Next
‘इन्क्युबेटर’मुळे नवउद्योजकांना मिळतेय ‘संजीवनी’
प्रेस रिलीज
Thursday, July 27, 2017 | 06:11 PM
15 0 0
Share this article:

उद्यमशीलता विकास विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. प्रदीप ढगे.पुणे : ‘समाजाच्या व देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासात भर घालण्यासाठी युवा पिढीमधील उद्योजक घडविण्यासाठी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर महत्वाची भूमिका बजावतात. स्टार्टअपसाठी सहकार्य, प्रशिक्षण, तांत्रिक सहकार्य, व्यवसाय कौशल्य आणि आर्थिक पाठबळ देऊन विद्यार्थ्यांनी मांडलेल्या कल्पनांचे प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करणाऱ्या इन्क्युबेटरमुळे नवउद्योजकांना संजीवनी मिळत आहे,’ असे प्रतिपादन ‘एमआयटी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर’चे व्यवस्थापक प्रा. प्रदीप ढगे यांनी केले.

‘के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’च्या ‘ट्रिनिटी अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग’मधील ‘आंत्रप्रेन्युअर डेव्हलपमेंट सेल’तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी के. जे. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, ‘ट्रिनिटी अॅकॅडमी’चे प्राचार्य डॉ. विजय वढाई, ‘कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक’चे प्राचार्य एम. एम. वारके, विभागप्रमुख प्रा. सतीश देशमुख, प्रा. शरद मुळीक, सुप्रिया बुरगुल आदी उपस्थित होते.

प्रा. ढगे म्हणाले, ‘एखादा विद्यार्थी चांगली कल्पना घेऊन आला, तर त्याला सर्व प्रकारची मदत करून त्याला त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इन्क्युबेटर प्रोत्साहन देते. त्यासाठी शिक्षणसंस्था, केंद्र सरकारचा विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, नीती आयोग, कॉर्पोरेट सेक्टर आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून हे इन्क्युबेटर केंद्र काम करीत आहे. प्रशिक्षण आणि इतर सहकार्याबरोबरच पाच हजार ते पाच लाख इतका निधीही नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी दिला जात आहे.’
जाधव म्हणाले, ‘जबाबदारी घेण्याची सवय मराठी माणसाने लावली पाहिजे. त्याचबरोबर अपयशाची भीती काढून टाकत व्यवसायिक मानसिकता विकसित करायला हवी. बाहेरून येणाऱ्या लोकांनी व्यवसाय सुरू केले आणि आपण तिथे नोकऱ्या करतो, हे चित्र बदलावे. व्यवसाय सुरू करणे आणि तो वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रचंड कष्ट, ज्ञान, संयम आणि जिद्द हवी.’

उद्यमशीलता विकास मार्गदर्शन कार्यक्रमात डावीकडून प्राचार्य एम. एम. वारके, प्रा. प्रदीप ढगे, कल्याण जाधव व डॉ. विजय वढाई.प्रा. वढाई म्हणाले, ‘उद्यमशीलता हा बेरोजगारीच्या समस्येवर उपाय असून, नावीन्यपूर्ण प्रकल्प घेऊन येणाऱ्यास महाविद्यालयातर्फे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. प्रकल्पाच्या गुणवत्तेवर अनेक कंपन्या तुम्हाला नोकरी देऊ शकतात. तसेच तुमच्या प्रकल्पाला व्यवसायात उतरविण्यासाठी सहकार्य करू शकतात.’

या वेळी एम. एम. वारके यांनी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया मुरगूल यांनी सूत्रसंचालन केले. दुश्यंत देशमुख याने आभार मानले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search