Next
ओम बिर्ला होणार १७व्या लोकसभेचे अध्यक्ष; निवडीची औपचारिकता बाकी
BOI
Tuesday, June 18, 2019 | 04:17 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : १७व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील खासदार ओम बिर्ला यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. मनेका गांधींपासून राधामोहनसिंहांपर्यंत अनेकांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत असताना भारतीय जनता पक्षाकडून अचानक ओम बिर्ला यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. बिजू जनता दलासह १० पक्षांनी बिर्ला यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड होण्याची केवळ औपचारिकताच बाकी राहिली आहे. दरम्यान, काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून पश्चिम बंगालमधील नेते अधीररंजन चौधरी यांचे नाव पक्षाकडून लोकसभेला कळविण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा अध्यक्षपदासाठी आवश्यकता भासल्यास १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. ५६ वर्षांचे ओम बिर्ला राजस्थानच्या कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. काँग्रेसचे दिग्गज उमेदवार रामनारायण मीणा यांचा त्यांनी पराभव केला आहे. त्याआधी ते सलग तीन वेळा कोटा दक्षिण मतदारसंघातून राजस्थानच्या राज्यसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. वसुंधराराजेंच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. २०१४च्या सरकारमध्ये त्यांनी ऊर्जा, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम पाहिले आहे. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे.

विद्यार्थिदशेपासूनच ते राजकीय क्षेत्राशी संबंधित असून, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद त्यांनी सहा वर्षे सांभाळले आहे. पर्यावरणप्रेमी अशी त्यांची ओळख असून, 'ग्रीन कोटा' असा उपक्रम त्यांनी राबविला आहे. राजस्थानातील सहकारी चळवळीशीही ते संबंधित आहेत. 

२००३मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केले. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाचे शुभेच्छापत्र पाठविले जाते. त्या मतदारसंघातील कोणीही १८ वर्षांचे झाले, की बिर्ला यांचे कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क साधतात आणि मतदारयादीत नाव घालण्याची सगळी माहिती आणि आवश्यक असल्यास साह्य पुरवितात. त्यामुळे अगदी तळागाळापर्यंत बिर्ला यांचा संपर्क असून, त्यामुळे ते सलग पाच निवडणुका जिंकले आहेत. त्यांच्या या 'ग्राउंड वर्क'चाच सन्मान त्यांना हे पद देऊन करण्यात आला आहे. बिर्ला हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. 

जास्त अनुभव असलेल्या खासदाराला लोकसभा अध्यक्ष बनविण्याचा संकेत असतो. १० वेळा खासदार झालेले सोमनाथ चॅटर्जी, पाच वेळा खासदार झालेल्या मीराकुमार, आठ वेळा खासदार झालेल्या सुमित्रा महाजन अशा अनुभवी नेत्यांनी याआधी लोकसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. ओम बिर्ला आता दुसऱ्यांदाच खासदार झाले आहेत. अर्थात, याआधीही मनोहर जोशींना पहिल्याच खासदारकीच्या काळात लोकसभा अध्यक्षपद देण्यात आले होते. जीएमसी बालयोगी दुसऱ्या खासदारकीच्या काळात अध्यक्ष झाले होते. इंदिरा गांधींच्या काळात बलराम जाखड यांनीही पहिल्याच खासदारकीच्या काळात लोकसभा अध्यक्षपद सांभाळले होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search