Next
अन् बेन-येहुदा कृतार्थ झाला...!
BOI
Monday, July 23, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

बेन येहुदा
इस्रायलला यहुदी (ज्यू) राष्ट्राचा दर्जा देणारे विधेयक गेल्या आठवड्यात तेथील संसदेने संमत केले. त्यात आतापर्यंत इस्रायलमध्ये हिब्रूच्या बरोबरीने अरबी भाषेला असलेला अधिकृत भाषेचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे. हा इस्रायलच्या इतिहासातील निर्णायक क्षण असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले. यहुदींमध्ये मरणोत्तर जीवनाची कल्पना असो वा नसो, पण हिब्रूला मिळालेला हा सन्मान पाहून बेन-येहुदा नक्कीच कृतार्थ झाला असेल! हिब्रू भाषेसाठी जिवाचे रान केलेल्या आणि या प्राचीन भाषेत खऱ्या अर्थाने प्राण फुंकणाऱ्या बेन-येहुदाबद्दल वाचा या लेखात...
.........
‘हा देशाच्या इतिहासातील निर्णायक क्षण आहे. यामुळे आमची भाषा, आमचे राष्ट्रगान आणि आमचा ध्वज या गोष्टी सुवर्णाक्षरांनी नोंदविल्या गेल्या आहेत,’ असे उद्गार दोन दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांच्या संसदेत काढले. त्या वेळी हिब्रू भाषेसाठी जिवाचे रान केलेल्या आणि या प्राचीन भाषेत खऱ्या अर्थाने प्राण फुंकणाऱ्या बेन-येहुदा याला कृतार्थ वाटले असेल.

इस्रायलमध्ये हिब्रू भाषेच्या वापराचा सर्वांत प्राचीन पुरावा तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे; मात्र दीड-दोन शतकांपूर्वी जगभरात परागंदा झालेल्या यहुदी लोकांनी इस्रायलमध्ये परतण्यास सुरुवात केली, तेव्हा हिब्रू ही यहुदी लोकांची भाषा नव्हती. यहुदीवादाचा आणि जागतिक झियोनिस्ट ऑर्गनायझेशनचा संस्थापक थिओडोर हर्झल याला स्वतःला हिब्रू येत नव्हती. भावी इस्रायलची भाषा जर्मन असावी, अशी त्याची योजना होती.

...मात्र या भाषेला पुनर्जीवन देण्याचा विडा उचलला होता तो इलिएझर बेन-येहुदा या पुरुषाने. बेन-येहुदा याचा जन्म १८५८ साली झाला आणि मृत्यू १९२२ साली. या ६४ वर्षांच्या आयुष्यात त्याने जे केले, त्यामुळे आजचा इस्रायल स्वतःच्या भाषेत तर बोलतो आहेच; पण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमताही बाळगून आहे. त्याचे मूळचे नाव इलिएझर यित्झाक पर्लमन. परंतु आपल्या मातृभूमीत आल्यानंतर (१८८१ - लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ सुरू केला ते हे वर्ष!) त्याने बेन-येहुदा हे नाव घेतले. त्या वेळी यहुदीवादाची नुकतीच सुरुवात होत होती. त्याबद्दल वृत्तपत्रांत येणाऱ्या बातम्यांवरून बेन-येहुदाने ताडले होते, की इस्रायलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगायचे असेल, तर हिब्रू भाषा हा त्या राष्ट्राचा आत्मा असेल. हिब्रू भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देणे, हे तेव्हापासून त्याचे जीवनध्येय बनले.

बेलारूसमध्ये जन्मलेल्या बेन-येहुदा याला फ्रेंच, जर्मन आणि रशियन या भाषा येत होत्या; मात्र मातृभूमीत पाय ठेवल्या क्षणापासून त्याने पत्नीशी आणि संपर्कात येणाऱ्या सर्व यहुदी व्यक्तींशी केवळ हिब्रू भाषेत बोलायला सुरुवात केली.

बेन-येहुदाच्या मार्गात अनंत अडचणी होत्या. प्राचीन हिब्रू भाषेत लिहिलेली सर्वांत जुनी रचना बायबल ही आहे. या बायबलचे दोन भाग आहेत - ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट. यातील ‘ओल्ड टेस्टामेंट’च्या पहिल्या पाच पुस्तकांची भाषा हिब्रू आहे. बेन-येहुदाने आपले कार्य सुरू केले, तेव्हाची हिब्रू ही आपल्या संस्कृतप्रमाणे या ‘ओल्ड टेस्टामेंट’मध्ये बंद झाली होती. बायबलमध्ये वापरलेली भाषा आधुनिक काळात (१९व्या शतकात) कामी येणार नाही, हे त्याला कळले होते. तेव्हा या भाषेला आधुनिक रूप देण्याचे त्याने ठरविले.

सुदैवाने त्याच्या या निष्ठेला विद्वत्तेची जोड होती. त्याच्याकडे भाषेचे वैभव होते. तिला पुन्हा व्यवहारात आणण्यासाठी बेन-येहुदा याने जे प्रयत्न केले, ते मुख्यतः तीन प्रकारचे. पहिला, घरगुती व्यवहारात हिब्रूचा वापर वाढवणे, दुसरा, शिक्षणाच्या माध्यमातून हिब्रूचा प्रसार करणे आणि तिसरा वेगवेगळ्या  नवीन हिब्रू शब्दांची रचना. यांपैकी, त्याने हिब्रूचा वापर घरात कसा वाढविला, याचे वर्णन अनेकांनी केलेले आहे. रशियात जन्मलेल्या त्याच्या पत्नीला हिब्रू येत नव्हते. मुलाची मातृभाषा हिब्रू असल्यामुळे त्याला खेळगडी मिळेनात. आपल्या मुलाच्या कानावर हिब्रूशिवाय अन्य कोणतीही भाषा पडू नये, यासाठी त्याने घरात मोलकरीण ठेवली नाही. त्याला पहिला मुलगा झाला, तेव्हा तो कित्येक शतकांनंतर हिब्रू मातृभाषा असणारी पहिली व्यक्ती ठरला.

शिक्षणाच्या बाबतीत त्याच्या समोरच्या अडचणी कित्येक पट अधिक होत्या. एक तर हिब्रू भाषेत शिक्षणसाहित्य उपलब्ध नव्हते, तर दुसरीकडे हिब्रूतून शिकवू शिकणारे शिक्षकही नव्हते. त्याच्या या उद्योगामुळे आपला व्यापार नष्ट होईल, अशी तेथे वसलेल्या जुन्या लोकांना भीती होती. म्हणून त्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. लहान मुले त्याला दगड मारत आणि त्याला ‘मेशुगाह’ म्हणजे वेडा म्हणत; पण बेन-येहुदा त्याच्या मार्गावर अढळ राहिला.

तिसऱ्या मार्गासाठी त्याने आधुनिक शब्दांची टाकसाळच उघडली. बायबलमधील शब्दांच्या आधारे तो नवे शब्द घडवू लागला. अशा प्रकारे त्याने शेकडो शब्द ‘पाडले.’ बेन-येहुदाने शब्दनिर्माता, शब्दकोश निर्माता, शिक्षक, नेता अशा सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडल्या. त्यातील कित्येक शब्द आज हिब्रूचा भाग बनले आहेत, तर सुमारे दोन हजार शब्द ‘फुकट गेले.’ (येथे वाचकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण यायला हरकत नाही).

त्याने ‘हत्ज्वी’ नावाचे वृत्तपत्र काढले आणि त्यात आपण घडविलेले शब्द प्रकाशित केले. या आधुनिक हिब्रूसाठी आरमाइक भाषेची लिपी घेण्यात आली. मागील दोन हजार वर्षांपासून याच लिपीत बायबल छापले जात होते. हिब्रूची ती स्वाभाविक लिपी बनली होती. त्याचे भाग्य असे, की बेन-येहुदाला त्याच्या या कार्यात यश मिळाल्याचे पाहण्याचे भाग्य लाभले होते. देशवासी, वर्तमानपत्रे आणि जगभरातील यहुदींनी या नव्या हिब्रूचा स्वीकार केला.

त्यानंतर बेन-येहुदाने हाती उपक्रम घेतला तो शब्दकोश तयार करण्याचा. या सर्व शब्दांचे संकलन करून आणि त्यात आणखी काही शब्दांची भर घालून त्याने ‘ए कम्प्लीट डिक्शनरी ऑफ अॅन्शंट अँड मॉडर्न हिब्रू’ नावाचा १२ खंडांतील शब्दकोश तयार केला. हे काम त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी पूर्ण केले. आधुनिक हिब्रूमधील हा पहिला शब्दकोश! तत्पूर्वी, आपले हे काम आपल्यानंतरही चालू राहावे, यासाठी त्याने ‘वाद हा-लशोन हा-इवरी’ (हिब्रू भाषा परिषद) ही संस्था स्थापन केली होती.

बेंजामिन नेतान्याहूहा सर्व इतिहास उजळला गेला गेल्या आठवड्यात. इस्रायलला यहुदी राष्ट्राचा दर्जा देणारे विधेयक तेथील संसदेने संमत केले. त्यात आतापर्यंत इस्रायलमध्ये हिब्रूच्या बरोबरीने अरबी भाषेला असलेला अधिकृत भाषेचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे. हा इस्रायलच्या इतिहासातील निर्णायक क्षण असल्याचे नेतान्याहू म्हणाले. यहुदींमध्ये मरणोत्तर जीवनाची कल्पना असो वा नसो, पण हिब्रूला मिळालेला हा सन्मान पाहून बेन-येहुदा नक्कीच कृतार्थ झाला असेल!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(अधिक माहितीसाठी काही व्हिडिओज...) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link