Next
घरटे
BOI
Friday, November 24, 2017 | 04:25 PM
15 0 0
Share this article:

‘एफसी रोड’ या ई-मासिकात प्रसिद्ध झालेली वैद्या सोनाली कुलकर्णी-गायकवाड यांची कथा येथे प्रसिद्ध करत आहोत.
.............
‘House warming ceremony, on the auspicious day of Vijayadashmi. We cordially invite you to bless us on our very first own dream house...’
‘पोस्टेड...’ लॅपटॉपवर रंगीत नखांची बोटे नाचवत प्रतीक्षा नीरजकडे पाहून म्हणाली, ‘अरे तू व्हॉट्सअॅपवर पाठवलेस का इन्व्हाइट सर्वांना..?’ ‘हो राणीसाहेब, इट्स डन. अगं.. पण हे काय.. तू मला टॅग का नाही केलंस..? माझ्या कॉन्टॅक्ट्सना पण पाठवावे लागेलच ना,’ स्मार्टफोनवर तिची पोस्ट पाहून नीरज म्हणाला. कम ऑन, धिस इज मियर ए फॉरमॅलिटी... आपल्याला एवढे गेस्ट पाहणं शक्य आहे का... बघ, पाच मिनिटांत ७८६ लाइक्स आणि २५६ कमेंट्स...! मी सरळ पुजेचा लाइव्ह व्हिडिओ अपलोड करीन. शिवाय घराचा थ्रीडी व्हिडिओ म्हणजे प्रत्यक्ष अटेंड केल्याचा फील येईल...! नंतर मग फोटो अपलोड करून थँक्स गिव्हिंगची पोस्ट. गिफ्ट्ससुद्धा ऑनलाइन डायरेक्ट आपल्याच अॅड्रेसवर पाठवायला सांगणार आहे मी क्लोज फ्रेंड्सना. असंही आपला सगळा वेळ तुझ्या गावच्या माणसांना एंटरटेन करण्यात जाणार आहे. प्रतीक्षाने तेवढ्यात टाँट मारून घेतला.

‘गावची माणसं काय, निगडीहून येणारेत ते सगळे.  निगडी इज फोर्थकमिंग स्मार्ट सिटी.’ नीरजने बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. ‘मग तेच तर.. स्मार्ट सिटीत लोकही स्मार्ट पाहिजेत ना.. फेसबुकवर विशेस देऊन टाकायच्या. नाहीतर ट्विटरवर टिवटिव करून मोकळे व्हायचे. प्रत्यक्ष येऊन त्रास कशाला द्यायचा..? आय मीन त्रास कशाला घ्यायचा..’ प्रतीक्षाने आपले लॉजिक मांडले. ‘ते तुला नाही कळणार,’ असं बोलून नीरज उठून गेला, प्रतीक्षा नाक उडवून पुन्हा आपल्या सोशल मीडियाच्या व्हर्चुअल जगात फेरफटका मारण्यात गढून गेली.
.................
मालूताई पलंगावर सगळं कपाट मांडून बसल्या होत्या. स्वतःच्या लग्नापासून ते डोहाळजेवण, मुलाचं बारसं,  मुंज, लग्न, नातीचं बारसं आणि अगदी तिच्या नुकत्याच साजऱ्या केलेल्या पाचव्या वाढदिवसापर्यंतच्या सर्व साड्या त्यांनी ओळीने मांडून ठेवल्या होत्या. त्यांच्यावर मायेने हात फिरवताना, त्या साड्यांच्या पदरातून जणू भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरून सरकत होता; असं वाटत होतं, की त्या साड्या, दागिने सजीव होऊन तो-तो सोहळा मोठ्या उत्साहाने पुनःवर्णन करत आहेत. 

लग्नाचा शालू किती लाजत होता, लाजून त्याचा मूळ विटकरी रंग अजूनच लालबुंद झाला होता. ह्यांच्या नजरेतील त्या सात जन्माच्या आणा-भाका तूच तर प्रथम वाचल्या होत्यास. ही डोहाळे जेवणाची हिरवी इरकल.. डोहाळे म्हणजे खरं तर आपल्या बाळाची पहिली हाक. तूच तर साक्षी होतीस. बारशाला नेसलेली ही माहेश्वरी... सुवर्ण अक्षरात कोरलेले नाव तूच तर पहिल्यांदा वाचले होतेस.. मुंजीची साडी नारायण पेठ आणि पहिला लक्ष्मी हार.. आईपणाने ऊर किती भरून आला होता. त्याला मुंडन करायचे नव्हतेच. न सांगताही समजून गेले होते. किती मिन्नतवारी केली होती ह्यांच्याजवळ... तू होतीस की बरोबर..  ही भिक्षावळीची चंदेरी साडी.. उगाच बाळ मोठा झाल्याची चुटपुट लावून गेली... तुझाच तर पदर भिजला होता..  मातृभोजनाच्या वेळची ही नऊवारी..  त्याला तुझ्याच मांडीवर बसवून पुरीचा घास भरवला होता. गोडाची आधीपासून अॅलर्जी. त्याच्या आवडी-निवडी न सांगताही किती पाठ होत्या ना आपल्याला... आणि ही पैठणी, खास येवल्याला जाऊन घेतली होती. सुनेलाही... गुलबक्षी रंग तिला किती खुलून दिसत होता. आपण किती मिरवले होते वरमाय म्हणून..! लव्ह मॅरेज... नजरेतूनच कळले आपल्याला. त्याची पसंती ती आपली..!   

सुनेने तिच्या डोहाळे जेवणाची हौस काही करू दिली नाही. परस्पर मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये बेबी शॉवर का काय म्हणतात ते करून आली. वास्तविक तिच्या चेहऱ्याकजे बघून आपल्याला तिचे डोहाळे समजायचे. नातीचे बारसेही घरीच उरकले... किती आनंद, किती हळव्या आठवणी निगडित आहेत या साड्यांशी. त्यांना स्वतःचेच हसू आले. आपण या निर्जीव वस्तूंशी चक्क गप्पा मारतोय.. संवाद असाही असू शकतो..! तेवढ्यात मालूताईंच्या स्मार्टफोनवर मेसेज टोन वाजला. त्या तंद्रीतून भानावर आल्या. एकुलत्या एका मुलाच्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या आमंत्रणाचा मेसेज होता तो. व्हॉट्सअॅपवर..!
..............
सुभाषराव एका नामांकित बिल्डरच्या ऑफिसमध्ये बसले होते. त्यांची छोटी पाच वर्षांची नात ईशा, त्या अद्ययावत सोयी-सुविधांनी नटलेल्या टाउनशिपचे, काचेच्या पेटीतले छोटे प्रतिरूप पाहण्यात दंग होऊन गेली होती. बिल्डरने त्याच्या लॅपटॉपवर, प्रोजेक्टच्या सर्व सोयी-सुविधांचे चढवून वर्णन केले. ‘सँपल फ्लॅट बघायला मिळेल का?’ डिजिटल प्लॅन प्रत्यक्षातही पाहू.., असा विचार करून सुभाषरावांनी विचारले. ‘ते जुने फंडे होते. आता आम्ही थ्री डायमेंशन ऑडियो व्हिज्युअल्स दाखवतो. ज्यामुळे तुम्हाला खऱ्या साइटवर फिरल्याचा अनुभव मिळतो,’ असं म्हणून तो बिल्डर, आजोबा व नातीला एका छोट्या थिएटरवजा खोलीमध्ये घेऊन गेला. तिथे गॉगल लावायला देऊन न झालेल्या, पण अगदी जिवंत व्हर्च्युअल टाऊनशिपची थ्री डी सफर घडवून आणली. छोटी ईशा ते पाहून जणू छोटा चेतनचा अनुभव घेत होती.

सर्व झाल्यावर बिल्डरने बुकिंगच्या ऑफर देऊन मुद्द्याला हात घातला... ‘मला फ्लॅट घ्यायचा नाही,’ सुभाषरावांचा शांत स्वर. ‘नुकताच माझ्या मुलाने आमच्या बंगल्याच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला. अगदी आमच्या शेजारीच.’ अर्थात त्या बिल्डरच्या चेहऱ्यावरचे भाव सुभाषरावांनी टिपले. ‘माफ करा, पण मला पहायचे होते, अशी काय जादू करता तुम्ही लोक, की समोरचा माणूस बुकिंग करूनच उठतो... मग त्याला एका शब्दानेही आपल्या आई-वडिलांना विचारणं तर दूरच; पण साधे सांगायचे कष्टही घ्यावेसे वाटत नाहीत..’ बिल्डरच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता सुभाषराव नमस्कार करून नातीचा हात धरून बाहेर पडले. विचारांची तंद्री नातीच्या लडिवाळ हट्टाने भंग पावली. ‘आजोबा.. मला ते गिफ्ट हवे...’ ती समोरच्या दुकानातील ‘लव्ह-बर्डस्’च्या पिंजऱ्याकडे बोट दाखवून म्हणाली. ‘अगं.. पण तुला डॉल-हाउस हवे होते ना..?’ सुभाषराव तिला आठवण करून देत म्हणाले; पण तिच्या हट्टापुढे नमते घेऊन, तो पिंजरा केवळ विकत घेऊन नाही, तर मुलाच्या नवीन घरातील बाल्कनीत फिक्स करायची जबाबदारी चोख पार पाडून ते घरी परतले. मुलाच्या घरात त्यांचा तेवढाच हातभार.!
..........................
नीरज आणि प्रतीक्षाच्या नवीन फ्लॅटची वास्तुशांत असते. नीरजचे निगडीचे पाहुणे आलेले असतात. प्रतीक्षा नेहमीप्रमाणे साडीला काट मारून कॅज्युअल्समध्ये वावरत असते. स्मार्टफोनवर पुजेचा लाइव्ह व्हिडिओ अपलोड करण्यात मश्गुल असते. नीरज थोडे प्रत्यक्ष आणि थोडे व्हर्च्युअल मंडळींना अटेंड करत असतो. मालूताई नवीन कांजीवरम नेसून मुलाच्या आनंदासाठी मनोभावे पूजाविधी पार पाडत असतात. सुभाषरावांचं लक्ष अधूनमधून छोट्या ईशाकडे आहे. तिची बाल्कनीतून-हॉल अशी आत बाहेर लगबग चाललेली असते; पण चेहरा मात्र अगदी उतरलेला असतो. शेवटी न राहवून विधींमधून जरा उसंत मिळाल्यावर सुभाषराव लाडक्या नातीजवळ येऊन तिला नाराजीचे कारण विचारतात. ती त्यांच्या हाताला धरून ओढत बाल्कनीत घेऊन जाते. 

‘मी त्यांच्यासाठी एवढे नवीन हाउस आणून ठेवले, स्पॅरोने तिथेच नेस्ट बनवले..’ ईशा तक्रारीच्या स्वरात लॉफ्टकडे बोट दाखवून म्हणते. तिथे चिमणा-चिमणीने एकेक काडी आणून सुबक घरटे बनवलेले असते आणि तो ‘लव्ह-बर्डस्’चा पिंजरा मात्र उघडा असूनही रिकामा असतो. नातीची समजूत घालून, तिला कडेवर घेऊन सुभाषराव हॉलमध्ये येतात आणि त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जाऊन मोठ्याने घोषणा करतात, ‘आपल्या वाय-फाय कट्ट्यासाठी आमच्या बंगल्याचा वरचा मजला ‘मोकळा’ आहे. आपण तिथे अॅप लर्निंग सुरू करू. आता आपल्यालाही टेक्नोसॅव्ही व्ह्यायलाच हवे.’ त्यांचे मित्रमंडळ खूश होते. त्यांना हसतमुख पाहून नीरज सुखावतो. प्रतीक्षाच्या नजरेत आदर येतो. मालूताईंची नजर काहीशी प्रश्नार्थक असते. सुभाषराव, मालूतांईना बाल्कनीत घेऊन येतात आणि समोर बोट दाखवून म्हणतात, ‘ज्याचे त्याचे घरटे, ज्याने त्यानेच बांधायचे असते.!’
...........................

एफसी रोड
ही कथा ‘एफसी रोड’ या ई-मासिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. अक्षय वाटवे हे या मासिकाचे संपादक आहेत. वाचकांना हे ई-मासिक ई-मेलद्वारे मोफत पाठवले जाते. 
मासिकासाठी संपर्क :
मोबाइल : ९४२०२ ६०८०८  
ई-मेल : fcroademagazine@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search