Next
घोडबंदर किल्ल्यावर अवतरणार ‘शिवसृष्टी’
किल्ल्याचे पालकत्व मीरा-भाईंदर महापालिकेकडे
प्रशांत सिनकर
Monday, February 18, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:

शिवसृष्टीचे संकल्पचित्र

ठाणे :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला घोडबंदर किल्ला संगोपनार्थ मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे सोपवण्यात आला आहे. या संदर्भातील पत्र सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच सुपूर्द केले आहे. या किल्ल्यावर आता शिवसृष्टी उभारली जाणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गेली सुमारे आठ वर्षे या मागणीचा पाठपुरावा करत होते. शिवसेनेतर्फे १९ फेब्रुवारी २०१९ रोजी (शिवजयंतीदिनी) सायंकाळी पाच वाजता किल्ल्यावर विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.या कार्यक्रमानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या ठिकाणी उभारली जाणारी शिवसृष्टी कशी असेल, याचेही चित्रफितीद्वारे सादरीकरण केले जाणार आहे.मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वेशीवर असलेल्या घोडबंदर किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, पुढील पिढीला याची माहिती मिळावी, यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गेली आठ वर्षे सरकारदरबारी पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, राज्य शासनाने हा किल्ला देखभालीसाठी नुकताच मीरा-भाईंदर महानगरपालिकेला दत्तक दिला आहे. या किल्ल्याजवळील महसूल विभागाची १४ एकर जागा पालिकेकडे हस्तांतरित झाली आहे. यातील नऊ एकर जागेवर शिवसृष्टी, तर पाच एकर जागेवर निसर्ग उद्यान आणि म्युझिकल फाउंटन उभारले जाणार आहे. रात्रीच्या वेळी लांबूनही किल्ला दिसावा, यासाठी आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. या सर्वाचा आराखडा प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी तयार केला आहे. शिवसृष्टी उभारण्याकरिता ५१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर मूळ किल्ल्याला कुठेही धक्का न लागता पुरातत्त्व खात्याच्या निर्देशानुसार सुमारे एक कोटी ८१ लाख रुपये खर्च करून किल्ल्याची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक कोटी रुपये निधी मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे वर्ग झालेला असून, ८१ लाख रुपयांचा खर्च मीरा-भाईंदर महानगरपालिका करणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून, ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. याचे भूमिपूजन शिवजयंतीच्या औचित्याने करून ते काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचे निमित्त साधून आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात येणार असून, पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने या विजयोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

शिवसृष्टीचे संकल्पचित्र
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 53 Days ago
Every fort fell to the forces of the Company , within a few days . Has anybody looked at this aspect? Better armament --is that the only answer ?
0
0

Select Language
Share Link
 
Search