Next
सर्जनशील अनुवादक
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Sunday, July 02 | 04:30 PM
15 0 0
Share this story

‘पॅपिलॉन’सारखे एकाहून एक सरस अनुवाद करून गेली ४० वर्षे मराठी वाचकांना वेगळी साहित्यिक मेजवानी देणारे ज्येष्ठ अनुवादक म्हणजे रवींद्र गुर्जर. आपल्या या योगदानाचा यथोचित सन्मान व्हावा, अशी भूमिका मांडून त्यांनी आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर या पदी निवड होणारे बहुधा ते पहिलेच अनुवादक असतील. या पार्श्वभूमीवर, रवींद्र गुर्जर यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आणि भविष्यातल्या नियोजनाचा घेतलेला हा आढावा...
..........
पॅपिलॉन, सत्तर दिवस, गॉडफादर, सेकंड लेडी, बँको, कोमा, चार्ली चॅप्लिन, अल्बर्ट आइन्स्टाइन, असे एकाहून एक सरस अनुवाद आठवले, की डोळ्यांसमोर नाव येते ते अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचे अनुवादक रवींद्र गुर्जर यांचं! पण त्यांची ओळख केवळ श्रेष्ठ अनुवादक एवढीच नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक थक्क करणारे पैलू आहेत. त्यांनी पत्रकारिता केली आहे, इंडॉलॉजीचे प्रमाणपत्र मिळवलं आहे, कम्प्युटर मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण केला आहे, ‘पर्यटन,’ ‘आपले स्वास्थ्य,’ ‘संतकृपा,’ ‘धर्मश्री’सारख्या मासिकांचं आणि काही पुस्तकांचं संपादन केलं आहे. नाटकांत, चित्रपटात कामं केली आहेत. पटकथालेखन केलं आहे. ते ‘प्राणिक हीलिंग’ देतात आणि हे सर्व करत असताना स्वतःची ‘गायत्री’ प्रकाशनसंस्था काढून शंभरावर पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. (गेल्या शंभर वर्षांतील गाजलेल्या पुस्तकांचे (शीर्षक व लेखक) संकलनाचे काम त्यांनी पूर्ण केले असून, ते पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.) 

या विलक्षण प्रवासाला सुरुवात झाली ती बेचाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या हातात ‘पॅपिलॉन’ ही इंग्लिश कादंबरी पडली तेव्हा! लहानपणापासूनच वाचनाचं अफाट वेड आणि अगणित पुस्तकं वाचलेली; पण ‘पॅपिलॉन’ कादंबरी हातात आली आणि ते झपाटून गेले. हे पुस्तक मराठीत असायलाच हवं, असं त्यांच्या मनाने घेतलं. ते तडक जाऊन दिलीप माजगावकरांना भेटले. माजगावकरांनी आधी काही पानांचा अनुवाद करून आणायला सांगितला. गुर्जरांनी हा हा म्हणता ७०-८० पानांचा अनुवाद करून त्यांना दाखविला. माजगावकर तो वाचून खूश झाले आणि ‘माणूस’मधून सुरुवातीला ‘पॅपिलॉन’चा क्रमशः अनुवाद प्रसिद्ध होऊ लागला; मात्र गुर्जरांनी कथेचा शेवट जवळ येण्याआधी लेख देणं थांबवले आणि पुस्तकाची घोषणा केली. अर्थातच ते पुस्तक छापून आल्यावर लोकांनी डोक्यावर घेतलं. लोकांच्या त्यावर अक्षरश: उड्या पडल्या. ही गोष्ट १९७५ची. तो आणीबाणीचा काळ होता आणि बरेच पुढारी तुरुंगात होते. गंमत म्हणजे मोहन धारिया, प्रकाश जावडेकर आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी हे पुस्तक तुरुंगात मागवून तिथं त्याचं वाचन केलं होतं, इतकी या पुस्तकाची क्रेझ निर्माण झाली होती. पुढे स्टीव्ह मॅकक्विन आणि डस्टिन हॉफमनचा या कादंबरीवरचा सिनेमाही भारतात रिलीज झाला आणि तोही तुफान चालला. अशा तऱ्हेने ‘पॅपिलॉन’ या कादंबरीच्या अनुवादासह रवींद्र गुर्जर यांनी दिमाखात मराठी अनुवादकांच्या दुनियेत प्रवेश केला आणि पाहता पाहता ‘सत्तर दिवस,’ ‘गॉडफादर,’ ‘सेकंड लेडी,’ ‘बँको,’ ‘कोमा’ अशा एकाहून एक सरस अनुवादांची रांगच लागली. भारतभर लाखो वाचकांनी गेली ४० वर्षे त्यांनी अनुवादित केलेल्या साहित्याचा आनंद लुटला आहे. 

रवींद्र गुर्जरांचा जन्म नगरमधला, २९ एप्रिल १९४६चा. वडील कर सल्लागार आणि मोत्यांचे व्यापारी. आई गृहिणी, पण तिनेच रवींद्र यांना शिक्षणाची, अभ्यासाची गोडी लावली. त्यातूनच त्यांना वाचनाचं वेड लागलं. लहानपणापासून धार्मिक वाचन आणि रामायण, महाभारताची पारायणं केल्यामुळे त्यांना भारतीय संस्कृती, प्राचीन भारताचा इतिहास यांविषयी आकर्षण होतं. त्यामुळे पुढे एमए करत असताना रविवारचा मोकळा वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडॉलॉजीचा कोर्स पूर्ण केला. त्या वेळचे माटे सर, गोखले मॅडम यांचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. पुढे ‘रमणीय पुरातत्त्व’ हा विषय घेऊन ‘चपराक’ साप्ताहिकातून त्यांचं लेखन सुरू झालं. डेक्कन कॉलेजतर्फे अनेक उत्खननांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. ज्वालामुखीत गाडल्या गेलेल्या इटलीतल्या पॉम्पेई शहराविषयी त्यांनी लिहिलं आणि आता समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकानगरीवर त्यांचे लिखाण सुरू आहे. 

अनुवाद क्षेत्रातल्या त्यांच्या दीर्घकाळच्या भरीव कामगिरीबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद आणि रेखा ढोले फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने त्यांना मानचिन्ह आणि २५ हजार रुपये असा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या विमेन्स फाऊंडेशनतर्फे त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. एवढं करूनही गुर्जर थांबलेले नाहीत. ‘५०० भावी उत्तम अनुवादक’ घडविण्यासाठी त्यांना शोधून, योग्य ते मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. ‘यू-रेल’ने युरोपचा प्रवास करून, तिथल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या वाचनालयांना आणि निवडक प्रकाशनसंस्थांना भेटी देऊन त्यांची सद्यस्थिती, कार्यपद्धती, लेखकांच्या सहभागाने पुस्तक प्रचार करण्याच्या पद्धती समजून घेऊन, त्याचा आपल्याकडे कसा उपयोग करता येईल हे त्यांना पाहायचं आहे. 

आपल्या मुली-जावई आणि भावंडांसह इतर सर्वच आप्तस्वकीय उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ असल्यानं, आयुष्यात कृतार्थ असलेल्या रवींद्र गुर्जर यांनी, आपल्या लेखनप्रांतातल्या प्रदीर्घ योगदानाचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्यातून अनेक अनुवादकांनाही प्रेरणा मिळावी, अशा भावनेतून आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्या पहिल्यावहिल्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘पॅपिलॉन’ या अनुवादाचा ४२ वा वाढदिवस येत्या पाच ऑक्टोबर रोजी साजरा करण्याचे ठरविलं आहे. 

आपल्या सरस आणि सकस लेखनानं अनुवादित पुस्तकांच्या जगतात मानाचं स्थान प्राप्त करणाऱ्या रवींद्र गुर्जर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

ई-मेल : Prasanna.Pethe@myvishwa.com

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link