Next
बाळ गाडगीळ, नागनाथ कोत्तापल्ले, पुरुषोत्तम लाड
BOI
Thursday, March 29, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

मिश्कील आणि खुसखुशीत लेखन करणारे बाळ गाडगीळ, ज्येष्ठ समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले आणि संत साहित्याचे अभ्यासक पुरुषोत्तम मंगेश लाड यांचा २९ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
..... 
पांडुरंग लक्ष्मण गाडगीळ

२९ मार्च १९२६ रोजी अणसुरेमध्ये (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) जन्मलेले पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ हे खुमासदार शैलीत विनोदी लेखन करणारे वाचकप्रिय लेखक म्हणून प्रसिद्ध होते. विनोदी कथासंग्रह, प्रवासवर्णन, लेख, व्यक्तिचित्र असे विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले होते. त्यांची ६०हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. 

वकिलांचे विनोद, राजकारण्यांचे विनोद, डॉक्टरांचे विनोद, स्कॉच लोकांचे विनोद, आयरिश विनोद, वेड्यांचे विनोद अशा विविध प्रकारच्या विनोदांचा त्यांनी संकलित केलेला पाच पुस्तकांचा संच लोकप्रिय झाला होता. 

‘सिगरेट आणि वसंत ऋतू’ या त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासवर्णनाला शासनाचं प्रथम पारितोषिक मिळालं होतं. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘शतकातील साहित्यिक’ म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक, तसंच प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. सिम्बायोसिस संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 

आकार आणि रेषा, अखेर पडदा पडला, अमेरिकेत कसे मरावे, आम्ही भूगोल घडवतो, बबनरावांना शिंगे फुटतात, बॉबी डार्लिंगचे पलायन, बोका शिंके आणि काकवी, चिमणरावाचा नवा अवतार, चोर आणि मोर, दुसरा चिमणराव, एक चमचा ‘पुलं’, एक चमचा अत्रे, फिरकी, हसत खेळत, हसायचं नाही, हसो हसो, हट् म्हणताच गरिबी हटली, होश्शियार निगा रख्खो, माशाचे अश्रू, पाटलांची पीए, शीरसलामत, थ्रील, तू तिथं मी? अजिबात नाही, गप्पागोष्टी, घण एक पुरे प्रेमाचा, मधात तळलेले बदक अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

मुंबईत १९९२ साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

२१ मार्च २०१० रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं.

(बाळ गाडगीळ यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
........

नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले 

२९ मार्च १९४८ रोजी मुखेडमध्ये (जि. नांदेड) जन्मलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले हे कथाकार, कवी, कादंबरीकर आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. 

वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे लहानपणापासून त्यांची प्रचंड भटकंती झाली. त्याबद्दल त्यांनी लिहिलंय - ‘एका अर्थाने मी इतका फिरत राहिलो आहे, की माझा गाव मला फारसा ओळखत नाही आणि मलाही माझा गाव नेमका कोणता असा प्रश्न पडतो.’ या भटकंतीत घडलेल्या जीवनाच्या विविध अंगाचं दर्शन त्यांच्या साहित्यातून येत गेलं.

७०च्या दशकात ‘छेद’ आणि ‘एक कथा’ यांसारख्या कथांपासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. त्यांच्या कथांमधून तळागाळातलं ग्रामीण जीवन समोर येतं. ग्रामीण स्त्रियांच्या दु:खाचं त्यांनी केलेलं चित्रणही प्रत्ययकारी आहे.  

त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या ‘प्रतिष्ठान’ नियतकालिकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिलं होतं. त्याच विद्यापीठाचे पुढे ते कुलगुरू झाले. 

अपार्थिवाचे गाणे, देवाचे डोळे, काळोखाचे पडघम, मध्यरात्र, मराठी कविता : आकलन आणि आस्वाद, संत तुकारामांचे आत्मवृत्त, गांधारीचे डोळे, जोतिपर्व, कवीची गोष्ट, महात्मा जोतिबा फुले यांचे १०१ मौलिक विचार, मूड्स, राजधानी, रक्त आणि पाऊस, साहित्याचा अन्वयार्थ, साहित्याचा अवकाश, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

२०१२ साली चिपळूणमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

(नागनाथ कोत्तापल्ले यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
........

पुरुषोत्तम मंगेश लाड

२९ मार्च १९०५ रोजी जन्मलेले पुरुषोत्तम मंगेश लाड हे संतसाहित्याचे अभ्यासक, विद्याव्यासंगी भाष्यकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी पहिली जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली होती. केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी खात्याचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.
 
‘चकोर’, ‘चिकित्सक’, ‘निरीक्षक’ अशा टोपणनावांनी त्यांनी लेखन केलं होतं. 

कृत्तिका, आकाशगंगा, तुकारामाच्या अभंगगाथा भाग १ आणि २, मधुपर्क, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

२४ मार्च १९५७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link