Next
प्रा. त्रिवेदी, प्रा. मेयर यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार
नंदन निलेकणी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
BOI
Saturday, January 12, 2019 | 01:01 PM
15 0 0
Share this story

नंदन निलकेणीपुणे : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा एच. के. फिरोदिया पुरस्कार यंदा मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे (टीआयएफआर) संचालक प्रा. संदीप त्रिवेदी आणि बेंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचे (एनसीबीएस) संचालक प्रा. सत्यजित मेयर यांना जाहीर झाला आहे. इन्फोसिसचे सहअध्यक्ष नंदन निलेकणी यांना एच. के. फिरोदिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या एक फेब्रुवारीला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी शुक्रवारी, ११ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी जयश्री फिरोदिया, प्रा. के. सी. मोहिते, दीपक शिकारपूर उपस्थित होते. 

देशातील विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांना दर वर्षी एच. के. फिरोदिया पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फिरोदिया पुरस्कारांचे यंदाचे तेवीसावे वर्ष आहे.

प्रा. संदीप त्रिवेदी
 यंदाच्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी प्रा. संदीप त्रिवेदी यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. त्रिवेदी हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असून, स्ट्रिंग थिअरीवर त्यांनी संशोधन केले आहे. विश्व रचनाशास्त्र, पार्टीकल फिजिक्स या विषयातील त्यांच्या संशोधनाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

प्रा. सत्यजित मेयर
विज्ञान भूषण पुरस्कारासाठी जीवशास्त्रज्ञ प्रा. सत्यजित मेयर यांची निवड करण्यात आली आहे. सेल मेम्ब्रेनचे (पेशी कवचाचे) कार्य कसे चालते या विषयावर त्यांचे संशोधन आहे. त्यांनाही देशा-विदेशातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले असून, यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सचे ते फेलो आहेत. 

आधार कार्ड आणि देशातील कॅशलेस व्यवहारांच्या प्रसारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल इन्फोसिसचे सहअध्यक्ष नंदन निलेकणी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

‘एक फेब्रुवारीला बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी सहा वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. या वेळी पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत. तसेच फिरोदिया पुरस्कारांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावर आधारीत ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे,’ असे अरुण फिरोदिया यांनी सांगितले. 

ते म्हणाले,‘पाऊण तासाच्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळेल; तसेच सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात बक्षिसे देण्यात येतील, तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.’ ‘प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.quiz.hkfirodiaawards.org या संकेतस्थळाला भेट द्यावी’, असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link