Next
आर्ट मंडी : समाजात मिसळणारी कलाचळवळ
BOI
Thursday, December 27, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडईत गेली तीन वर्षे २६ जानेवारी रोजी आर्ट मंडी या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. मंडईत भाजीखरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना चित्रे, शिल्पेही पाहता आणि खरेदी करता यावीत, समकालीन कला समाजापर्यंत पोहोचावी, हा या प्रयोगामागचा उद्देश आहे. ‘स्मरणचित्रे’ या सदरात आज त्या अनोख्या प्रयोगाबद्दल...  
.............
गौरी गांधी या चित्रकर्तीच्या संकल्पनेवर आधारित एक वेगळा प्रयोग पुण्यात गेली तीन वर्षे सुरू झाला आहे. ‘आर्ट मंडी’ हे त्याचे नाव. हा वेगळा प्रयोग करण्यामागचा उद्देश म्हणजे कला हा समाजाचा भाग हवा, हा विचार. कला चार भिंतींच्या आत राहिली, की लोक त्याकडे पाहत नाहीत. म्हणून हा प्रकार लोकांमध्ये हवा, असा विचार आर्ट मंडी या प्रयोगामागे आहे.दुसरा मुद्दा म्हणजे आर्ट मंडीतील कलाकृती या बहुधा उपयोजित म्हणा किंवा वापरता येतील अशा असतात. उदाहरणार्थ, पिशव्यांवर चित्रे, शेंगा टांगता येतात, तशी शिल्पे किंवा लहान घरांमध्ये मांडता येतील अशी शिल्पे, खेळणी, इत्यादी गोष्टी पुण्यातील प्रयोग करणारे शिल्पकार-चित्रकार करतात. त्यातून येणाऱ्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात येते.आर्ट मंडी हा इव्हेंट मोठा मजेशीर असतो. पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडईमध्ये भाजीविक्रीचे जे जुने गाळे आहेत, तेच चित्रकार वापरतात. त्यात आपल्या कलेचे सादरीकरण करतात. मग ग्राहक चित्रे आणि भाजी या दोन्ही गोष्टी एकाच मंडईमधून खरेदी करतात. त्याला आर्ट मंडी हा हिंदी शब्दप्रयोग का वापरावा, असा विचार मनात येऊ शकतो. त्याचे उत्तर म्हणजे आता पुण्यात केवळ पुणेकरच नसून, इतरही प्रांतांतील कलावंत आणि रसिक स्थायिक झाले आहेत. त्यामुळे मंडई या शब्दाऐवजी मंडी हा हिंदी शब्द वापरला जातो.

आर्ट मंडी उपक्रमात लेखक, चित्रकार डॉ. नितीन हडप

पहिल्या मंडीत गौरी गांधी, आरती किर्लोस्कर, संदीप सोनवणे, राजू सुतार, मी (डॉ. नितीन हडप) आणि अशा जवळजवळ १५-१७ कलाकारांनी भाग घेतला होता. अत्यंत उत्साहात कलाकृतींचा शब्दशः बाजार भरला होता.

हा बाजार एखाद्या खेडेगावातील आठवडे बाजारासारखा होता; पण त्याचे स्वरूप बाजारू नव्हते. कलेबाबत असे प्रयोग बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात यापूर्वी झाले आहेत. त्यातून शहरवासी आणि गावातील आधुनिक कला यांना जोडणारा दुवा तयार होत असतो. असा प्रयोग पुण्यात होत आहे. दर वर्षी २६ जानेवारीला मंडईत टिळकांच्या पुतळ्यापाशी ध्वजारोहण होते आणि त्याला जोडूनच आर्ट मंडीचे उद्घाटन होते. प्रयोगाचे एकूण स्वरूप आता स्थिरावले आहे. दर वर्षी वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे साधारणतः वीसेक कलाकार या प्रयोगात सहभागी होतात. हा जणू रंगांचा उत्सवच असतो. खास आर्ट मंडीसाठी बनविलेली शिल्पे-चित्रे एकत्र मांडून कलाकार उत्साहात बसतात. मंडईचे उंच गाळे, त्यावर मांडलेली चित्र-शिल्पांची लहान-लहान दुकाने, जोरदार होणारी जाहिरात, एखादा गायक, रॅप संगीतावर मराठी धून गातो.... तर माझ्यासारखा कोणी तरी ‘मंडी में आर्ट, आर्ट की मंडी... मंडी में कला, कला की मंडी’ वगैरे घोषणाबाजी करत असतो.

आर्ट मंडीच्या उपक्रमात मंडईतील गाळेवाले, स्थानिकांना आणि इतर कलावंतांना जोडण्याचे काम संदीप सोनवणे करतात. शांत स्वभाव, मितभाषी चित्रकार म्हणून संदीप उर्फ बाबूचा लौकिक आहे. बाबूचा व्यवसाय छपाईचा आहे. परंतु सर्व पुण्यातील चित्रकार त्याचे मित्र. बाबूचे आर्ट मंडीत शांतपणाने, पण मोठे योगदान असते.

१०० ते एक हजार रुपयांच्या रेंजमधील परवडण्यासारख्या कलाकृती आर्ट मंडीत असतात. त्यामुळे त्या घराघरात पोहोचत असतात. यातून समकालीन कलेकडे समाज वेगळेपणाने बघायला लागेल, असे चित्र निर्माण होते का? अशा प्रयोगांमधून काही तरी बदल नक्कीच होत असतात. लोक आपापल्या परीने सहभागी होत असतातच. 

मंडईतील पारंपरिक गाळे, मध्ये-मध्ये बसलेले भाजीवाले आणि अधूनमधून बसलेले चित्रकार हे फार मजेशीर दृश्य असते. हा उपक्रम चित्रकारांमध्ये अजूनही फार गांभीर्याने घेतला जात नाही. ‘गॅलरी स्टेटस, गांभीर्य म्हणजे चित्रकला. आम्ही अशी लोकांत चित्रे नाही ठेवत,’ अशा कॉमेंट्स चित्रकार करताना दिसतात. परंतु असे उपक्रम होणे समाजहिताचे आहे. कलेला बंधने-निर्बंध येण्याच्या काळात तर ‘आर्ट मंडी’सारखे उपक्रम महत्त्वाची, ठोस भूमिका बजावू शकतात, असे वाटते. या माध्यमाकडे अजून गांभीर्याने पाहिले गेले, तर येत्या २६ जानेवारीला होणारी चौथी आर्ट मंडी काही भूमिका मांडते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shashin Limaye About 267 Days ago
खूप छान उपक्रम आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी काय करायचे ते मेल् कराल कृपया.
0
0
Ar. chandrashekhar Burande About 267 Days ago
- स्तुत्य उपक्रम. सुरेख कल्पना. - चिरेबंदी भिंत, हेवा वाटेल अशा भारतीय बैठकीचा थाटमाट. - शुभेच्च्या !!!
0
0
Maneesha Lele About 267 Days ago
Thank you BOI team for sharing this. Few people knows about it
0
0
Hole yogita About 268 Days ago
Nice
0
0
Swati Godbole (MFA) About 268 Days ago
Nice ,creative Idea! I would like to participate next time
0
0
manoj P Salunke About 269 Days ago
Excellent , creative & social touch art thought , I like very much, all the best for team , thank you
0
0
Darshana V. Shah About 269 Days ago
Creative n interesting idea
1
0

Select Language
Share Link
 
Search