Next
राखावी बहुतांची (भाषांची) अंतरे...
BOI
Monday, May 21 | 06:45 AM
15 0 0
Share this story

रेल्वे तिकिटांवर मराठीकेंद्र सरकारने आणलेल्या नवीन धोरणानुसार आता भारतीय रेल्वेने तिकिटांवर रेल्वे स्थानकांची नावे मराठीत छापण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून सुरूही झाली. दरम्यान, अलीकडेच दक्षिण भारतात ‘सर्व्ह इन माय लँग्वेज’ ही एक ऑनलाइन चळवळही सुरू होती. सोशल मीडियावरही तिला चांगले बळ मिळाले. या पार्श्वभूमीवर, स्थानिक भाषेतील व्यवहारांबद्दलची वस्तुस्थिती आणि गरज यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
............
मुंबईत राहणाऱ्या मराठी जनांना आपल्याच राज्यात परके होऊन राहिल्याची भावना अनेकदा त्रास देते. बव्हंशी व्यवहार हिंदी किंवा गुजराती भाषेत होत असल्यामुळे आपण नामशेष होऊ की काय, असे त्यांना वाटते. त्यांच्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला एक खुशखबर आली. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन धोरणानुसार आता भारतीय रेल्वेने तिकिटांवर रेल्वे स्थानकांची नावे मराठीत छापण्याचा निर्णय घेतला आहे. लगोलग या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून सुरूही झाली.

भाषा ही त्या त्या परिसराची आणि संस्कृतीची ओळख असते. प्रत्येक प्रांतातील लोकांना आपलेसे करून घेण्याचा राजमार्ग म्हणजे त्या भाषेला वाव देणे, आदर देणे हाच होय. प्रेमाचा मार्ग जसा पोटातून जातो, तसा स्नेहाचा मार्ग भाषेतून जातो. जगातील सर्वांत मोठ्या जाळ्यांपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेला हे सुचले, हे छान झाले. यामुळे मराठी भाषेचा गौरव होत असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होणार, यात शंका नाही. शिवाय प्रवाशांचीही त्यामुळे सोय होणार आहे. आतापर्यंत रेल्वे तिकिटांवर रेल्वे स्थानकांची नावे केवळ हिंदी आणि इंग्रजीत छापली जात होती. 

रेल्वेचे हे पाऊल यासाठी महत्त्वाचे, की नेमक्या याच वेळेस दक्षिण भारतात एक ऑनलाइन चळवळ सुरू होती. ‘सर्व्ह इन माय लँग्वेज’ (#Serveinmylanguage) असे या चळवळीचे नाव होते. सोशल मीडियावर या चळवळीला चांगलेच बळ मिळाले. खासकरून बँकांमध्ये आपल्या स्वतःच्या भाषेत सेवा मिळाव्यात, हे या चळवळीचे उद्दिष्ट होते आणि त्यात नेहमीप्रमाणे दक्षिण भारतीय ग्राहक पुढे होते. मुख्यतः ट्विटरवरून ही चळवळ चालवण्यात आली आणि बँका इत्यादी ठिकाणी स्थानिक भाषांची कशी कुचंबणा होत आहे, याचे अनेक दाखले त्यात देण्यात आले. 

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३नुसार इंग्रजी आणि देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत, तर कलम ३४५नुसार राज्य सरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही राजभाषा मानली जाते. परंतु बँकांना त्याचे काय? बहुतेक सार्वजनिक आणि खासगी बँकांनी आपली अशी समजूत करून घेतली आहे, की त्यांचे बहुतांश ग्राहक हिंदी आणि इंग्रजीमध्येच व्यवहार करतात आणि त्या भाषांमध्ये सोयी उपलब्ध करून दिल्या की झाले! म्हणून ‘एटीएम’मधून पैसे काढणे, पैसे काढण्याच्या स्लिपा आणि कॉल सेंटर्सपर्यंतच्या सर्व ठिकाणी त्यांच्या सर्व सेवा या दोन भाषांमध्येच असतात. वास्तविक भारतातील बोलीभाषांची संख्या १२२२ आहे, तर देशातील २३४ भाषा या कुणाच्या ना कुणाच्या मातृभाषा आहेत. त्यांपैकी २४ भाषा बोलणाऱ्या भाषकांची संख्या प्रत्येकी दहा लाख किंवा अधिक आहे. 

या बँकांची वर्तणूक अशी असते, की त्यांच्या सेवा हव्या असतील, तर ग्राहकांनी त्यांच्या नियमांप्रमाणे वागावे. डेबिट कार्ड चोरीला गेले किंवा ब्लॉक करायचे असेल किंवा अन्य सेवांची माहिती घ्यायची असेल, तेव्हा ही भाषेची अडचण अधिक जाणवते. भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक यांसारख्या बँकांनी तर केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्येच संवाद साधणे, हे आपले धोरण केले आहे. त्या तुलनेत खासगी बँकांनी ग्राहकानुकूल होण्याचे बऱ्यापैकी प्रयत्न केले आहेत. आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांसारख्या खासगी बँकांनी आपले डिजिटल बँकिंग व्यवसाय अधिक बहुभाषक केले आहेत. उदाहरणार्थ, कोटक इंडिया अॅप हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, तमिळ किंवा कन्नड अशा भाषांमध्ये वापरता येते. खुद्द केंद्र सरकारने आणलेले भीम अॅपही सर्व अधिकृत भाषांमध्ये वापरता येते. 

सरकारी बँकांची वृत्ती याच्या नेमकी उलट आहे. काही महिन्यांपूर्वी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ट्विटर हँडलवर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते, की ‘केवळ इंग्रजी/हिंदी अर्जांचाच विचार केला जाईल.’ या अशा उद्दाम वक्तव्यांची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. या संबंधात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी दिलेला सल्ला आठवतो. पाच-सहा वर्षांपूर्वी बँकेच्या राजभाषा पुरस्कार कार्यक्रमात ते म्हणाले होते, ‘आर्थिक समावेशकता आणि आर्थिक साक्षरता या रिझर्व्ह बँकेसाठी प्राधान्याच्या गोष्टी आहेत. बँका उत्साहाने, जोषाने आणि कल्पनाशीलतेने यासाठी उपक्रम राबवत आहेत. या संदर्भात अनुभवातून आलेला एक धडा हा आहे, की आपण संपर्काचे माध्यम म्हणून इंग्रजीचा वापर करून आर्थिक समावेशकता आणि आर्थिक साक्षरतेचा पाठपुरावा करू शकत नाही. आपल्याला हिंदी आणि इतर स्थानिक भाषांमधून लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.’ दुर्दैवाने त्यांच्या या समंजस सल्ल्याचे पालन झाले नाही. 

त्यानंतर रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक/खासगी क्षेत्रातील बँकांमधून स्थानिक भाषांचा वापर वाढावा, यासाठी एक जुलै २०१४ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यात म्हटले होते – 

- सर्व काउंटरवर इंग्रजी, हिंदी आणि संबंधित क्षेत्रीय भाषांमध्ये फलक असावेत. बँकांच्या अर्धशहरी आणि ग्रामीण शाखांमध्ये व्यावसायिक पोस्टर्सही संबंधित स्थानिक भाषांमधील असावेत.
- बँकेत उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आणि सुविधांची माहिती असलेल्या पुस्तिका हिंदी, इंग्रजी आणि संबंधित स्थानिक भाषांमध्ये ग्राहकांना पुरवाव्यात. 
- ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी हिंदी आणि स्थानिक भाषांचा उपयोग करावा. 
- चेकचे सर्व फॉर्म हिंदी आणि इंग्रजीमध्ये छापावेत; मात्र ग्राहक हिंदी, इंग्रजी किंवा संबंधित स्थानिक भाषेत चेक लिहू शकतात.

थोडक्यात म्हणजे स्थानिक भाषांचा सन्मान करणाऱ्या तरतुदी किंवा नियमांचा अभाव अजिबात नाही. अभाव आहे तो वृत्तीत आणि स्वभावात. खासकरून मराठीसारख्या हिंदीला अत्यंत जवळ असलेल्या भाषेला या जवळिकीचा अत्यंत त्रास होतो. म्हणून राजकीय पक्षांना व संघटनांना आंदोलने करावी लागतात. हिंदीबद्दल तिटकारा निर्माण करण्याचे प्रयत्न होतात. हिंदीच्या वर्चस्वामुळे भारतातील स्थानिक भाषांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होईल, याची बहुधा महात्मा गांधी यांना कल्पना असावी. म्हणूनच त्यांनी ३१ जानवारी १९२९ रोजी ‘यंग इंडिया’ वृत्तपत्रात लिहिले होते - ‘ही गोष्ट आता सर्वांनी स्पष्टपणे समजून घ्यायला हवी, की हिंदीला स्थानिक भाषांचे स्थान बिल्कुल घ्यायचे नाही. तिला केवळ आंतरप्रांतीय भाषा म्हणून स्थान मिळवायचे आहे आणि प्रांतीय विचार विनिमयाचे माध्यम व्हायचे आहे.’

हा असा तिटकारा निर्माण होऊ द्यायचा नसेल, सर्व भारतीय भाषाभगिनींनी एकोप्याने नांदायचे असेल, तर एकमेकांचा आदर करूनच राहावे लागेल. ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती चालणार नाही. ‘राखावी बहुतांची अंतरे’ हेच सूत्र कामाला येणार आहे. नाही तर स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आपले तेच ते आणि तेच ते चालू राहील.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link