Next
देखो कसम से...
BOI
Sunday, April 14, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मोजकाच काळ चित्रपटसृष्टीत असलेल्या, पण उत्तम अभिनयशैलीचे दर्शन घडविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता यांनी ११ एप्रिल रोजी ८०व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज पाहू या त्यांच्यावर चित्रित झालेले ‘देखो कसम से...’ हे गीत...
.....
सौंदर्य आणि अभिनयक्षमता असेल, तर एखादी स्त्री चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट व लोकप्रिय अभिनेत्री होऊ शकते. हे विधान शंभर टक्के सत्य नाही. त्यामध्ये एक-दोन टक्के तरी नशिबाचा भाग असतोच, हे हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींचा इतिहास सांगतो. त्यामधील एक अभिनेत्री म्हणजे अमिता! 

अमिताच्या जीवनात हा एक-दोन टक्के नशिबाचा भाग नव्हता. म्हणून तर आज अनेक जण विचारतील, की ही अमिता कोण? ११ एप्रिल १९४० रोजी जन्मलेली ‘कमर सुलताना’ ही चित्रपटप्रेमींपुढे ‘अमिता’ म्हणून आली. आज ७९व्या वर्षी ती वृद्धापकाळाचे जीवन मुंबईत राहून व्यतीत करत आहे. ‘मी आता फिल्म इंडस्ट्रीत नाही. कोणाला माझ्यात का रस असावा,’ असा प्रश्न ३०-३१ वर्षांपूर्वी एका खासगी मुलाखतीत तिने विचारला होता. 

जेथे दर दिवसाला तारुण्याने मुसमुसलेल्या तरुणी नायिका बनण्यासाठी चित्रपटसृष्टीत येतात, तेथे १९५७च्या ‘तुमसा नहीं देखा’ चित्रपटातून पडद्यावर आलेल्या व १९७०च्या दशकापासून चित्रपटसृष्टीपासून दूर गेलेल्या ‘अमिता’च्या आठवणी कोण जागवेल, या आशयाचा तिचा प्रश्न काही गैर नाही. 

परंतु ज्या चित्रपटसृष्टीने आमचे बालपण, तारुण्य व प्रौढावस्था ‘आबाद’ केली, त्यातील कलावंतांचे ऋण मानताना अमिताचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. कारण पदार्पणातील ‘तुमसा नहीं देखा’मध्ये ती शम्मी कपूरच्या तोडीस तोड नाचली होती व तिची वेगळी अदा प्रेक्षकांना दाद देण्याजोगी वाटली होती. ‘मेरे मेहबूब’मध्ये ‘बहारों की मलिका’ साधना असतानाही अमिताने आपला प्रभाव दाखवला होता आणि ‘मेरे मेहबूब में क्या नहीं...’ या द्वंदगीतावरील नृत्यात आपली निपुणता तिने दाखवली होती. तिचा संवाद म्हणतानाचा मधुर आवाज व नाजूक शैली मनाला भुरळ पाडणारी होती. 

‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटातील अमितापेक्षा, ‘गूंज उठी शहनाई’ चित्रपटातील अमिता वेगळी होती. तेथे ती अवखळ, खट्याळ नव्हती, तर शांत व लाघवी होती. ‘दिल का खिलौना हाय टूट गया...’ आणि ‘तेरे सूर और मेरे गीत...’ या गीतांची मधुरता शब्द, स्वर आणि संगीताने उत्कृष्ट बनली होतीच; पण ती गीते पडद्यावर साकार करणारी अमिता त्या त्या गीतांच्या भावनांच्या अनुषंगाने अभिनय करून आपले अस्तित्व जाणवून देणारी ठरली होती. हाच प्रकार ‘देख कबिरा रोया’ चित्रपटातील ‘मेरी वीणा तुम बिन रोये...’ या गीताच्या वेळी अनुभवायला येतो. त्या चित्रपटाच्या तीन नायिकांपैकी ती एक नायिका होती. 

१९६५चा ‘प्यासे पंछी’ चित्रपट! अमिता त्याची नायिका होती व मेहमूद तिचा नायक होता! आज तो चित्रपट विस्मरणात गेला, तरी ‘तुम ही मेरे मीत हो...’ हे सुमन कल्याणपूर आणि हेमंतकुमार यांच्या स्वरातील मधुर युगलगीत आजही स्मरणात आहे. पडद्यावर ते अमिताने मेहमूदबरोबर साकार केले होते. या चित्रपटाशिवाय छोटे नवाब, नमस्तेजी याही चित्रपटांत ती मेहमूदबरोबर होती. 

तिच्या ‘तुमसा नहीं देखा’च्या यशानंतर तिला चित्रपट मिळाले नाहीत असे नाही; पण जे मिळाले तेथे तो नशिबाचा टक्का आडवा आला. तो आडवा आला नसता, तर राजसिंहासन, संस्कार, बडा भाई, हम भी कुछ कम नहीं, मितवा, सावन, आंगन असे तिच्या भूमिका असलेले चित्रपट त्या काळातही चर्चेत राहिले असते आणि आजही त्यांची नावे आवर्जून घेतली गेली असती. 

‘तुमसा नहीं देखा’ चित्रपट काढणाऱ्या फिल्मिस्तान चित्रसंस्थेनेही त्यांच्या पुढील एकाही चित्रपटात शम्मी कपूर व अमिता ही जोडी वापरली नाही. उलट पुढच्या वाटचालीत ती त्या काळी ‘बी ग्रेड’ चित्रपटांचीच नायिका कशी झाली, हे तिचे तिलाच कळले नाही. 

मध्यंतरीच्या १९८० ते १९९०च्या दशकात तिची मुलगी ‘सबिया’ही पडद्यावर आली होती. ‘अनोखा रिश्ता’ या चित्रपटात तिने काम केले होते. नंतर तीही कोणत्या चित्रपटात दिसून आली नाही. फोनवरून अमिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तरीही ती बोलू इच्छित नाही. मग प्रत्यक्ष भेटीचा प्रश्नच उरत नाही. 

वयाच्या ऐंशी वर्षांच्या टप्प्याजवळ पोहोचलेल्या अमिताला आता तर वयोमानानुसार काही बोलावेसेही वाटत नसेल, तर ते तसे गैर नाही; पण तिच्याबद्दल बोलावे, लिहावे असे मला वाटले. तिच्या वाढदिवसाबद्दल तिला शुभेच्छा देऊन तिला विचारावेसे वाटते ‘ओ, तेरा क्या कहना?’ 

... पण यातले प्रत्यक्षात काहीच शक्य नाही. म्हणूनच तिच्या फक्त सुंदर भूमिका, तिने पडद्यावर गायलेली मधुर गीते यांचाच गोफ विणून तिच्या अस्तित्वाची दखल घेणे एवढेच हातात राहते. म्हणूनच तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देऊन पाहू या तिच्या काही ‘सुनहऱ्या’ गीतांपैकी एक गीत - अर्थातच १९५७च्या ‘तुमसा नहीं देखा’मधील! हिंदी चित्रपटांतील काही गीते चाल, ठेका, संगीत या दृष्टीने एवढी प्रभावी असतात, की त्यातील शब्दरचना फारशी प्रभावी नसली, तरीही ती गीते ऐकायला, पुन्हा पुन्हा ऐकायला छान वाटतात. हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्णकाळातील अशी काही गीते हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. त्या काही गीतांपैकीच एक गीत म्हणजे ‘तुमसा नहीं देखा’मधील हे गीत! या गीतात ओ. पी. नय्यर यांचा ठेका, चाल वाद्यमेळ एवढा प्रभावी आहे, की तेथे मजरूह यांचे शब्द एक उपचार ठरतात. गीताच्या मीटरमध्ये योग्य शब्द बसवणे एवढे सोपे नसते; पण मजरूह त्यात ‘माहीर’ होते. त्याचबरोबर ही अशा प्रसंगीची शब्दरचना उगीचच अर्थहीन करण्याचा प्रकार मजरूहनी कधीच केला नाही. 

त्यामुळेच याही गीतात प्रियकराची मनधारणी करणारी प्रेयसी त्याला म्हणते - 

तुम भी जलोगे, हाथ मलोगे, रूठ के हमसे हाँ

(हे प्रियकरा) शपथेवर सांगते, की मी तुझीच आहे आणि माझा हा होकार ऐकूनही तू रुसून जाणार असशील, तर तेव्हा मनातल्या मनात जळत, हात चोळत बसण्याची वेळ तुझ्यावर येईल. 

गीतामधून प्रियकराला असे सांगणारी प्रेयसी पुढे सांगते, की 

रात है दिवानी, मस्त हैं फिजाए 
चांदनी सुहानी सर्द हैं हवाए 
हम भी अकेले, तुम भी अकेले 
कहते है तुमसे हा 
तुम भी जलोगे, हाथ मलोगे रूठ के हमसे हाँ 

(हे प्रियकरा) ही रात्र (प्रेम) दिवाणी आहे, वातावरणही (फिजा) कसे मस्त आहे. सुंदर चांदणे आहे व हवेत (हलकासा) गारवाही आहे (आणि अशा या वातवरणात) मी एकटी, तू एकटा (आणि मी) तुला होकार देत आहे. (आणि तो दुर्लक्षित करून जर तू निघून जाशील तर)  रुसून तू (पश्चतापाच्या) आगीत जळत राहशील, हात चोळत बसशील!

इतके सांगूनही ‘तो’ ऐकत नाही, निघून जाऊ लागतो, तेव्हा अखेर ‘ती’ ‘त्याला’ म्हणते - 

जाते हो तो जाओ, चल दिए जी हम भी 
आओ या ना आओ अब नही है गम भी 
हम भी अकेले, तुम भी अकेले, कहते है तुमसे हाँ 
तुम भी जलोगे, हाथ मलोगे, रूठ के हमसे

(हे प्रियकरा माझे एवढे सारे ऐकूनही तू रुसून/नाराज होऊन जाणारच असशील तर) जातोस तर जा, मीही आता (येथून) जात आहे. (या नंतर तू माझ्याकडे) ये अगर येऊ नकोस, त्याचेही दु:ख मला होणार नाही. (पण अखेरचे तुला सांगते, की) मी एकटी, तू एकटा, तशात माझा होकार (हे सगळे असूनही तू) रुसून जाणार असशील (तर नंतर पश्चात्तापच्या) आगीत तू जळत राहशील (किंवा) हात चोळत बसशील. 

प्रेयसीची ही निर्वाणीची भाषा ऐकल्यावर आता मात्र ‘तो’ ‘तिला’ म्हणतो - 

क्या लगायी तुम ने ये कसम कसम से 
लो ठहर गए हम कुछ कहो भी हम से 
बन के न चलिये, तन के न चलिये, कहते है तुमसे हाँ 
तुम भी जलोगे, हाथ मलोगे, रूठ के हम से हाँ

(हे नाराज झालेल्या प्रिये) कसम से, कसम से अर्थात शपथेवर सांगते, शपथेवर सांगते, हे काय सारखे लावले आहेस तू? (मला हे सारखे सारखे का ऐकवतेस?) हे घे, थांबलो मी आता! आता बोल काय बोलायचे आहे ते! (आणि आता मी बोलू लागलो, हे बघून आपण त्या गावचे नाही अशा) आविभार्वात, ताठ्याने निघून जाणार असशील, तर मीही आता तुला हेच सांगत आहे, की माझ्यावर रागावून जाशील, तर (पश्चात्तापाच्या) आगीत जळत राहशील, हात चोळत बसशील! 

दोन प्रेमिकांचा हा गोड झगडा, त्याला साजेसा आवाज ही आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांची ‘कारीगिरी!’ पडद्यावर साकार करणारे अमिता आणि शम्मी कपूर! अमिताचा नटखटपणा, जोडीला तिचे सौंदर्य, सोबत बिनधास्त शम्मी कपूर! स्वर, संगीत, शब्द, चाल यांच्या आधारे ‘सुनहरे’ बनलेल्या या गीताचा ‘सुनहरे’पणा अमिता व शम्मी कपूरच्या अदाकारीने वाढतो!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Smita. M.Janwadkar.Miraj. About 127 Days ago
Best. Songs. & Excellent. Bio data. Of. Ameeta.Our. Heartily. Congratulation. To. You. In. Every. Field...
1
0

Select Language
Share Link
 
Search