Next
कामगिरीला आव्हान देणाऱ्या भूमिकांना प्राधान्य : अंकिता लोखंडे
BOI
Monday, January 28, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

अंकिता लोखंडे 'झलकारी बाई'च्या भूमिकेत‘मणिकर्णिका : दी क्वीन ऑफ झांशी’ या मोठ्या बॅनरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आपल्या चित्रपट करिअरविषयी अतिशय उत्सुक आणि तेवढीच जागरूक असल्याचे दिसते. अभिनय आणि कामगिरी यांना आव्हान देणारी भूमिका असल्याने ‘मणिकर्णिका’ स्वीकारल्याचे अंकिता सांगते. 

बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असताना अंकिता लोखंडेच्या पहिल्या-वहिल्या चित्रपट अनुभवाबद्दल नुकतीच एका वृत्तवाहिनीने तिची मुलाखत घेतली. यामध्ये बोलताना अंकिताने आपली मते उघडपणे बोलून दाखवली. ज्या चित्रपटात प्रमुख भूमिका नाही, असा चित्रपट पदार्पणासाठी निवडण्यामागील कारण अंकिताला विचारण्यात आले. यावर अंकिताने दिलेले उत्तर अगदी ठाम आणि स्पष्ट होते. ‘मुख्य भूमिका असलेल्या अभिनेत्रीचे चित्रपट बऱ्याचदा नायकप्रधान असतात. त्यात नायकाची भूमिका बऱ्याचदा महत्त्वाची ठरते. अशा वेळी केवळ काही गाण्यांपूरते आणि नायिकेच्या भूमिकेत म्हणून असे चित्रपट करून मी माझ्या करिअरची सुरुवात करणे मला योग्य वाटले नाही. उलट ‘मणिकर्णिका’त मी प्रमुख भूमिकेत नसले, तरी मला त्यात माझे कसब पुरेपूर दाखवता आले आहे.’ 

३४वर्षीय अंकिता छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. ‘पवित्र रिश्ता’मधील अर्चना या नावानेच तिची खरी अभिनयाची सुरुवात झाली. ‘या मालिकेतील अर्चना खूप सोशिक आणि स्वभावाने साधी-गरीब दाखवली असल्याने आजवर माझी तीच ओळख होती. परंतु माझ्यातील एक धाडसी आणि शूर अंकिता मला सर्वांसमोर आणायची होती आणि तशी अंकिता, या चित्रपटातील झलकारी बाईच्या भूमिकेतून चपखलपणे मांडता आली’, असे ती म्हणते.  

‘चित्रपटात नायिका पूर्ण वेळ आणि मोठ्या भूमिकेत असेल, तर तिला प्रसिद्धी मिळते, हे सूत्र आता कधीच मागे पडले आहे. उलट दहाच मिनिटांची तुमची भूमिका असेल, पण आव्हानात्मक असेल, तर लोक तुम्हाला लक्षात ठेवतात’, असे अंकिताला वाटते. त्यामुळे या चित्रपटात आपण दहा मिनिटे जरी दिसलो असतो, तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहिलो असतो, असे तिला वाटते. या चित्रपटाच्या बाबतही असे काही ठरले नसताना अशी आव्हानात्मक भूमिका मिळाली आणि लगेच ती स्वीकारली असल्याचेही अंकिता सांगते. 

‘मणिकर्णिका’ या ऐतिहासिक चित्रपटासाठी काम करताना दडपण होते का, असे विचारल्यावर अंकिता मोकळेपणाने याबाबत सांगते. ‘हा चित्रपट किंवा यातील कोणतीही भूमिका ही माझ्यासारख्या नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकासाठी एक ‘ड्रीमरोल’च असेल. झाशीची राणी ही तिच्या पराक्रमामुळे वंदनीय होती. त्यामुळे लोक तिचा अभिमान बाळगतात आणि तिचा जयजयकारच करतात. पहिलाच चित्रपट करताना अशा चित्रपटात भूमिका मिळाली याचा खूप आनंद होता. दडपण कधीच नव्हते, ते कामाच्या दरम्यानही कधी जाणवले नाही.’ 

नुकताच प्रदर्शित झालेला ‘मणिकर्णिका : दी क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट झाशीच्या राणीच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. यामध्ये ‘झाशीच्या राणी’च्या भूमिकेत अभिनेत्री कंगना रनौट असून, अंकिता लोखंडे ‘झलकारी बाई’च्या भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात अतुल कुलकर्णी, जिश्शू सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय आणि डॅनी हे विशेष भूमिकांध्ये आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search