Next
प्राप्तिकर परतावा मिळणार अवघ्या एक दिवसात
BOI
Thursday, January 17, 2019 | 01:44 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ‘प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी अवघ्या एक दिवसात करणाऱ्या एकात्मिक ‘ई-फायलिंग’ आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात येत असून, हे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर प्राप्तिकर परतावा अवघ्या एक दिवसात मिळू शकणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. 

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल
‘सध्याचे प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल व केंद्रीकृत प्रोसेसिंग केंद्र यांना एकत्र करून हे नवे प्रक्रिया केंद्र निर्माण करण्यात येत असून, याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी, १६ जानेवारी २०१९ रोजी मंजुरी दिली. यासाठी चार हजार २४१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, ही नवी सुविधा निर्माण करण्यासाठी १८ महिने लागतील. आणखी तीन महिन्यांच्या चाचणीनंतर ते सुरू होईल. यामुळे प्राप्तिकर संकलन आणि कर परताव्याचे काम सुलभ आणि जलदगतीने होईल. या २१ महिन्यांच्या कालावधीनंतर प्राप्तिकर परतावा अवघ्या एक दिवसात मिळू शकेल,’ असे गोयल यांनी स्पष्ट केले. 

‘सध्या प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्यासाठी ६३ दिवस लागतात. ती प्रक्रिया एका दिवसावर येणार असून, विवरणपत्र अचूक दाखल केले असल्यास लगेच कर परतावा मिळणे शक्य होईल. विवरणपत्रातील चुकांची दुरुस्ती करण्याची प्रक्रियादेखील आणखी सुलभ आणि झटपट होईल’, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. 

‘सध्या केवळ ०.३ टक्के प्राप्तिकर विवरण पत्रांचीच छाननी होत असून, आमच्या सरकारचा करदात्यांवर पूर्ण विश्वास आहे. सध्याच्या प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल व केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत २३ कोटी विवरणपत्रे दाखल झाली असून, दोन लाख ६१ हजार ८०८ कोटींचे परतावे ३० सप्टेंबर २०१८पर्यंत देण्यात आले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर २०१८ दरम्यान पहिल्या सहा महिन्यांत एक कोटी ८३ लाख रुपयांचा कर परतावा केंद्रीकृत प्रक्रियेद्वारे थेट जमा झाला आहे. नोकरशाही आणि नेहमीचे इतर अडथळे न आल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणावर कर परतावे पोहोचले आहेत. डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्यांना आणखी सुविधा मिळतील,’ असेही गोयल यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search