Next
‘रणांगण’ कादंबरी पोहोचणार जगभर
प्रादेशिक कादंबऱ्यांच्या इंग्रजी अनुवादासाठी जेएसडब्ल्यू समूहाचा पुढाकार
BOI
Monday, July 30, 2018 | 03:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मराठीतील ज्येष्ठ लेखक विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ ही कादंबरी आता इंग्रजी भाषेत अनुवादित होणार आहे. भारतातील साहित्याचा मौल्यवान ठेवा जगासमोर आणण्यासाठी जेएसडब्ल्यू समूहाने इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह आणि स्पीकिंग टायगर पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने एका अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यामध्ये प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार साहित्य इंग्रजीत अनुवादित करून जगभरात पोहोचवण्यात येणार आहे. यात निवडण्यात आलेल्या पहिल्या चार साहित्यकृतींमध्ये मराठीतील विश्राम बेडेकरलिखित ‘रणांगण’ या कादंबरीचा समावेश आहे. 

विश्राम बेडेकर
१९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘कार्मेलीन’ या दामोदर माऊझो यांनी कोकणी भाषेत लिहिलेल्या कादंबरीचाही त्यात समावेश आहे. या कादंबरीचा इंग्रजीसह मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, सिंधी आदी भाषांमध्ये अनुवाद झाला असून, विद्या पै यांनी केलेला इंग्रजी अनुवाद २००४ मध्ये साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे. साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कारही या कादंबरीला मिळाला आहे.

बंगालीतील माणिक बंदोपाध्याय लिखित ‘पदम नादिर मांजी’ आणि उर्दूतील क्वारातूलेन हैदर यांच्या कादंबरीचीही या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातील हा असा पहिलाच प्रयोग आहे. त्याकरिता तीन नामांकित संस्थांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे प्रादेशिक भाषेतील साहित्याला जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. 

दामोदर माऊझो
‘इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह’ ही स्वयंसेवी संस्था असून, डॉ. अश्वनी कुमार, संगीता जिंदाल, अनुराधा पारीख आणि अम्रिता सोमय्या हे त्या संस्थेचे सदस्य एकत्र येऊन भारतीय साहित्याचे जागतिक दर्जाचे भाषांतर करणार आहेत. तसेच कथावाचन, संवाद आणि ऑनलाइन जाहिराती-कार्यक्रमांद्वारे वाचकांची एक समृद्ध चळवळ निर्माण करण्याचीही त्यांची योजना आहे. ‘इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह’तर्फे भारतातील विविध प्रादेशिक भाषांमधील अभिजात साहित्याची छाननी करणार असून, त्यापैकी निवडक साहित्याचे जतन आणि सादरीकरण केले जाणार आहे. 

या सामंजस्य कराराबद्दल जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल म्हणाल्या, ‘प्रादेशिक भाषांमधील साहित्य ही भारताला मिळालेली देणगी आहे. हिंदी, उर्दू, कन्नड, मराठी, बंगाली आणि मल्याळी भाषेतील प्रतिभावान लेखक आपल्याकडे असून, त्यांनी अभिजात साहित्याचा साठा आपल्याला दिला आहे; मात्र आपल्या राज्याच्या किंवा आपल्या देशाच्या प्रादेशिक सीमा ओलांडल्या, तर मोजक्याच वाचकांना या अभिजात साहित्याबद्दल माहिती आहे. या अनोख्या प्रयत्नांद्वारे, जेएसडब्ल्यू समूह भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत आहे. इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह आणि स्पीकिंग टायगर यांसारख्या विश्वासार्ह संस्थांशी भागीदारी करून आम्ही भारतातील प्रादेशिक भाषांमधील साहित्य देशाच्या समृद्ध सांस्कृतिक प्रवाहात आणण्यासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या सांघिक प्रयत्नांद्वारे आम्ही इंग्रजी भाषेत नसलेले सर्वोत्कृष्ट भारतीय साहित्य आता जगभरातील इंग्रजी वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.’

‘स्पीकिंग टायगर’चे रवी सिंग म्हणाले, ‘जेएसडब्ल्यू समूह आणि इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्हने हाती घेतलेल्या या अद्भुत आणि अत्यावश्यक प्रकल्पाचा एक भाग असल्याचा स्पीकिंग टायगरला आनंद वाटत आहे. पुस्तकांचा अफाट खजिना भारताला लाभलेला असून, ही पुस्तके अविस्मरणीय कथाकथन करतात; मात्र या भाषांपलीकडील मोजकेच वाचक हे साहित्य वाचतात. एक प्रकाशक या नात्याने, देशातील अभिजात साहित्य देशातील नव्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ‘स्पीकिंग टायगर’तर्फे या साहित्याचे प्रकाशन आणि विपणन केले जाईल; तसेच ‘इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह’मार्फत या साहित्याचे देशभर वितरण केले जाणार आहे. 

‘इंडियन नोव्हेल्स कलेक्टिव्ह’चे डॉ. अश्वनी कपमार म्हणाले, ‘भारतीय साहित्यातील खजिना नव्या वाचकांसमोर सादर करण्याबरोबर त्यांच्याशी जोडले जाऊन एक चांगले जाळे या निमित्ताने विणले जाणार आहे. जे वाचक इंग्रजीभाषेव्यतिरिक्तच्या साहित्यापासून दूर आहेत, अशा जगभरातील वाचकांना एकत्र आणता येईल; तसेच त्यांना परिसंवादात भाग घेण्याची संधी मिळेल. इंग्रजी वाचक आणि भारतातील प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्तम साहित्य यांच्यातील दरी मिटवता येईल; तसेच भारतातील कथाकथन साहित्यचळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी वाचकांची साहित्य चळवळ निर्माण करता येईल. निवड केलेल्या सर्व साहित्याचे स्वरूप एकसारखेच असणार असून, यातून मिळणारा नफा ‘इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह’तर्फे भविष्यात अनुवादाच्या कार्यासाठी वापरला जाणार आहे.’ 

(‘रणांगण’ कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link