आलाच, तर त्याला रोखण्यासाठी देवड्या किंवा आतील मोकळ्या जागेत दबा धरून बसलेले ताज्या दमाचे सैनिक हमा करण्यासाठी तयार असत.

किल्ल्यातील सुरक्षा भुयारी मार्ग
शत्रूस गाफील ठेवून पळून जाण्यासाठी अतिशय बेमालूमपणे भुयारी मार्गाचा उपयोग केला जात असे. किल्ल्यापासून धुळप वाड्यापर्यंत २०० मीटर लांबीचा जमीन आणि समुद्र यामध्ये भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. भुयारी मार्गातील दोन्ही बाजूंच्या भिंतींसाठी दगड वापरला आहे. भुयारातून दोन माणसे सहजपणे जाऊ शकतील इतकी भुयाराची रुंदी आणि उंची आहे. स्वच्छ हवा आणि प्रकाशाच्या सोयीचाही विचार केल्याचे दिसून येते. त्या काळातील स्थापत्य अभियंत्यांनाही भूगर्भशास्त्राचे अचूक ज्ञान होते आणि मातीतील बदलत्या गुणधर्माचा सखोल अभ्यास होता, हे यातून दिसून येते.

धान्य कोठार आणि दारूगोळा
यापैकी धान्य कोठाराची इमारत अजूनही सुस्थितीत आहे. धान्य कोठाराच्या छतासाठी दगडी कमानींचा (व्हॉल्ट) रचनेचा वापर केला आहे. तसेच धान्य अधिक काळ टिकून राहण्यासाठी खेळती हवा आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. म्हणून खिडक्यांची व्यवस्थाही उत्तम प्रकारे केली आहे. दारूगोळा कोठाराची खूपच पडझड झाल्यामुळे फारशी कल्पना येत नाही.

पाणीसाठा
अडीअडचणीच्या काळात किंवा अपघातसमयी आग विझवण्यासाठी कोठाराजवळ पाण्याचा साठा असावा, म्हणून हौदाची व्यवस्था केलेली असावी! हा आयताकृती हौद दगडात बांधला असून, तो साधारणत: सत्तर फूट लांब, ऐंशी फूट रुंद आणि वीस फूट खोल आहे. साधारणत: एक लाख घनफूट पाण्याचा साठा होतो. हौदात उतरण्यासाठी दोन्ही दिशांना दगडी पायऱ्या आहेत. जमिनीत पाणी झिरपू नये म्हणून तळभागात फरशीकाम केल्याचे दिसून येते.


आरमाराचे ठिकाण आणि व्यापार
मध्ययुगीन काळात गोव्याचे कदंब, पश्चिम महाराष्ट्रातील शिलाहार आणि पुलकेशी घराण्यांकडे आरमार होते. मुंबई बंदर विकसित होण्याअगोदर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील साष्टीतील वसई, सोपारा ही बंदरे भरभराटीस आलेली होती. म्हणून त्या काळातील राजे हा भाग ताब्यात घेण्यासाठी लढत असत. याच कारणास्तव शिवाजी महाराजांनासुद्धा विजयदुर्ग ताब्यात हवा होता. आरमाराची जागा विजयदुर्ग किल्ल्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर वाघोटण खाडीत आहे. नवीन जहाजांची बांधणी आणि दुरुस्तीचे काम या जागेत होत असे. निसर्गत: बनलेली जागा आरमारी जहाजे नांगरण्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर समजली जात असे. ही जागा पूर्णत: नैसर्गिक जडणघडणीतून बनलेली आहे. या जागेत साधारणत: ५०० टन क्षमतेचे जहाज बनवता येई आणि त्यांची दुरुस्तीही करता येत असे. या गोदीची लांबी १०७ फूट आणि रुंदी ७० फूट असावी.

समुद्रतळातील आणि जमिनीवरील सुरक्षा अडसर
किल्ल्याच्या ईशान्येला समुद्रतळाशी असलेल्या खडकसदृश अडसरामुळे शत्रूची जहाजे धडकून निकामी होत असत. या अपघाताची पूर्वकल्पना नसल्यामुळे शत्रू संभ्रमात पडत असे! या खडकाची लांबी १२२ मीटर, तर रुंदी सात मीटर आणि उंची तीन मीटर भरते. त्या काळी नैसर्गिक आणि भौगोलिक रचनेचा फायदा संरक्षणासाठी करून घेतला जात असे, हेच यातून सिद्ध होते. समुद्री किल्ल्यांमध्ये नैसर्गिक रचनेचा सर्वाधिक लाभ विजयदुर्गलाच मिळाला आहे. किल्ला तिन्ही बाजूंनी पाण्याने घेरलेला आहे. किल्ल्यापासून काही अंतरावर एका फसव्या भिंतीचा उपयोग शत्रूचा दारूगोळा निकामी करण्यासाठी केला जात असे. या जमिनीचा खडकाळ भाग जणू काही मानवी पायाचा ठसाच असावा, असा आभास हवाई छायाचित्र निरीक्षणातून लक्षात येतो. तसेच किल्ल्याचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास तटबंदीच्या बाह्य रूपरेखेत दडलेला सहजी शरण जाण्यास तयार नसणाऱ्या आविर्भावातील दृढता आणि भक्कमतेची प्रचीती येते.

हेलियम गॅसचा शोध
फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ नॉर्मन लॉकयॉरने स्पेक्ट्रा मीटरच्या साह्याने केलेल्या निरीक्षणातून सूर्यकिरणातील पिवळ्या रंगातील हेलियम गॅसचा शोध १८ ऑगस्ट १८९८ रोजी याच किल्ल्यात लावला होता, या घटनेची नोंद जगभर घेतली गेली.

पुरातन वास्तुसंवर्धन आणि संरक्षण
इंग्रजांनी मराठ्यांच्या पराभवानंतर आपले लक्ष नागरी राज्यकारभारावर केंद्रित केल्यामुळे महाराष्ट्रातील पुरातन वास्तू पुढील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या; पण ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कर्झनने भारतातील ऐतिहासिक, कलात्मक आणि वास्तुकलासौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वास्तूंचे दीर्घकालीन महत्त्व ओळखून १९०२पासून संवर्धनाचे कार्य हाती घेतल्यामुळेच पुरातन वास्तू टिकून राहिल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने २९ ऑगस्ट १९५८ला पुरातन वास्तुविषयक कायदा संमत केला. त्या कायद्याअंतर्गत १०० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व वास्तूंचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे योजिले. भारतातील सर्वधर्मीय प्राचीन प्रार्थनास्थळे, राजवाडे, किल्ले इत्यादींचा त्यात समावेश आहे. भारतभर पसरलेल्या पुरातन इमारतींचे संवर्धन आणि जपणूक कला आणि ऐतिहासिक महत्त्वाखाली व्हावी, या उद्देशाने भारत सरकारने पुरातत्त्व विभागाची (आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) स्थापना केली. या संस्थेने देशातील आठ हजार इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यापैकी जवळपास पाच हजार पुरातन इमारतींच्या संवर्धनाचे काम केले जाते. अजूनही अनेक इमारती केंद्र आणि राज्य पुरातत्त्व खात्याकडून न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि काहींचे संवर्धन न झाल्यामुळे अनेक महत्त्वाच्या वास्तू कायमच्या नजरेआड गेल्या आहेत. जात आहेत.


विजयदुर्ग किल्ल्याच्या सभोवतालचे अतिक्रमण, वर्तमान डागडुजीचे नमुने, आवारातील असंबद्ध चित्रविचित्र रंगातील वास्तू आणि जीर्णावस्थेतील माहितीफलकांचा दशावतार पाहून मन विषण्ण होते! किल्ल्याच्या परिसरात बांधलेल्या इमारती पुरातन वातावरणाशी एकरूप होतील, अशा बांधायला हव्या होत्या. वास्तविक पाहता याकडे अधिक लक्ष देण्याचे काम केंद्र आणि राज्य शासनाधीन पुरातत्त्व खात्याने करायला हवे. शेकडो वर्षांपासून या वास्तूंची पडझड होताना फक्त बघ्याची भूमिका घेऊन उपयोगाचे नाही. एके काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वैभवी किल्ल्यांना जिवापलीकडे जपले असणार, त्या वास्तू पडझडीतून नामशेष व्हाव्यात, हे योग्य नव्हे.

या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मूळ इंग्रजी प्रतीतील निर्णयाचा काही भाग दाखल्यादाखल देत आहे. तो असा – ‘भारतीय संविधानातील वरील तरतुदींच्या आधारे हे न्यायालय केंद्र सरकारला आदेश देत आहे, की त्यांनी भारतातील सर्व राष्ट्रीय स्मारकांअंतर्गत नोंदणी झालेल्या वरील नमूद केलेल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाअंतर्गत येणाऱ्या वास्तू, स्थळे यांची संबंधित कायद्याअंतर्गत त्या स्मारक वास्तूंचे जतन, संरक्षणासोबत, त्यांच्या मूळ सौंदर्याची नासाडी न होता पूर्वीचे दृश्यसौंदर्य कलात्मकरीत्या लक्षात घेऊन त्यांचे संवर्धन करावे आणि काळजीपूर्वक दक्षता घ्यावी.’ त्या दृष्टीने अंमलबजावणी व्हायला हवी. (सर्वोच्च न्यायालयाची मूळ इंग्रजी प्रत वाचण्यासाठी येथे क्लिक करा. येथे मराठीत लिहिलेला मजकूर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भावानुवाद आहे. मूळ इंग्रजी निकाल अधिकृत आहे.)

- वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे
मोबाइल : ९८१९२ २५१०१

(‘कोकण मीडिया’ हे रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक असून, प्रमोद कोनकर (९४२२३ ८२६२१) हे त्याचे संपादक आहेत. या साप्ताहिकाच्या दिवाळी अंकात वास्तुसौंदर्य विशेष विभाग असून, त्यात अनेक माहितीपर लेख आहेत. तसेच बोलीभाषेतील साहित्यही आहे. ‘साप्ताहिक कोकण मीडिया’चा दिवाळी अंक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक डाउनलोड करण्यासाठी http://www.bookganga.com/R/7NQH8 येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nagesh Sadaye About
Very good n very informative
0
0
Shridhar D Dalvi About
अती सुंदर
1
0
अजित रामचंद्र बांंदकर About
Very good
0
0

Select Language
Share Link
 
Search