Next
‘सावरकरांच्या उपक्रमांची फळे आज चाखतो आहोत’
BOI
Friday, October 05, 2018 | 04:30 PM
15 0 0
Share this article:

पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. श्रीरंग कद्रेकर, दादा इदाते. शेजारी रवींद्र साठे, डॉ. मोडक, अॅड. दीपक पटवर्धन, आनंद पाटणकर आदी.

रत्नागिरी : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे प्रतिबिंब आज दिसत आहे. त्यांनी रत्नागिरीत राबविलेल्या सहभोजन, मंदिरप्रवेश अशा उपक्रमांची फळे आज आपण चाखतो आहोत. समुद्राचे रक्षण केल्याशिवाय भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही, असे भाकीत त्यांनी केले होते. सध्याचे सरकार समुद्राचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे ८०-९० वर्षांनी का होईना, पण भारतात स्वा. सावरकरांचे विचार पटू लागले आहेत आणि त्यांचे अनुकरणही केले जात आहे,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी व्यक्त केले.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात’ या डॉ. मोडक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन चार ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि मुंबईतील सावरकर दर्शन प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिकूजी उर्फ दादा इदाते, सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे, वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते. कार्यवाह आनंद पाटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मनोगत व्यक्त करताना डॉ. अशोक मोडक.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर समजण्यासाठी ‘आपण समाजाचे काही देणे लागतो,’ ही भावना मनात असावी लागते. स्वा. सावरकरांच्या कर्मभूमीत पुस्तक प्रकाशन होणे, ही मी ऐतिहासिक गोष्ट समजतो,’ असेही डॉ. मोडक म्हणाले. 

‘स्वा. सावरकर हे काळाच्या पुढे बघणारे द्रष्टे नेते होते,’ असे इदाते म्हणाले.  ‘रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी दलितांना मंदिरप्रवेश, सहभोजन अशा अनेक समाजसुधारणा केल्या. त्यांची युद्धनीती, त्यांचे चिंतन व्यवहारात आणले, तर भारताचा उत्कर्ष होईल,’ असेही त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात अस्पृश्यता निवारणासाठी कार्य करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनातील एक हृदयस्पर्शी प्रसंग सांगितला. ‘कोलकात्यात काँग्रेसच्या अधिवेशनात शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर करून घेतला. त्यानंतर ते रत्नागिरीत आल्यावर त्यांनी स्वा. सावरकरांची भेट घेतली. सावरकरांनी दलितांना पतितपावन मंदिर खुले केले होते व सहभोजनाचा उपक्रम चालू होता. ते पाहून महर्षी शिंदे यांनी असे उद्गार काढले, की ‘मी आयुष्यभर ज्यासाठी धडपडलो, ते सावरकरांनी इथे प्रत्यक्षात घडवले. सामाजिक समरसता काय असते, ते मी पाहतोय. माझे आयुष्य स्वा. सावरकरांना द्यावे, अशी मी प्रार्थना करतो.’ सावरकर एवढे महान होते,’ असे इदाते यांनी सांगितले.

‘डॉ. मोडक यांच्या पुस्तकाचा हिंदी, इंग्रजी अनुवाद, त्याचे परीक्षण आणि चर्चासत्र असे कार्यक्रम आयोजित करावेत,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठानतर्फे अभ्यासवर्ग, तीन दिवसीय हिंदुत्व प्रमाणपत्र अभ्यासक्रम, सावरकरांनी मांडलेला राष्ट्रवाद, जीवनकार्य, विचारवैभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

‘स्वा. सावरकरांनी रत्नागिरीत केलेले काम या दृष्टीने या पुस्तकाला वेगळे महत्त्व आहे. स्वा. सावरकरांच्या कोठडीचे राष्ट्रीय स्मारक झाले. त्यात आता सुधारणाही केल्या जात आहेत. हे स्मारक प्रेरणास्रोत म्हणून जगासमोर यावे,’ असे प्रतिपादन अॅड. पटवर्धन यांनी केले.

या कार्यक्रमाला पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष तथा सावरकर प्रतिष्ठानचे संचालक अॅड. बाबासाहेब परुळेकर, डॉ. आर. एच. कांबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आनंद मराठे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, अॅड. विलास पाटणे, डॉ. कल्पना आठल्ये, शेखर पटवर्धन, वाचनालयाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि वाचक उपस्थित होते.

(‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आजच्या संदर्भात’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’ या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)

स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भातील विशेष लेख वाचण्यासाठी खालील शीर्षकांवर क्लिक करा.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search