Next
शेअर बाजार वाढता वाढता वाढे...
BOI
Sunday, August 12, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर बाजाराने आता चांगलेच बाळसे धरले आहे. दोन्ही निर्देशांक उच्चांक नोंदवत आहेत. कंपन्यांचे तिमाही निकाल उत्तम असल्याने गुंतवणूकदारांना चांगला लाभांश, बोनस शेअर असे लाभ होत आहेत. शेअर बाजारातील या अनुकूलतेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्याविषयी अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
...........

कामकाजाच्या दहा सत्रांतच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) १७०० अंकांची उसळी घेतली. शुक्रवारी, १० ऑगस्ट २०१८ रोजी तो ३७ हजार ५५६ अंकांवर बंद झाला. या आठवड्यात त्याने ३८ हजार ७६चा उच्चांकही गाठला. ही वाढ अशीच चालू राहिली, तर दिवाळीला निर्देशांक ४० हजारांपर्यंत गेलेला असेल. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) शुक्रवारी, ११ हजार ४२९ अंकांवर बंद झाला. तोही दिवाळीला १२ हजार ५००वर जावा. जून २०१८ तिमाहीचे बहुतेक कंपन्यांचे विक्रीचे व नफ्याचे आकडे उत्तम येत आहेत. या सदरात सतत गुंतवणूकयोग्य म्हणून सांगितलेल्या ‘ग्राफाइट इंडिया’ने शुक्रवारी ११२० रुपयांपर्यंत मजल गाठली आहे. त्या कंपनीची जून २०१८ तिमाहीची विक्री १९ कोटी रुपये झाली. नक्त नफा ९७७ कोटी रुपये झाला. शेअरगणिक उपार्जन ४९ रुपये पडले. तिन्ही तिमाह्यांमध्ये उपार्जन असेच राहील असे गृहीत धरले, तर मार्च २०१९ वर्षासाठीचे उपार्जन १९० ते २०० रुपये व्हावे. त्या वेळी किंवा त्याआधीही शेअरचा भाव १४०० रुपयांपर्यंत जावा. हा शेअर ७०० रुपयांना असल्यापासून, या सदरात त्याची खरेदीसाठी शिफारस केली होती. अजूनही तो अधेमधे एक हजार रुपयांखाली मिळाला तर जरूर घ्यावा.

‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ची यावेळची विक्री उत्तम आहे. नक्त नफाही चांगला आहे. त्यामुळे सध्याच्या २८३ रुपये भावाला तो जरूर घ्यावा. ३१ ऑगस्टला होणाऱ्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ती कंपनी कदाचित अंतरिम लाभांशही जाहीर करेल. वर्षभरात हा शेअर ३० ते ३५ टक्के सहज वाढेल. 
‘विंध्या टेलिलिंक्स’ ही ऑप्टिकल फायबर केबल्सचे उत्पादन करणारी ‘स्टरलाइट’सारखी कंपनी आहे. जून २०१८ तिमाहीत तिची विक्री ४०४.६८ कोटी रुपये झाली आहे. नक्त नफा ३३.३९ कोटी रुपये आहे. नफा वाढेल या अपेक्षेने हा शेअर गेले सहा आठवडे सतत वाढत आहे. शुक्रवारी तो १३२७ रुपयांवर होता. अजूनही त्यात २०० रुपयांची वाढ होऊ शकेल.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे या तिमाहीचे एकूण उत्पन्न ७४ हजार ९९३ कोटी रुपये आहे. अनार्जित कर्जांसाठी १९ हजार ४९९ कोटी रुपयांची प्रचंड तरतूद केल्याने तिचा तोटा ४२३० कोटी रुपये झाला. राष्ट्रीयीकृत बँकांचे शेअर्स घेण्याची वेळ अजून आलेली नाही.

या सदरात वेळोवेळी अनेक शेअर्सचा परामर्श घेतला जात असला, तरी गुंतवणूकदारांनी आपली जोखीम घेण्याची कुवत बघून गुंतवणूक करावी. संभाव्य लक्ष्याचे आकडे अभ्यासपूर्णच असले, तरी राजकीय व आर्थिक परिस्थिती बदलली वा कंपनीचे व्यवस्थापन, उत्पादन, त्या बाबतींतली स्पर्धा, जागतिक बाजारभाव व नैसर्गिक घटना यांवरही ते अवलंबून असतात. लेखकाची भूमिका फक्त आकडेवारी मांडण्याची असते. गुंतवणूकदारांच्या नफ्या-तोट्याबद्दल तो जबाबदार नसतो. हे लक्षात घेऊन अशा अभ्यासाला स्वतःच्या अभ्यासाची जोड द्यायला हवी. वेळोवेळी आर्थिक वृत्तपत्रे, नियतकालिके यांचे वाचन करून स्वतःचे मत बनवून, स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा. वाटल्यास लेखकाशी संपर्क साधावा.   

डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link