Next
त्यांची धडपड गोधन संरक्षणासाठी...
BOI
Monday, October 16 | 03:45 PM
15 0 0
Share this story


समाजातले काही घटक दुर्बल असतात. त्या घटकांना सबळ बनविण्यासाठी काही व्यक्ती आणि संस्था धडपडत असतात. समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असलेली प्रत्येक संस्था म्हणजे समाजाला लाभलेले लेणेच. अशाच काही संस्थांची, त्यांच्या कार्याची माहिती देणारे ‘लेणे समाजाचे’ हे सदर आजपासून सुरू करत आहोत. आज वसुबारस आहे. त्या निमित्ताने, गोधनाच्या संरक्षणासाठी धडपडणाऱ्या पारुंडी येथील पारसनाथ गोशाळेबद्दलची माहिती देणारा हा लेख...  
.............
भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिला आहे. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या ‘कामधेनू’च्या पूजेनं दीपावली सणाची सुरुवात होते. अशा या गायींचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी राज्यात, देशभरात अनेक गोशाळा कार्यरत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणजवळ अशीच एक गोशाळा कार्यरत आहे. तिचं नाव पारसनाथ गोशाळा...

संत एकनाथांच्या वास्तव्यानं पावन झालेलं पैठण हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या पैठणपासून जवळच असलेल्या पारुंडी इथं पारसनाथ गोशाळा आहे. परमेश्वर नलावडे यांनी २०१२मध्ये ही गोशाळा स्थापन केली. थकलेल्या, भाकड झालेल्या गायी कसायांकडे सोपवल्या जातात. त्यांना सोडवून त्यांना शेवटपर्यंत सांभाळण्याचं काम ही गोशाळा करते.

मराठवाड्यात दुष्काळाची भीषण सावली नेहमीच शेतकऱ्यांना जेरीस आणते. पाणीटंचाईमुळे माणसांनाच पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येते. अशा वेळी मुकी जनावरं कितीही प्रिय असली तरीही त्यांना सोडून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. काही जण नाईलाजानं त्यांना कसायाच्या हवाली करण्याचा पर्यायही स्वीकारतात. कारण त्यांना सांभाळण्याचा खर्च करणं शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा गायींना वाचवून त्यांना आश्रय देण्याचं काम पारसनाथ गोशाळेतर्फे केलं जातं. 

२०१२मधली गोष्ट. परमेश्वर नलावडे आपल्या मोसंबीच्या बागेला पाणी देत होते. तेवढ्यात गायींचं करुण हंबरणं त्यांच्या कानावर पडलं. एक कसाई चाबकाचे फटके मारत गायींना ओढत नेत होता. गायी जिवाच्या आकांतानं ओरडत होत्या; पण कोणीही लक्ष देत नव्हतं. गायींचा तो आक्रोश परमेश्वर यांना सहन झाला नाही. अखेर त्यांनी कसायाला थांबवलं आणि ‘हवे तेवढे पैसे घे; पण या गायींना सोड’ असं त्यांनी त्याला सांगितलं. या गायींना सोडविण्यासाठी त्यांच्या आईनं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे दिले. तिथून पुढे परमेश्वर यांनी गोसेवेलाच वाहून घ्यायचं ठरवलं. परमेश्वर यांनी आपली ग्रेडर पदाची नोकरी सोडली. गोळ्या, बिस्किटांच्या घाऊक विक्रीचा व्यापार ते करायचे. तोही त्यांनी बंद केला आणि संपूर्णपणे गोपालनाला वाहून घेतलं. 

केवळ त्यांनीच नव्हे, तर त्यांच्या अख्ख्या कुटुंबानंच गायींच्या संगोपनासाठी वाहून घेतलं आहे आणि तेही कोणत्याही अपेक्षेशिवाय. त्यांचे वडील काकासाहेब नलावडे यांनी मोसंबीची लागती बाग मोडून दोन एकर जागा या गोशाळेसाठी दिली आहे. परमेश्वर नलावडे यांचे बंधू तुकाराम, त्यांची पत्नी जिजाबाई, परमेश्वर नलावडे यांची पत्नी गीताबाई, मुले जगन्नाथ आणि मारुती हे सर्व जण गायींचा जीव वाचविण्यासाठी धडपडत असतात.

सोडून दिलेल्या, म्हाताऱ्या, भाकड गायी इथं आणल्या जातात. त्यांना व्यवस्थित चारा, पाणी दिलं जातं. औषधोपचार केले जातात. इथं गायींच्या निवाऱ्यासाठी चांगले गोठे उभारण्यात आले आहेत. चारा-पाणी देणं, गोठ्यांची स्वच्छता ही सगळी कामं नलावडे कुटुंब करतंच; पण हा सगळा पसारा मोठा असल्यानं आठ कामगारही तिथं काम करतात. त्यांचे पगार, गायींचे औषधोपचार यांसाठी खूप खर्च येतो. तो भागविण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींची मदत होते. 

देशी गायींचे केवळ दूधच नव्हे, तर शेण, मूत्रदेखील औषधी आहे. सेंद्रीय शेतीसाठी गायीच्या शेणाचा चांगला उपयोग होऊ शकतो. देशी गायींचं दूध देण्याचं प्रमाण कमी असलं, तरी या बाबींमुळे अर्थार्जनासाठी देशी गायींचं महत्त्व वाढतं. हे लक्षात घेऊन लोकांनी देशी गायी पाळण्याचं प्रमाण वाढवावं, याकरिता ही संस्था प्रयत्न करत आहे. देशी गायींचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम या गोशाळेमार्फत राबवले जातात. 

गोवंश हत्याबंदीचा कायदा आणण्यासाठीही संस्थेनं प्रयत्न केले. गेल्या वर्षी हा कायदा लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठीदेखील या संस्थेचे कार्यकर्ते काम करतात. पाणीटंचाई भीषण असल्यानं अनेक किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागतं. अशा वेळी जनावरांना पाणी कुठून पुरवायचं, असा प्रश्न पडतो. त्यामुळे दुष्काळाच्या छायेतून इथल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी सरकार ‘जलयुक्त शिवार’सारखे उपक्रम राबवत आहे. त्याला हातभार लावण्याचे प्रयत्नदेखील ही संस्था करत आहे. पाणी साठवण्याचे प्रकल्पदेखील संस्थेतर्फे राबवले जातात. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीनं बंधारे, तलाव बांधणं आदी उपाययोजना ही संस्था राबवत आहे.

सध्या तिथं २३५ गायी आहेत. त्यापैकी केवळ १२ गायी दुभत्या आहेत. दूध आणि शेणखत यांपासून मिळणारं उत्पन्न अत्यंत तुटपुंजं आहे. गायींसाठी दररोज दीड ते दोन टन चारा लागतो. हा चारा विकत आणावा लागतो. त्यासाठी नलावडे कुटुंबाला पावणेदोन लाख रुपयांचं कर्ज झालं आहे. संस्थेचं काम अजून व्यापक करण्याची परमेश्वर नलावडे यांची इच्छा आहे. समाजाची आणखी मदत मिळाली, तर ते नक्की करता येईल, असा दांडगा विश्वासही त्यांना आहे. 
त्यांच्या कार्याला शुभेच्छा !

संपर्क : परमेश्वर नलावडे, पारसनाथ गोशाळा, पारुंडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद.
मोबाइल :९९२१७२४९४३
ई-मेल : parmeshawarnalawade@gmail.com

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link